बहरातील ख्रिस्तियानो रोनाल्डो

किशोर पेटकर
गुरुवार, 28 जून 2018

क्रीडांगण
 

पोर्तुगालचा फुटबॉल ‘सुपरस्टार’ ख्रिस्तियानो रोनाल्डो याला ‘सीआर७’ या टोपणनावाने ओळखले जाते. ‘सी’ आणि ‘आर’ ही त्याच्या नावातील इंग्रजी आद्याक्षरे, तर मैदानावर खेळताना तो ‘७’ क्रमांकाची जर्सी वापरतो. रशियात सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पूर्वार्धात ‘सीआर७’चा बहारातील खेळ दिसला. एकंदरीत त्याची ही चौथी विश्‍वकरंडक स्पर्धा आहे. यापूर्वी तो २००६, २०१०, २०१४ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळला होता, १३ सामन्यांत मिळून त्याला तीनच गोल नोंदविता आले होते. त्यामुळे व्यावसायिक क्‍लब पातळीवर हमखास गोल नोंदवितो, परंतु देशातर्फे खेळताना अपयशी ठरतो ही टीका त्याला झेलावी लागत असे. रशियात मात्र रोनाल्डोने साऱ्या टीकाकारांना सणसणीत चपराक दिली. पहिल्या दोन सामन्यात चार गोल नोंदवून त्याने वर्तमानातील आपणच सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू असल्याचे सिद्ध करण्याच्या दिशेने पाऊल टाकले, गोल केल्यानंतर ‘बकरी’प्रमाणे (जी.ओ.ए.टी - ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) आनंद व्यक्त करण्याची शैली तेच दर्शवते. विश्‍वकरंडकातील पहिल्या सामन्यात पोर्तुगालने स्पेनला ३-३ असे गोलबरोबरीत रोखले, सारे गोल एकट्या रोनाल्डोने नोंदविले, त्या लढतीत त्याने फ्रीकिकवर नोंदविलेला गोल अफलातून ठरला. त्याच्या सणसणीत फटक्‍यासमोर स्पेनचा गोलरक्षक डेव्हिड दे गेया याचा मेंदू क्षणिक ‘फ्रिज’ झाला! नंतरच्या लढतीत रोनाल्डोच्या हेडरने पोर्तुगीज संघाला मोरोक्कोविरुद्ध पूर्ण तीन गुण मिळवून दिले. दोन्ही सामन्यात रोनाल्डोने कर्णधारपदास न्याय देताना एकहाती किल्ला लढविला. दोन वर्षांपूर्वी पोर्तुगालला युरो करंडक जिंकून देताना रोनाल्डोने कर्णधार या नात्याने संघाला कमालीचे प्रेरित केले होते. विश्‍वकरंडक पात्रता फेरीतही रोनाल्डोने जबरदस्त खेळ केला होता. त्याने १५ गोल नोंदवून पोर्तुगालची बाजू भक्कम केली होती. 

विक्रमी युरोपियन
उजवा असो वा डावा पाय, रोनाल्डोचे फटके बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुसाट असतात. ही त्याला मिळालेली नैसर्गिक दैवी देणगी आहे. त्याचे हेडरही संधिसाधू. हल्ली तो पेनल्टीवर फटके मारताना चुकत नाही. रोनाल्डोने यशप्राप्तीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. वाढते वय व अनुभवागणिक तो अधिक परिपक्व झालेला आहे, जबाबदारी पेलण्यास शिकलाय. त्याची मैदानावरील अचाट एकाग्रता स्पेनविरुद्ध ‘फ्रीकिक’ गोलच्या वेळेस साऱ्या जगाने पाहिली. मोरोक्कोविरुद्ध रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील ८५वा गोल नोंदविला. त्याचा हा १५२ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. तो आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल नोंदविणारा युरोपियन फुटबॉलपटू बनला आहे. रोनाल्डोने हंगेरीच्या फेरेन्स पुस्कासच्या ८४ गोलांना मागे टाकले. जागतिक विक्रम इराणच्या अली दाएई याच्या नावे आहे. त्याने १०९ आंतरराष्ट्रीय गोल नोंदविले आहेत. स्पेनमधील रियाल माद्रिदतर्फे खेळणाऱ्या रोनाल्डोने केवळ क्‍लब पातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोर्तुगालचे नेतृत्व करतानाही लाजवाब खेळ केला आहे.

हॅट्रीकवीर...
ख्रिस्तियानो रोनाल्डो दिग्गजांच्या पंगतीत दिसतो. स्पेनविरुद्ध त्याने कारकिर्दीतील ५१वी हॅट्रिक नोंदविली. त्याची ही विश्‍वकरंडकातील पहिलीच हॅट्रिक ठरली. त्या लढतीत गोल केल्यामुळे ब्राझीलचा पेले, जर्मनीचे उवे सीलर व मिरोस्लाव क्‍लोज या दिग्गजांप्रमाणे चार विश्‍वकरंडक स्पर्धांत गोल करणारा तो चौथा फुटबॉलपटू ठरला. पोर्तुगालतर्फे विश्‍वकरंडकात हॅट्रिक नोंदविणारा रोनाल्डो अवघा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी युझेबिओ याने १९६६ मध्ये, तर पॉलेटा याने २००२ मधील विश्‍वकरंडकात हॅट्रिकचा मान मिळविला होता. आणखी एक विक्रम त्याच्या नावे नोंदीत झालेला आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात तीन गोल करणारा ३३ वर्षीय रोनाल्डो वयस्क फुटबॉलपटू आहे.  

लक्षवेधक ख्रिस्तियानो रोनाल्डो

  • सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा युरोपियन फुटबॉलपटू
  • चार युरो करंडक स्पर्धांत गोल करण्याचा मान
  • चार वेगवेगळ्या विश्‍वकरंडक स्पर्धांत गोल करणारा पहिला पोर्तुगीज खेळाडू

संबंधित बातम्या