‘एबीडी’ची चटका लावणारी निवृत्ती

किशोर पेटकर
गुरुवार, 7 जून 2018

क्रीडांगण
 

ए बी डिव्हिलियर्स हा क्रिकेट मैदानावरील अफाट नैसर्गिक गुणवत्ता असलेला असामान्य खेळाडू. फटकेबाज फलंदाज. ’३६० डिग्री’ फलंदाज हा त्याचा लौकिक. मैदानावर सर्व कोनात सहजसुंदर फटकेबाजी करणाऱ्या डिव्हिलियर्सची फलंदाजी नयनरम्य. क्रिकेट पुस्तकातील शास्त्रोक्त फटक्‍यांवर भर देत झटपट क्रिकेटला साजेशी अफलातून टोलेबाजी करत त्याने लोकप्रियता मिळविली. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपदही भूषविले. एक जिगरबाज फलंदाज व अविश्‍वसनीय क्षेत्ररक्षक या नात्याने तो जास्त लक्षात राहिला. मध्यंतरी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने यष्टिरक्षण त्यागले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमुळे भारतातही त्याने चाहते मिळविले. अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स हे त्याचे पूर्ण नाव. ‘एबीडी’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूने अवघ्या ३४व्या वर्षी निवृत्ती स्वीकारली. ‘‘मी थकलो आहे,’’ असे सांगत डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानापासून दूर जाण्याचा निर्णय जाहीर केला. ऐन उमेदीत त्याने स्वीकारलेली निवृत्ती मात्र चटका लावणारी ठरली. डिसेंबर २००४ पासूनची त्याची १४ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द झळाळती ठरली.

स्पायडरमॅन...!
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी आधारस्तंभ ठरला. यंदा बंगळूरला प्ले-ऑफ फेरी गाठण्यात अपयश आले, पण डिव्हिलियर्सने किल्ला लढविला. केवळ फलंदाजीतच नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही त्याने भन्नाट कसब प्रदर्शित केले. १७ मे रोजी बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला सामना ‘एबी’ने श्‍वास रोखून धरणाऱ्या क्षेत्ररक्षणाने संस्मरणीय ठरविला. बंगळूर व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या ॲलेक्‍स हेल्स याचा झेल पकडताना डिव्हिलियर्सने साऱ्यांनाच चकीत केले. हेल्सचा जोरदार फटका षटकार ठरण्याची शक्‍यता होती. डीप मिडविकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणाऱ्या ‘एबी’ने जमिनीपासून साधारणतः चार फूट उंच उडी घेत एका हाताने अद्वितीय झेल पकडला. त्याची कृती पाहून बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीही भारावला. ‘जिवंत स्पायडरमॅन पाहिला...’ असे ट्‌विट करत कोहलीने डिव्हिलियर्सच्या सनसनाटी कामगिरीस मानवंदना दिली. या वर्षीच्या आयपीएलमध्ये डिव्हिलियर्सने ४८० धावा केल्या. ‘आयपीएल’प्रेमी त्याची स्फोटक फलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण यापुढे अनुभवू शकणार नाहीत. डिव्हिलियर्सने निवृत्ती जाहीर करताना आपण यापुढे परदेशात न खेळण्याचे स्पष्ट केले, मात्र दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो टायटन्स संघाकडून खेळताना दिसेल.

वंडर किड!
एबी डिव्हिलियर्सची ओळख एक यशस्वी क्रिकेटपटू असली, तरी त्याचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू. केवळ क्रिकेटमध्येच नव्हे, तर इतर खेळांतही तो विद्यार्थी दशेत तरबेज होता. दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत ‘एबी’ने सहा विक्रम नोंदविले होते. १९ वर्षांखालील वयोगटात तो बॅडमिंटनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय विजेता होता. हॉकी संघाच्या राष्ट्रीय निवड चाचणीतही त्याला बोलावण्यात आले होते. ज्युनिअर पातळीवर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या टेनिस संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. इतकेच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर रग्बी संघाचेही त्याने कर्णधारपद भूषविले होते. फुटबॉल, गोल्फ या खेळातही त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. खेळाच्या मैदानावर वावरताना डिव्हिलियर्सने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान विषयातील प्रकल्पाबाबत त्याला नेल्सन मंडेला पदकाने सन्मानित करण्यात आले होते. प्रीटोरियातील ‘वंडर किड’ असं त्याला कौतुकाने संबोधले जात होते. एकदिवसीय क्रिकेटमधील वेगवान अर्धशतक व शतकाचा विक्रम त्याच्याच नावे आहे. २०१५ मध्ये त्याने जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध १६ चेंडूंत ५०, तर ३१ चेंडूंत १०० धावा केल्या होत्या. विंडीजविरुद्ध २०१५ मध्ये सिडनी येथे ६४ चेंडूंत १५० धावा नोंदवून नवा कीर्तीमान प्रस्थापित केला होता.

ए बी डिव्हिलियर्सची कारकीर्द

  •  कसोटी ः ११४ सामने, ८७६५ धावा, ५४.५१ सरासरी, २२ शतके, ४३ अर्धशतके, २२२ झेल, ५ यष्टीचीत
  •  वन-डे ः २२८ सामने, ९५७७ धावा, ५३.५० सरासरी, २५ शतके, ५३ अर्धशतके, १७६ झेल, ५ यष्टीचीत
  •  टी-२० ः ७८ सामने, १६७२ धावा, २६.१२ सरासरी, १० अर्धशतके, ६५ झेल, ७ यष्टिचित

संबंधित बातम्या