पहिल्या ‘ग्रॅंड स्लॅम’चा आनंद

किशोर पेटकर
गुरुवार, 21 जून 2018

क्रीडांगण
 

रुमानियाची सिमोना हालेप ही प्रतिभासंपन्न टेनिस खेळाडू. जागतिक महिला एकेरी क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू, पण तिच्या घरच्या कपाटात एकही ग्रॅंड स्लॅम करंडक नव्हता. ‘ग्रॅंड स्लॅम’विना क्रमांक एकची खेळाडू याबद्दल तिला टोमणेही ऐकावे लागत होते. २६ वर्षीय खेळाडूच्या कारकिर्दीतील ही उणीव अखेर भरून निघाली. फ्रेंच ओपनमध्ये ‘कोप सुझान लेंग्लेन’ करंडक जिंकत सिमोनाने पहिल्यावहिल्या ग्रॅंड स्लॅम जेतेपदाचा आनंद साजरा केला. यापूर्वी पॅरिसमध्ये दोन वेळा अंतिम फेरी गाठूनही तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावर्षी जानेवारीत मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीतही तिला हार पत्करावी लागली होती. तिला कॅरोलिन वॉझ्नियाकी हिच्याकडून तीन सेट्‌सच्या प्रतिकारानंतर हार पत्करावी लागली होती. चौथ्या वेळेस सिमोना यशस्वी ठरली. व्यावसायिक टेनिसपटू बनल्यानंतर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत तब्बल बारा वर्षांच्या प्रतीक्षेचे गोड फळ मिळाले. अमेरिकेची स्लोआनी स्टीफन्स हिला तीन सेट्‌समध्ये ३-६, ६-४, ६-१ अशा फरकाने हरवून सिमोनाने मातीच्या कोर्टवरील वर्चस्व सिद्ध केले. स्लोआनीविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर सिमोना यावेळेसही मागील अपयशाची पुनरावृत्ती करेल ही भीती डोके वर काढत होती, मात्र नंतर तिने स्वतःला सावरले. झुंजार खेळाद्वारे पिछाडीवरून मुसंडी मारली. गतवर्षी अमेरिकन ओपन जिंकलेली स्लोआनी ताकदवान खेळासाठी ओळखली जाते. मागील वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत पहिला सेट जिंकूनही सिमोनाला येलेना ओस्टापेन्को हिच्याकडून तीन सेटमध्ये हार पत्करावी लागली होती. अगोदरच्या ग्रॅंड स्लॅम पराभवातून शहाणी झालेल्या सिमोनाने यावेळी संधी निसटू दिली नाही.  

अव्वल क्रमांकावर झेप
सिमोनाने २००६ मध्ये ‘आयटीएफ सर्किट’वर खेळत व्यावसायिक या नात्याने महिला टेनिसमध्ये पदार्पण केले. २०१३ मध्ये तिने सर्वोत्तम खेळ केला. डब्ल्यूटीए स्पर्धांत तिने सहा विजेतीपदे मिळविली. परिणामी त्या वर्षअखेरीस ती अकराव्या स्थानी आहे. त्यानंतर सिमोनाने मागे वळून पाहिलेच नाही. २०१४ मध्येही तिचा धडाका कायम राहिला, रुमानियाच्या खेळाडूचा खेळ बहरला होता. कारकिर्दीत प्रथमच ग्रॅंड स्लॅम अंतिम फेरी गाठताना तिने रशियाच्या मारिया शारोपावास आव्हान दिले. फ्रेंच ओपनमध्ये मारियाने अनुभवाच्या बळावर दुसरा सेट गमावूनही सिमोनाचा पाडाव केला.  फ्रेंच ओपननंतर तिने विंबल्डनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. २०१४ मध्ये तिने कारकिर्दीत प्रथमच तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली. ताकदवान फटक्‍यांच्या बळावर सिमोनाची लक्षवेधक वाटचाल २०१५मध्येही कायम राहिली. त्यावर्षी तिने मानांकनात दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये सिमोनाने सर्वप्रथम महिला एकेरीत अव्वल क्रमांक पटकाविला, पण त्यापूर्वी फ्रेंच ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठूनही तिला विजेतेपद दुरावले होते. मातृत्वामुळे सेरेना विल्यम्स टेनिस कोर्टपासून दूर होती, त्यामुळे सिमोनाची क्रमांक एकपर्यंतची वाटचाल अवघड ठरली नाही. आता रोलाँ गॅरोवरील अजिंक्‍यपदामुळे मानांकनात सिमोनाने दुसऱ्या क्रमांकावरील गार्बिन मुगुरुझा हिच्यावर मोठी आघाडी मिळविली आहे.

आत्मविश्‍वासाची जोड
ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठूनही जिंकण्यात कमी पडणाऱ्या सिमोनाने पॅरिसमध्ये आत्मविश्‍वासावर भर दिला. ती चांगली खेळत होती, फटकेही प्रभावी होते, पण अंतिम टप्प्यात कुठंतरी चुकत होतं. तिला माहित होतं, ग्रॅंड स्लॅम यशाविना क्रमांक एकला काहीच अर्थ नाही. सिमोनाने स्लोआनीचा मुकाबला करताना खेळाचा आनंद लुटण्याचे ठरविले, दबावास झुगारून लावले. शेवटपर्यंत हार मानायची नाही, जिंकायचेच हा निश्‍चय करून ती कोर्टवर उतरली आणि विजेतेपदासह माघारी परतली. संघर्षाविना यश नाही ही बाब सिमोनाला लागू पडते. .

‘ग्रॅंड स्लॅम’मध्ये सिमोना हालेप
     ऑस्ट्रेलियन ओपन ः उपविजेती (२०१८)
     फ्रेंच ओपन ः विजेती (२०१८), उपविजेती (२०१४ व २०१७)
     विंबल्डन ः उपांत्य फेरी (२०१४)
     अमेरिकन ओपन ः उपांत्य फेरी (२०१५)

संबंधित बातम्या