दिग्गज गोलरक्षक बफॉन

किशोर पेटकर
गुरुवार, 24 मे 2018

क्रीडांगण
 

जियानलुजी बफॉन हा जागतिक फुटबॉलमधील दिग्गज गोलरक्षक. चाळीस वर्षांच्या या खेळाडूने विश्‍वकरंडक पात्रता फेरीत इटलीस अपयश आल्यानंतर आंतरराष्ट्रीय निवृत्ती स्वीकारली होती, पण नंतर हा निर्णय मागे घेतला व इटलीच्या जर्सीत पुन्हा मैदानावर उतरला. तो राष्ट्रीय संघाचा दीर्घकालीन कर्णधार ठरला. या गोलरक्षकाने आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने इटलीतील मातब्बर फुटबॉल संघ युव्हेंट्‌सला सोडचिठ्ठी देण्याचे ठरविले आहे. तब्बल १७ वर्षांच्या कारकिर्दीनंतर बफॉनने युव्हेंट्‌सपासून दूर जाण्याचे ठरविले आहे. १९५८ नंतर यंदा प्रथमच इटलीला विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरता आले नाही. हा माजी जगज्जेत्यांसाठी आणि अनुभवी बफॉनसाठीही मोठा झटका होता. त्यातून सावरत बफॉनने क्‍लब फुटबॉलवर लक्ष केंद्रित केले होते. सेरी ए फुटबॉल स्पर्धेत युव्हेंट्‌स २०११-१२ पासून सलग विजेता आहे. यंदा त्यांनी सलग सातव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २०११ पासून युव्हेंट्‌सने इटालियन फुटबॉलमध्ये नव्याने उसळी घेत वर्चस्व टिकविले. या वाटचालीत बफॉनचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. वय वाढले, परंतु गोलजाळीसमोर त्याची एकाग्रता व दक्षता कायम राहिली. त्यामुळेच हा गोलरक्षकाला व्यावसायिक क्‍लब फुटबॉलमध्ये अजूनही मागणी आहे. युव्हेंट्‌समधून बाहेर पडल्यानंतर बफॉनला करारबद्ध करण्यासाठी आता इंग्लंडमधील लिव्हरपूल, मॅंचेस्टर सिटी, स्पेनमधील रियाल माद्रिद, फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेन या प्रबळ संघांनी उत्सुकता दाखविली. 

जबरदस्त कामगिरी 
जियानलुजी बफॉनने पार्मा संघातून १९९५ मध्ये व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले. नंतर २००१ मध्ये युव्हेट्‌स संघात दाखल झाला. तेव्हापासून तो या संघाचा गोलरक्षणातील आधारस्तंभ बनून राहिला. या क्‍लबसाठी तो ६५० पेक्षा जास्त सामने खेळला. तो संघात असताना युव्हेंट्‌सने नऊ वेळा सेरी ए स्पर्धेत विजेतेपद मिळविले. याशिवाय इटालीयन कप व सुपर कप स्पर्धेतही बाजी मारली. इटलीच्या सीनियर संघात त्याने १९९७ मध्ये पदार्पण केले, तेव्हापासून या वर्षीपर्यंत त्याने १७६ सामन्यांत इटलीचे प्रतिनिधित्व केले. २००६ मध्ये इटलीने विश्‍वकरंडक जिंकला, तेव्हा बफॉनने जबरदस्त फॉर्म प्रदर्शित केला होता. सात सामन्यात त्याने फक्त दोन गोल स्वीकारले. पाच सामन्यांत एकही गोल स्वीकारला नाही आणि ४५३ मिनिटे गोलविना राहण्याचा पराक्रमही बजावला. २००६ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून बफॉनच्याच नावावर मोहोर उठली. जागतिक फुटबॉलमध्ये बफॉनचे नाव आदराने घेण्यात येते. त्याचा अनुभव व सातत्य नेहमीच इटली व युव्हेंट्‌स संघासाठी मदतगार ठरले. 

स्वप्न उद्‌ध्वस्त
रशियात होणाऱ्या यंदाच्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याचे बफॉनचा मानस होता. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील प्ले-ऑफ लढतीत स्वीडनने इटलीविरुद्ध बाजी मारली आणि बफॉनचे स्वप्न उद्‌ध्वस्त झाले. पहिल्या टप्प्यात स्वीडनने १-० असा विजय मिळविला होता, नंतर दुसऱ्या टप्प्यात इटलीने स्वीडनला गोलशून्य बरोबरीत रोखले, त्यामुळे स्वीडनला विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. इटलीतील फुटबॉलप्रेमींची जाहीर माफी मागत निराश बफॉनने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यावर्षी मार्चमध्ये त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात सामावून घेण्यात आले. इटलीचे प्रशिक्षक लुईजी डी बियाजिओ यांनी त्याची निवड केली. बफॉनचा दीर्घ अनुभव हे मुख्य कारण होते. संघाचे हित ओळखून त्यानेही निवृत्तीतून बाहेर येण्याचे ठरविले. क्‍लब पातळीवरील सातत्यामुळे त्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणे कठीण गेले नाही. २३ मार्च रोजी तो अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात खेळला. त्याचा हा १७६वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. तब्बल ८० सामन्यात इटलीचे नेतृत्व करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदीत झाला. भविष्यात तो इटलीतर्फे आणखी किती आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणार का याबाबतही स्पष्टता नाही.

युव्हेंट्‌स व बफॉनची सेरी ए विजेतीपदे
 एकूण करंडक ९
 २००१-२००२ व २००२-२००३
 २०११-२०१२ ते २०१७-२०१८ (सलग सात मोसम)

संबंधित बातम्या