एकोणीसवर्षीय एमबपेची छाप

किशोर पेटकर
गुरुवार, 28 जून 2018

क्रीडांगण
 

रशियातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत दिदिएर देसचॅंप्स यांच्या मार्गदर्शनाखालील फ्रान्स संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून बाद फेरी गाठली. पहिल्या लढतीत त्यांनी ऑस्ट्रेलियास निसटते नमविले, तर दुसऱ्या लढतीत पेरूचा संघर्ष परतावून लावला. हे दोन्ही सामने युवा फुटबॉलपटू किलियान एमबपे याने विक्रमी ठरविले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला प्रशिक्षक देसचॅंप्स यांनी संधी दिली तेव्हा तो विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणारा फ्रान्सचा सर्वांत तरुण फुटबॉलपटू ठरला. वय १९ वर्षे १७८ दिवस. १९८२ मध्ये ब्रुनो बेलानी फ्रान्सकडून विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळला तेव्हा त्याचे वय २० वर्षे ११८ दिवस इतके होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एमबपे याला सूर गवसला नाही. त्याला खूप लवकर संधी मिळाल्याची चर्चा सुरू झाली, पण हा युवा आघाडीपटू पाच दिवसानंतर पुढच्या सामन्यात विश्‍वासात पात्र ठरला. फ्रान्सने ‘क’ गटात पेरूला एका गोलने हरविले. निर्णायक गोल एमबपे याने पूर्वार्धात नोंदविला, त्यामुळे साखळी फेरीतील एक सामना बाकी असताना फ्रेंच संघाला पुढील फेरी पक्की करता आली. एमबपेचा हा गोल विक्रमी ठरला. विश्‍वकरंडकाच्या मुख्य फेरीत गोल करणारा तो सर्वांत युवा फ्रेंच फुटबॉलपटू बनला. गोल नोंदविला तेव्हा तो १९ वर्षे १८३ दिवसांचा होता. यापूर्वी डेव्हिड ट्रेझेग्युएट (२० वर्षे २४६ दिवस) हा फ्रान्सचा युवा विश्‍वकरंडक ‘गोलस्कोअरर’ होता. एमबपे याच्याकडून फ्रेंच फुटबॉलला खूप अपेक्षा आहेत. तो तरुण प्रतिभाशाली ‘स्ट्रायकर’ आहे. भविष्यातील स्टार या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच त्याला यंदा विश्‍वकरंडक संघात स्थान मिळाले. एमबपेच्या गोलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जून-जुलै १९९८ मध्ये यजमान फ्रान्सने विश्‍वकरंडक जिंकला. त्यानंतर जन्मलेल्या खेळाडूने प्रथमच राष्ट्रीय संघासाठी ‘वर्ल्डकप’मध्ये गोल नोंदविला.

थिएरी हेन्रीशी तुलना
फ्रान्सचा महान फुटबॉलपटू थिएरी हेन्रीशी एमबपे याची तुलना होते, याचं कारण म्हणजे त्याची अफाट गुणवत्ता व खेळण्याची शैली. वयाच्या अकराव्या वर्षी त्याने इंग्लंडमधील चेल्सी क्‍लबसाठी चाचणी दिली होती. लहान वयातच तो काही फ्रेंच व स्पॅनिश क्‍लबच्या संपर्कात होता. २०१६ मध्ये फ्रान्सने १९ वर्षांखालील युरो करंडक जिंकला, त्यावेळेस एमबपेचा अफलातून खेळ साऱ्यांनाच भावला. त्याची युवा कारकीर्द एएस बाँडी संघातर्फे बहरली, त्यानंतर तो मोनॅको संघात आला. २०१५ मध्ये या संघाच्या सीनियर चमूत तो निवडला गेला. पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाने त्याला गतमोसमात ‘लोन’ पद्धतीनुसार करारबद्ध केले. क्‍लब पातळीवर २०१७-१८ मोसम त्याच्यासाठी यशस्वी ठरला. ‘पीएसजी’ संघाने मोसमात ‘लीग १’, ‘कोप द फ्रान्स’ व ‘कोप द ला लीग’ या तिन्ही स्पर्धा जिंकल्या. त्यात एमबपेने उल्लेखनीय खेळ केला. त्याच्या चमकदार फॉर्ममुळे विश्‍वकरंडक संघात निवडणे प्रशिक्षक डेसचॅंप्स यांच्यासाठी सोपे ठरले. १९ वर्षीय खेळाडूची नुकतीच कुठे सुरवात आहे. दिग्गज थिएरी हेन्रीच्या जवळपास जाण्यासाठी त्याला मोठी मजल मारावी लागेल हे स्पष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय पदार्पण
एकातेरीनबर्ग येथे एमबपेने पेरूविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सतराव्या सामन्यात पाचवा गोल नोंदविला. २५ मार्च २०१७ रोजी त्याने लक्‍झेमबर्गविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. हा विश्‍वकरंडक पात्रता सामना होता. तेव्हा त्याचे वय १८ वर्षे, तीन महिने व पाच दिवस इतके होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्याने नेदरलॅंड्‌सविरुद्धच्या विश्‍वकरंडक पात्रता लढतीत आंतरराष्ट्रीय गोलांचा शुभारंभ केला. पॅरिसमध्ये जन्मलेला हा गुणवान स्ट्रायकर आफ्रिकन वंशाचा. वडील विल्फ्रेड कॅमेरूनचे, तर आई फाईजा या अल्जेरियन. वडील फुटबॉल प्रशिक्षक असल्यामुळे किलियान एमबपे लहान वयातच फुटबॉल मैदानाकडे आकर्षिला गेला. वडील हेच त्याचे प्रारंभिक प्रशिक्षक व आता ‘एजंट’ही आहेत.  

फुटबॉलपटू किलियान एमबपे...

  • जन्मतारीख ः २० डिसेंबर १९९८        
  • खेळण्याची जागा ः आघाडीफळी
  • क्‍लब संघ ः एएस बाँडी (युवा), मोनॅरो, पॅरिस सेंट जर्मेन
  • राष्ट्रीय संघ ः फ्रान्स, मार्च २०१७ पासून

संबंधित बातम्या