मॅंचेस्टर सिटीचे ‘शतक’

किशोर पेटकर
गुरुवार, 24 मे 2018

क्रीडांगण
 

कल्पक आणि यशस्वी फुटबॉल प्रशिक्षक हा लौकिक असलेल्या पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली मॅंचेस्टर सिटी संघाने यंदाची इंग्लिश प्रिमिअर लीग स्पर्धा जिंकली. स्पेनमधील बार्सिलोना आणि जर्मनीतील बायर्न म्युनिकच्या तंबूत यशस्वी ठरल्यानंतर २०१६ मध्ये गार्डिओला मॅंचेस्टरला आले. एका मोसमानंतर ‘सिटी’ संघाने करंडक उंचावला. एकंदरीत त्यांचे हे पाचवे प्रिमिअर लीग विजेतेपद, २०१३-१४ नंतर प्रथमच हा संघ इंग्लंडचा ‘चॅंपियन’ क्‍लब ठरला. विशेष बाब म्हणजे, गुणांचे शतक नोंदवत मॅंचेस्टर सिटीने विजेतेपदाचा जल्लोष केला. साऊदॅम्प्टनविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून ३८ सामन्यांतून त्यांनी बरोबर १०० गुणांची प्राप्ती केली. प्रिमिअर लीगमध्ये मोसमात शंभर गुण नोंदविणारा मॅंचेस्टर सिटी पहिला इंग्लिश संघ ठरला. तब्बल २२ सामने अपराजित राहत त्यांनी विजेतेपद खूप अगोदर निश्‍चित केले होते. तुलना करता, दुसऱ्या स्थानावरील मॅंचेस्टर युनायटेडने ८१ गुण नोंदविले. मॅंचेस्टरमधील या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील १९ गुणांचा फरक ‘सिटी’चे स्पर्धेतील वर्चस्व सिद्ध करते. ४७ वर्षीय गार्डिओला हे बार्सिलोना क्‍लबचे चार वर्षे प्रशिक्षक होते, त्या कालावधीत बार्सा संघाने धडाकेबाज खेळ करत तब्बल १४ करंडक जिंकले होते. गार्डिओला नंतर म्युनिकच्या संघासोबत तीन वर्षे होते, आता मॅंचेस्टर सिटी संघही त्यांच्या प्रशिक्षणातील जादू अनुभवत आहे. मॅंचेस्टर सिटी संघात मोठे स्टार खेळाडू नव्हते. यंदा स्पर्धेत त्यांनी सलग १८ सामने जिंकून वाहव्वा मिळविली. स्पॅनिश सर्जिओ आगेरो, इंग्लंडचा रहीम स्टर्लिंग, ब्राझीलचा गॅब्रिएल जेझूस यांनी मॅंचेस्टर सिटीच्या आक्रमणाची धुरा वाहिली. या तिघांनी एकत्रित ५२ गोल नोंदविले.

सालाह याचा धडाका
मॅंचेस्टर सिटीने यंदाची प्रिमिअर लीग स्पर्धा गाजविली, पण वैयक्तिक पातळीवर लिव्हरपूलच्या महंमद सालाह याने जबरदस्त धडाका राखला. तोच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. इजिप्तच्या सालाह याचा इंग्लिश लीगमधील हा दुसरा मोसम. २०१४-२०१६ या कालावधीत तो चेल्सी संघाकडे करारबद्ध होता, मात्र तेव्हा यशस्वी ठरला नव्हता. यंदा त्याची गोल नोंदविण्याची भूक असामान्य ठरली. जुर्जेन क्‍लोप यांच्या मार्गदर्शनाखालील लिव्हरपूलने यंदा चॅंपियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, इंग्लिश लीगमध्येही ‘टॉप फोर’मध्ये स्थान राखण्यात ते यशस्वी ठरले. या कामगिरीत सालाह याचा लाखमोलाचा वाटा राहिला. त्याच्यामुळे लिव्हरपूलचे आक्रमक खूपच धारदार ठरले. सालाह याने स्पर्धेत सर्वाधिक ३२ गोल नोंदविले, शिवाय गोल करण्यात मदत करताना १० ‘असिस्ट’ची नोंद केली. त्याने टॉटेनहॅम हॉट्‌सपरच्या हॅरी केन याच्यापेक्षा दोन गोल जास्त केले. सालाहच्या सातत्यामुळे लिव्हरपूलला पुढील मोसमातील चॅंपियन्स लीग स्पर्धेसाठीही पात्रता मिळविता आली. त्यांच्यासह मॅंचेस्टर सिटी, मॅंचेस्टर युनायटेड व टॉटेनहॅम हॉट्‌सपर हे संघ २०१८-१९ मोसमात युरोपातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतील. मोसमाच्या सुरवातीस मॅंचेस्टर सिटीने सालाह याला निवडले. हा करार ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. इटलीतील रोमा संघाकडून इंग्लंडमधील संघात आलेल्या या २५ वर्षीय आघाडीपटूने निवड सार्थ ठरविली.

स्वॅन्सी सिटीची घसरण
इंग्लिश प्रिमिअर लीगमधून यंदा तीन संघांची पदावनती झाली. २० संघातील या स्पर्धेत स्वॅन्सी सिटी, स्टोक सिटी व वेस्ट ब्रॉम या संघांना स्थान गमवावे लागले. खराब कामगिरीमुळे तिन्ही संघांना स्पर्धेच्या मध्यास प्रशिक्षकांना डच्चू द्यावा लागला. शेवटपर्यंत या संघांना मैदानावरील ‘गणित’ व्यवस्थित सोडविता आले नाही. सात मोसम प्रिमिअर लीगमध्ये खेळल्यानंतर स्वॅन्सी सिटीला आता द्वितीय विभागातील स्पर्धेत खेळावे लागेल. वेल्समधील या संघाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पॉल क्‍लेमेंत या अर्धचंद्र देत, कार्लोस कार्व्हाल्हाल नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली होती, पण त्यांना स्पर्धेतील स्थान राखता आले नाही.

मॅंचेस्टर सिटीची कामगिरी
 सामने ः ३८, विजय ः ३२, बरोबरी ः ४, पराभव ः २
 गोल नोंदविले ः १०६, गोल स्वीकारले ः २७, गुण ः १००

संबंधित बातम्या