लोव यांना विक्रमाची संधी

किशोर पेटकर
शुक्रवार, 15 जून 2018

क्रीडांगण
 

जर्मनी विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद राखणार का? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी थांबावे लागेल. स्पर्धापूर्व अंदाजानुसार, जर्मन संघाला विश्‍वकरंडक राखण्याची संधी आहे. ब्राझीलने १९५८ व १९६२ मध्ये जगज्जेतेपद मिळविले होते, त्यानंतर एकच संघ लागोपाठ दोन वेळा विजेता ठरलेला नाही. यंदा ५६ वर्षांनंतर जर्मनीला संधी आहे, पण प्रत्यक्ष मैदानावर काय होईल याची शाश्‍वती कोणालाच नाही. खुद्द जर्मनीचे प्रशिक्षक ज्योकिम लोव यांनाही. तल्लख आणि कल्पक प्रशिक्षक या नात्याने त्यांना सारे फुटबॉल जगत ओळखते. ‘सलग दुसऱ्यांदा विश्‍वविजेतेपदाचा मार्ग खडतर आहे. विजेतेपदापर्यंत पोचण्यासाठी प्रत्येक खेळाडूस शंभर टक्‍क्‍यांहून अधिक योगदान द्यावे लागेल,’ असे ५८ वर्षीय लोव यांनी रशियातील स्पर्धेपूर्वी सांगितले. खेळाडू हवेत तरंगू नयेत हा त्यामागचा उद्देश. स्पर्धेपूर्वी सराव सामन्यात ऑस्ट्रियाने जर्मनीला पराभवाचा धक्का दिला. साहजिकच लोव सावध आहेत. मात्र त्यांची कार्यशैली जाणणारे या कुशाग्र प्रशिक्षकाबाबत आशावादी आहेत. गतवर्षी रशियातच कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धा झाली. त्या स्पर्धेसाठी लोव यांनी नवोदितांना संधी दिली, तरीही जर्मनीचा संघ विजेता ठरला. खेळाडू अनुभवी असो, वा नवोदित. त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने योगदान मिळविण्याचा लोव यांचा हातखंडा आहे. त्यामुळे जर्मन फुटबॉल महासंघाने त्यांना मुख्य प्रशिक्षकपदी कायम राखले आहे. करार वाढविताना २०२२ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. लोव हे फुटबॉलमधील चाणाक्ष व्यक्तिमत्त्व आहे. चार वर्षांपूर्वी जर्मनीचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीत अग्रेसर नव्हता, पण या संघाने चौथ्यांदा विश्‍वकरंडक जिंकला. रशियात लोव यांच्या मार्गदर्शनाखालील संघ जिंकल्यास पाच वेळा जगज्जेतेपद मिळविलेल्या ब्राझीलशी जर्मनी बरोबरी साधेल.

एका तपाचा प्रवास
जर्मनीचे माजी प्रशिक्षक जुर्गेन क्‍लिन्समन यांच्यामुळे लोव जर्मनीच्या राष्ट्रीय संघ प्रशिक्षण प्रवाहात आले. २००४ मध्ये ते क्‍लिन्समन यांचे सहाय्यक या नात्याने रुजू झाले. २००६च्या विश्‍वकरंडकात जर्मनीने उपांत्य फेरी गाठली. त्यांना तिसरा क्रमांक मिळविला, मात्र क्‍लिन्समन यांनी करारवाढीचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर जुलै २००६ मध्येच लोव यांच्याकडे जर्मनीच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे आली. तेव्हापासून सलग बारा वर्षे ते जर्मन फुटबॉलचा गाभा बनून कार्यरत आहेत. लोव यांच्या कार्यशैलीमुळे सध्या जर्मनीचा संघ ‘फिफा’च्या जागतिक मानांकनात अव्वल स्थानी आहे. जर्मन संघ कोणा एका खेळाडूभोवती केंद्रित नाही. खेळाडू आले अन्‌ गेले, लोव यांची खंबीर संघ घडविण्याचा शैली कायम राहिली. २०१० मधील विश्‍वकरंडकात जर्मनीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, त्याची भरपाई करताना चार वर्षांनंतर जर्मन संघाने विश्‍वविजेतेपद मिळविले. कच खायची नाही, शेवटपर्यंत लढायचे हा लोव यांचा मंत्र. चार वर्षांपूर्वी अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम लढतीत निकाल अतिरिक्त वेळेत लागला. लोव यांनी बदली खेळाडू मारिओ गोट्‌झे याला मैदानात पाठविले. त्यावेळी लोव गोट्‌झेच्या कानात एकच वाक्‍य बोलले, ‘‘सिद्ध कर, की तू मेस्सीपेक्षा सर्वोत्तम आहेस.’’ बदली खेळाडूने संधीचे सोने केले. त्याच्या गोलमुळे लिओनेल मेस्सीचे जगज्जेतेपदाचे स्वप्न उद्‌ध्वस्त झाले. संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात लोव पटाईत आहे, त्याचवेळी ते खेळाडूंचे विनाकारण लाड करत नाहीत. त्यांचा करारी बाणा सारेजण ओळखून आहेत. सक्षम कामगिरीत कमी पडत असल्यामुळे लोव यांनी यंदा गोट्‌झे याला विश्‍वकरंडक संघातून बाहेर ठेवले.

... तर अवघे दुसरे प्रशिक्षक
१५ जुलै रोजी जर्मनीने मॉस्कोतील लुझनिकी स्टेडियमवर विश्‍वकरंडक पटकाविला, तर लोव यांच्या नावे आगळा विक्रम नोंदीत होईल. लागोपाठ दोन वेळा विश्‍वकरंडक जिंकणारे ते दुसरेच प्रशिक्षक बनतील. यापूर्वी व्हिटोरिओ पोझो यांच्या मार्गदर्शनाखाली इटलीने १९३४ व १९३८ मध्ये जगज्जेतेपद मिळविले होते. 

प्रशिक्षक ज्योकिम लोव यांची कामगिरी

  • विश्‍वकरंडक ः विजेतेपद २०१४, तिसरा क्रमांक २०१०
  • युरो करंडक ः उपविजेतेपद २००८, उपांत्य फेरी २०१२, २०१६
  • कॉन्फेडरेशन्स कप ः विजेतेपद २०१७

संबंधित बातम्या