प्रशिक्षक झिदान यांचे धक्कातंत्र!

किशोर पेटकर
शुक्रवार, 15 जून 2018

क्रीडांगण
 

फ्रान्सच्या झिनेदिन झिदान यांनी फुटबॉलपटू या नात्याने मोठा नावलौकिक मिळविला, पण इटलीचा खेळाडू मार्को माटेराझी याला २००६च्या विश्‍वकरंडक अंतिम लढतीत डोक्‍याने जोरदार धडक दिल्यामुळे कारकिर्दीला दाग लागला होता. खेळाडू झिदानची ती कृती धक्कादायक होती. १९९८च्या अंतिम लढतीत झिदानच्या दोन गोलांमुळे फ्रान्सने ब्राझीलला हरवून प्रथमच विश्‍वकरंडक जिंकला होता, पण २००६ मध्ये विश्‍वकरंडकाची लढत गमावली व ‘हेडबट’मुळे झिदानही टीकेचा धनी झाला. तब्बल बारा वर्षांनंतर प्रशिक्षक या नात्याने झिदान यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. यावेळी कटू कृती नाही, तर अनपेक्षित निर्णय घेत साऱ्यांना चकित केले. स्पेनचा मातब्बर फुटबॉल संघ रियाल माद्रिदचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने झिदान यांची कारकिर्दीत सजत होती, संघाला चॅंपियन्स लीग विजेतेपद मिळवून दिल्यानंतर या फ्रेंच प्रशिक्षकाने राजीनाम्याचे अस्त्र सोडले. पदावरून पायउतर होण्याची ही आपल्यासाठी आणि क्‍लबसाठी योग्य वेळ आहे, असे ४५ वर्षांच्या या प्रशिक्षकाने नमूद केले. हा निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, असे सांगत झिदान यांनी राजीनाम्याचे स्पष्टीकरण दिले. फ्रान्स, तसेच रियाल माद्रिद संघातून खेळताना झिदान यांनी महानता गाठली होती. प्रशिक्षक या नात्यानेही त्यांची उंची वाढत होती, रियाल माद्रिदची सांघिक कामगिरीही उठावदार होत असताना त्यांनी प्रशिक्षकपद सोडले. इंग्लंडच्या लिव्हरपूल क्‍लबला ३-१ फरकाने हरवून रियाल माद्रिदने एकंदरीत तेराव्यांदा, तर झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्यांदा चॅंपियन्स लीग करंडक पटकाविला. त्यानंतर या क्‍लबचे प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो व गॅरेथ बेल यांनी संघ सोडण्याचे संकेत दिले. त्यापूर्वीच झिदान यांनी क्‍लबचे आभार मानत खुर्ची खाली केली.

यशस्वी कारकीर्द
झिनेदिन झिदान हे रियाल माद्रिदचे पूर्वाश्रमीचे यशस्वी फुटबॉलपटू. ‘झिझोऊ’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूसाठी माद्रिदच्या संघाने २००१ मध्ये मोठी रक्कम मोजली होती. इटलीतील ‘युव्हेंट्‌स’कडून झिदानला मिळविण्यासाठी तेव्हा रियाल माद्रिदने ७७.५ दशलक्ष युरो दिले होते. हा महागडा खेळाडू ‘बेर्नाबेऊ’वर सफल ठरला. झिदान संघात असताना रियाल माद्रिदने २००३ मध्ये ला-लिगा, तर त्यापूर्वी २००२ मध्ये चॅंपियन्स करंडक व इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धा जिंकली होती. २००६ पर्यंत झिदान यांनी रियाल माद्रिदचे दीडशेहून जास्त सामन्यांत प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली. २०१३ मध्ये ते रियाल माद्रिदचे प्रशिक्षक कार्लो ॲन्सेलोटी यांचे सहाय्यक बनले. जानेवारी २०१६ मध्ये झिदान यांना मोसमाच्या मध्यास रियाल माद्रिदचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारावे लागले. राफा बेनिटेझ यांना डच्चू दिल्यानंतर झिदान यांच्याकडे सूत्रे आली. त्यांनी लगेच ठसा उमटविला. बेनिटेझ यांच्या कालखंडात रियाल माद्रिद संघ दुभंगलेला होता, पण झिदान यांनी संघातील सारे नैराश्‍य दूर करताना संघाला चॅंपियन्स लीगमध्ये विजेतेपद मिळवून दिले. या संघाने २०१६ मध्ये क्‍लब विश्‍वकरंडक व युरोपियन सुपर कपही जिंकला. पुढच्या मोसमात रियाल माद्रिदने ला-लिगा विजेतेपद पटकाविले. आकडेवारीत बोलायचे झाल्यास, झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच वर्षांच्या कालावधीत रियाल माद्रिदने १४९ पैकी १०४ सामने जिंकले, नऊ वेळा विजेतेपदाचा करंडक उंचावला.

तिसरे प्रशिक्षक...
सलग तीन मोसम चॅंपियन्स करंडक जिंकणारे झिदान हे अवघे तिसरेच प्रशिक्षक ठरले. ते बॉब पैसले व कार्लो ॲन्सेलोटी यांच्या पंगतीत आले. झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली २०१६ मध्ये रियाल माद्रिदने स्पेनच्याच ॲटलेटिको द माद्रिदला हरवून चॅंपियन्स करंडक जिंकला, २०१७ मध्ये रियालने युव्हेंट्‌सचा सहज पाडाव करत युरोपातील सर्वश्रेष्ठ क्‍लबचा किताब राखला. यंदा झिदान यांच्या संघाला ला-लिगा विजेतेपद हुकले, पण चॅंपियन्स लीग जेतेपदाची हॅटट्रिक नोंदविली.

प्रशिक्षक झिदानची विजेतिपदे...

  •      ला-लिगा (१) ः २०१६-१७
  •      स्पॅनिश सुपर कप (१) ः २०१७
  •      यूईएफए चॅंपियन्स लीग (३) ः २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८
  •      यूईएफए सुपर कप (२) ः २०१६, २०१७
  •      फिफा क्‍लब विश्‍वकरंडक (२) ः २०१६, २०१७

संबंधित बातम्या