‘युनायटेड’ वर्ल्डकप!

किशोर पेटकर
गुरुवार, 21 जून 2018

क्रीडांगण
 

रशियात सुरू असलेल्या विश्‍वकरंडक (वर्ल्डकप) फुटबॉल स्पर्धेचे वारे सगळीकडे वाहत आहे. स्पर्धेत भारत नाही, तरीही देशात स्पर्धेबाबत उत्सुकता आणि उत्कंठा आहे. १४ जून रोजी मॉस्कोतील लुझनिकी स्टेडिअमवर यजमान रशिया व सौदी अरेबिया यांच्यात सलामीचा सामना झाला, त्यापूर्वी, आठ वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धा कुठे रंगणार याचा निर्णय झाला. ‘फिफा’च्या इतिहासात प्रथमच एकत्रितपणे तीन देशांत विश्‍वकरंडकाच्या आयोजनावर शिक्कामोर्तब झाले आहे. अमेरिका, कॅनडा व मेक्‍सिको हे देश ‘युनायटेड २०२६’ या झेंड्याखाली यजमानपदाच्या रिंगणात उतरले. मोरोक्कोला मागे टाकत ‘उत्तर अमेरिके’ची सरशी झाली. मॉस्कोत झालेल्या ‘फिफा’च्या वार्षिक बैठकीत २०२६ मधील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा अमेरिका (युनायटेड स्टेट्‌स), कॅनडा व मेक्‍सिकोत घेण्याचा निर्णय मतदानानंतर झाला. ‘उत्तर अमेरिके’स २०३ पैकी १३४ मतं मिळाली, तर मोरोक्कोस ६५ मतं मिळाल्यामुळे आफ्रिकेतील हा देश यजमानपदाच्या शर्यतीतून बाद झाला. मोरोक्कोला फ्रान्सचा टेकू होता. आफ्रिकेतील या देशात फ्रेंच बोलणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. सामाजिकदृष्ट्या मोरोक्कोसाठी युरोपातील फ्रान्स देश अधिक जवळचा वाटतो. ‘उत्तर अमेरिके’तील तिन्ही देशांची मोर्चेबांधणी प्रभावी ठरली. या तिन्ही देशांनी एकत्रितपणे सर्वाधिक महसूल देण्याचे आश्‍वासन दिले. फुटबॉलच्या साधनसुविधा, तसेच दळणवळणाच्या बाबतीतही ‘उत्तर अमेरिके’तील देश आघाडीवर आहेत. अमेरिका व मेक्‍सिकोपाशी यापूर्वी विश्‍वकरंडक स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव आहे, तेथे दर्जेदार स्टेडियम व सुविधा उपलब्ध आहे. उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोला आणखी आठ वर्षांनी होणाऱ्या विश्‍वकरंडकासाठी शून्यातून सुरवात करायची होती. 

स्पर्धा असेल अतिभव्य
विश्‍वकरंडक स्पर्धा सहसा एकाच देशात घेतली जाते, अपवाद २००२ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेचा. त्यावर्षी दक्षिण कोरिया आणि जपानने संयुक्तपणे यजमानपद सांभाळले होते. २०२६ मध्ये प्रथमच तीन देशांत संयुक्तपणे स्पर्धा होईल. मेक्‍सिकोत यापूर्वी १९७० व १९८६ मध्ये स्पर्धा झाली होती, तर १९९४ मध्ये अमेरिका यजमान होते. महिलांची विश्‍वकरंडक स्पर्धा झालेल्या कॅनडात पुरुषांच्या फुटबॉलमधील भव्यदिव्य स्पर्धा होण्याची पहिलीच वेळ. स्पर्धा ‘उत्तर अमेरिके’त असली, तर मोठा वाटा अमेरिकेचा (युनायटेड स्टेट्‌स) असेल. मेक्‍सिको व कॅनडा हे सहकारी असतील. ‘उत्तर अमेरिके’तील स्पर्धेद्वारे ११ अब्ज डॉलरचा फायदा होण्याचा दावा आहे. साहजिकच ही स्पर्धा अतिभव्य, संस्मरणीय आणि अनन्यसाधारण असेल. ४८ देशांच्या सहभागामुळे सामन्यांची संख्याही वाढली आहे. २०२६ मधील स्पर्धेमुळे उत्तर अमेरिकेतील तिन्ही देश आणखीनच जवळ येतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी, ‘अ ग्रेट डील ऑफ हार्ड वर्क,’ या शब्दांत ‘युनायटेड २०२६’ या यशस्वी मोहिमेस शाबासकी दिली आहे.

भारतीय वंशाचा वाटा
‘उत्तर अमेरिके’ला २०२६ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेचे यजमानपद मिळवून देण्यात भारतीय वंशाच्या दोघांनी मोलाचा वाटा उचलला आहे. अमेरिकेतील युनायटेड स्टेट्‌स सॉकर महासंघाचे अध्यक्ष कार्लोस कोर्देरो हे मूळचे मुंबईतील, गोमंतकीय वंशाचे. त्यांच्या बालपणी कुटुंबाने अमेरिकेत स्थलांतर केले. या वर्षी फेब्रुवारीत त्यांनी अमेरिकेतील फुटबॉल महासंघाचे अध्यक्षपद स्वीकारले, त्यापूर्वी ते उपाध्यक्ष होते. उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे जन्मलेले सुनील गुलाटी हे युनायटेड स्टेट्‌स सॉकर महासंघाचे तीन वेळचे माजी अध्यक्ष. अमेरिकन फुटबॉलमधील ते बडे प्रस्थ. ‘फिफा’चे ते माजी उपाध्यक्ष व मंडळाचे सदस्य. गुलाटी यांच्या संकल्पनेतून ‘युनायटेड २०२६’ मोहिमेची मुहूर्तमेढ २०१६मध्ये रोवली गेली. गुलाटी आणि कोर्देरो यांनी ‘युनायटेड २०२६’साठी फुटबॉल देशांत विश्‍वास निर्माण करण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळेच यजमानपदाच्या निवडणुकीत ‘उत्तर अमेरिके’स ६७ टक्के मते मिळाली..

दृष्टिक्षेपात २०२६ मधील विश्‍वकरंडक फुटबॉल
    यजमान देश ः अमेरिका, कॅनडा व मेक्‍सिको
     सहभागी देश ः ४८
    एकूण सामने ः ८०, अमेरिकेत ६०, कॅनडा व मेक्‍सिकोत प्रत्येकी १०

संबंधित बातम्या