सावरलेला टेबल टेनिसपटू

किशोर पेटकर
गुरुवार, 17 मे 2018

क्रीडांगण
 

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियंता म्हणून नोकरीत गुरफटून घ्यावे, की टेबल टेनिसच्या उपजत गुणवत्तेला न्याय देत खेळाडू या नात्याने कारकीर्द करावी याबाबत चेन्नईचा साथियान ज्ञानशेखरन संभ्रामवस्थेत होता. त्याच्या वडिलांना वाटत होतं, की मुलाने अभियंता या नात्याने आयुष्यात स्थिरावावं, पण साथियान बेचैन होता. त्याला नोकरीच्या चौकटीत अडकून पडायचे नव्हते. त्याचवेळी वडिलांनाही निराश करायचे नव्हते. साथियानच्या वडिलांनी गरीबीचे चटके सहन केले होते. अखेरीस त्याने टेबल टेनिसमध्येच पाय रोवण्याचे पक्के केले. खेळाडू या नात्याने अपयशी ठरल्यास भविष्यातील वाटचालीसाठी  त्याच्यापाशी अभियांत्रिकीतील पदवी होतीच. त्याने टेबल टेनिस रॅकेटवरील पकड घट्ट केली आणि चेन्नईचा हा युवक जागतिक पातळीवर यशस्वी ठरला. २५ वर्षीय साथियानने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली. यामध्ये भारताचा यशस्वी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमाल याच्यासह जिंकलेल्या सांघिक सुवर्णपदकाचाही समावेश आहे. साथियानच्या ऑलिंपियन बनण्याच्या वाटचालीस प्रारंभ झालेला आहे. हल्लीच भारताने स्वीडनमध्ये झालेल्या जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत तेरावा क्रमांक पटकाविला. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीत साथियानने मोलाचा वाटा उचलला. 

कामगिरीत प्रगती
साधरणतः वर्षभरापूर्वी साथियानचा खेळ कमालीचा खालावला होता. तो जागतिक क्रमवारीत १२५व्या स्थानी घसरला होता. टेबल टेनिस कारकिर्दीतीबाबतची संभ्रमावस्था त्यास कारणीभूत होती हे स्पष्टच आहे. प्रशिक्षक सुब्रम्हण्यम रमण यांनी साथियानच्या आत्मविश्‍वासाला मदतीची जोड दिली. रमण हे स्वतः भारताचे माजी यशस्वी टेबल टेनिसपटू व अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू. चेन्नईतील त्यांच्या अकादमीत साथियानला दिशा गवसली. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली साथियनने टेबल टेनिसमध्ये उंची गाठण्याचा निश्‍चय केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना त्याने पदकांची कमाई केली. ध्येय पक्के केल्यानंतर साथियानचा खेळ जास्तच धारदार झाला. टेबल टेनिस रॅकेट तो ‘शेकहॅंड’ प्रकारे पकडतो. ही पकड अधिकच भक्कम करत तो जिंकण्यासाठी सज्ज झाला, त्याचे जागतिक मानांकनही कमालीचे उंचावले आहे. या वर्षी जानेवारीत ४९व्या स्थानी होता. एप्रिलच्या जागतिक मानांकनात ४६व्या क्रमांकापर्यंत प्रगती साधत साथियान कारकिर्दीतील सर्वोत्तम कालखंड अनुभवत आहे. त्याची खेळण्याची शैली आक्रमक. त्या बळावर त्याने जिद्दीने आगेकूच राखली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत जाकार्ता येथे होणारी आशियायी क्रीडा स्पर्धा भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी खूपच खडतर असेल. त्या स्पर्धेत पुरुष टेबल टेनिसमध्ये शरथ कमालसह साथियानवर भारताची मदार राहील.  

युरोपात छाप
साथियानने २०१६ मध्ये बेल्जियम ओपन ‘प्रो-टूर’ टेबल टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्याचे हे पहिले प्रो-टूर विजेतेपद ठरले. गतवर्षी तो स्पॅनिश ओपन स्पर्धेत अजिंक्‍य ठरला होता. शिवाय ‘आयटीटीएफ चॅलेंज’ स्पर्धेतही त्याने पदके जिंकली, त्याला आता जर्मनीतील अव्वल साखळी टेबल टेनिस स्पर्धेत खेळणाऱ्या एएसव्ही ग्रुनवेटर्सबाक टिस्कटेनिस संघाने करारबद्ध केले आहे. सप्टेंबरपासून या साखळी स्पर्धेत खेळताना साथियानला युरोपातील आणि जगातीलही उत्कृष्ट टेबल टेनिसपटूंविरुद्ध खेळण्याची संधी लाभेल. युरोपात खेळल्याने शरथ कमालची कामगिरी कमालीची उंचावली आहे, साथियानसमोरही असेच ध्येय असेल. गतवर्षी त्याने शरथच्या साथीत बेल्जियम व स्वीडन ओपन स्पर्धेत दुहेरीत ब्राँझपदकाची कमाई केली होती. २०११ मध्ये जागतिक ज्युनिअर टेबल टेनिसमध्ये सांघिक ब्राँझपदक जिंकलेल्या चेन्नईच्या या प्रतिभासंपन्न टेबल टेनिसपटूने अपेक्षा उंचावल्या आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेतील साथियानची पदके
सुवर्ण ः पुरुष सांघिक
रौप्य ः पुरुष दुहेरी शरथ कमालसमवेत
ब्राँझ ः मिश्र दुहेरी मणिका बत्रा हिच्यासमवेत

संबंधित बातम्या