‘वयस्क’ चेन्नईचे यश!

किशोर पेटकर
गुरुवार, 7 जून 2018

क्रीडांगण
 

पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघ इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत यशस्वी ठरला. तिसऱ्यांदा त्यांनी करंडक जिंकताना साऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळविली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला टोमणे झेलावे लागले होते. ‘व्हेटरन्स’ संघ, ‘डॅडीज आर्मी’ अशी शेलकी विशेषणे त्यांना चिकटली होती. संघातील तब्बल अकरा खेळाडू वयाची तिशी पार केलेले होते. लिलावातही त्यांनी नऊ ‘थर्टी प्लस’ खेळाडू घेतले होते. खुद्द धोनी ३६ वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेतलेला ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसनही ३६ वर्षांचा, भारतीय संघातील स्थान गमावलेला हरभजन सिंग ३७ वर्षांचा, दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर ३९ वर्षांचा. याशिवाय सुरेश रैना, अंबाती रायुडू, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसी, केदार जाधव, मुरली विजय, कर्ण शर्मा, वेस्ट इंडिजचा ड्‌वेन ब्राव्हो हे तिशी गाठलेले किंवा पार केलेले खेळाडू. साहजिकच क्रिकेटमधील ‘वयस्क’ खेळाडूंच्या चेन्नई सुपरकिंग्जच्या क्षमतेबाबत संशय होता. गतलौकिकाला साजेसा खेळ धोनीचा संघ करेल का याबाबतही प्रश्‍नचिन्ह होते. क्रिकेटमध्ये वय दुय्यम ठरते, तर अनुभव सर्वश्रेष्ठ असतो हे चेन्नईच्या जिगरबाज संघाने सिद्ध केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबादला आठ विकेट्‌स राखून लीलया हरवत चेन्नईने विजेतेपद साकारले. वॉटसन विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या ५७ चेंडूंतील नाबाद ११७ धावांमुळे चेन्नईने अंतिम सामना नऊ चेंडू बाकी ठेवून आरामात जिंकला. हैदराबादच्या १७८ धावा पार करताना त्यांनी २ बाद १८१ धावा केल्या.

तंदुरुस्ती महत्त्वाची
चेन्नईने विजेतेपदाचा जल्लोष केल्यानंतर, स्वतः धोनीने यशाचे गुपित उघड केले. सर्वजण नेहमीच खेळाडूंच्या वाढत्या वयाबद्दल बोलतात, पण वय नव्हे, तर तंदुरुस्ती महत्त्वाची असते, असे धोनीने स्पष्ट केले. त्याने अंबाती रायुडूचे उदाहरण दिले. तो ३२ वर्षांचा असला, तरी मैदानावरील चपळ क्षेत्ररक्षक आहे याकडे चेन्नईच्या कर्णधाराने लक्ष वेधले. धोनी वयाच्या आकड्याकडे अजिबात लक्ष देत नाही. स्वतः ३६ वर्षांचा असला, तरी अजूनही जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. त्याच्यानुसार, खेळाडू १९ वर्षांचा असो वा तिशीतील, चपळता महत्त्वाची ठरते. याच बाबीवर भर देत त्याने आयपीएलच्या अकराव्या मोसमात ‘वयस्क’ संघाला प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या साह्याने यशस्वी बनविले. संघातील उपलब्ध खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घ्यायची आणि त्यांच्यातील आत्मविश्‍वासाला खतपाणी कसे घालायचे यात कर्णधाराचा चाणाक्षपणा दिसतो. रायडूला आयपीएलमधील सफल कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्याची संधी लाभली. त्याने चेन्नईच्या यशात मोलाचा वाटा उचलताना एका शतकासह ६०२ धावा केल्या. वॉटसनला दुखापती नेहमीच सतावतात. धोनीसाठी वॉटसनचा अनुभव निर्णायक होता, म्हणून त्याने मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूचा कल्पकतेने वापर केला. त्याला जास्त धावावे लागणार नाही याची दक्षता घेतली. वॉटसनने स्पर्धेत दोन शतकांसह ५५५ धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याला पहिल्या दहा चेंडूंत एकही धाव करता आली, मात्र चेंडूवरील नजर स्थिर झाल्यानंतर तो हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडला. गोलंदाजीच्या तुलनेत फलंदाजी हे चेन्नईचे बलस्थान, त्यावर धोनी जास्त विसंबून राहिला.

सफल संघ
चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलमधील सफल संघ मानला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हा संघ २०१६ व २०१७ मधील स्पर्धेसाठी निलंबित ठरला. ही दोन वर्षे वगळता, त्यांनी प्रत्येक वर्षी स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. सात वेळा अंतिम फेरी गाठताना तीन विजेतीपदे व चार उपविजेतीपदे मिळविली आहेत. विजेतेपदाच्या शर्यतीत त्यांनी मुंबई इंडियन्सच्या तीन किताबांशी बरोबरी साधली आहे. विशेष बाब म्हणजे, दोन वर्षांनंतर पुनरागमन करताना धोनीच्या संघाने आयपीएल विजेतेपदासह क्रिकेटप्रेमींना सुखद धक्का दिला.

‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज : 

  •   विजेतेपद ः २०१०, २०११, २०१८  
  •   उपविजेतेपद ः २००८, २०१२, २०१३, २०१५   
  •   प्ले ऑफ फेरी ः २००९, २०१४
     

संबंधित बातम्या