शापित प्रतिभेचा खेळाडू...

किशोर पेटकर
मंगळवार, 17 जुलै 2018

क्रीडांगण
 

लिओनेल मेस्सी हा जागतिक फुटबॉलमधील ‘सुपरस्टार’. क्‍लब पातळीवर स्पेनमधील बार्सिलोना संघातून खेळताना या ‘द ग्रेट’ खेळाडूने कितीतरी वेळा विजेतेपदाचा जल्लोष केला आहे, पण राष्ट्रीय संघातून तो यशाच्या परमोच्च बिंदूपासून दूरच आहे. हो, मेस्सीला अजूनही विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. अर्जेंटिनाच्या या हुकमी खेळाडूच्या झळाळत्या कारकिर्दीतील ही उणीव यंदा रशियातही कायम राहिली. मेस्सीच्या अर्जेंटिनाचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. ३१ वर्षीय मेस्सी विश्‍वविजेता बनू शकला नाही. चार वर्षांपूर्वी, ब्राझीलमधील स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ लक्ष्यप्राप्तीच्या अगदी जवळ आला होता, पण अतिरिक्त वेळेतील मारिओ गोत्झे याच्या गोलमुळे जर्मनीचा संघ वरचढ ठरला. यंदा अर्जेंटिनाची कामगिरी खूपच कमजोर ठरली. नवोदित आईसलॅंड संघाने त्यांना पहिल्याच लढतीत १-१ असे गोलबरोबरीत रोखून मोठा धक्का दिला, मेस्सीचा पेनल्टी फटका रोखला गेला. नंतर क्रोएशियाने त्यांना सहजपणे हरविले. मेस्सीचा संघ साखळी फेरीतच गारद होण्याच्या वाटेवर होता. नायजेरियाविरुद्ध मेस्सीने संघाचा पहिला गोल केला. दिएगो माराडोना व गाब्रिएल बाटिस्टुटा यांच्यानंतर तीन विश्‍वकरंडक स्पर्धांत गोल करणारा तो अर्जेंटिनाचा तिसरा फुटबॉलपटू ठरला. नायजेरियाविरुद्ध मार्कोस रोहा याच्या निर्णायक गोलमुळे अर्जेंटिनास निसटता विजय मिळाला आणि साखळी फेरीतच बाद होण्याची नामुष्की टळली. अर्जेंटिनाची गाडी रुळावर येतेय असं वाटत असतानाच, फ्रान्सने मेस्सीच्या संघाला परतीचे तिकीट काढण्यास भाग पाडले. सामना रंगला, पण नव्या दमाच्या किलियन एम्बापे याच्या धडक्‍यासमोर मेस्सी फिका ठरला. 

झोळी रिकामी
अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील फुटबॉलवेडा देश. त्यांनी १९७८ व १९८६ मध्ये जगज्जेतेपद, तर १९३०, १९९० व २०१४ मध्ये उपविजेतेपद मिळविले. फुटबॉलला धर्म मानणाऱ्या या देशातील मेस्सी हा वर्तमानकाळातील ‘महान’ फुटबॉलपटू. यंदा तो सलग चौथ्यांदा विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभागी झाला, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाची विश्‍वकरंडकात झोळी रिकामीच राहिली. मेस्सीचे वय लक्षात घेता तो २०२२ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता आहे. मेस्सीसाठी रशियातील विश्‍वकरंडक स्पर्धा शेवटची असू शकते. त्याची तंदुरुस्तीही महत्त्वाची असेल. दबाव झेलत खेळणं सोपं नसते. फ्रान्सचे प्रशिक्षक दिदियर देसचाम्प्स्‌ यांनी मेस्सीची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. प्रत्येक प्रतिस्पर्धी प्रशिक्षकाचे लक्ष्य मेस्सीच असते. त्याला मोकळीक द्यायची नाही अशीच व्यूहरचना होते. रशियात मेस्सीला फक्त एकच गोल नोंदविता आला. क्‍लब पातळीवर मेस्सी भन्नाट खेळतो. मागील मोसमात त्याने बार्सिलोना क्‍लबतर्फे ४५ गोल नोंदविले, त्याच्या संघाने स्पॅनिश लीग विजेतेपदही पटकाविले. सलग दुसऱ्या वर्षी तो ‘युरोपियन गोल्डन शू’ किताबाचा मानकरी ठरला. मात्र राष्ट्रीय संघातून खेळताना विजेतेपदापर्यंतच्या वाटचालीत मेस्सी अडखळतो. केवळ विश्‍वकरंडक स्पर्धाच नव्हे, तर दक्षिण अमेरिकेतील ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेतही तो उपविजेताच आहे.

अतृप्त कारकीर्द
विश्‍वकरंडक हाती नसल्यामुळे मेस्सीची कारकीर्द अतृप्त आहे. चार वर्षांपूर्वी मेस्सीने विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळ केला, तरीही उपविजेतेपदामुळे त्याची वैयक्तिक कामगिरी झाकोळली गेली. ब्राझीलमधील स्पर्धेत ‘गोल्डन बॉल’चा मानकरी ठरूनही विश्‍वकरंडक जिंकू न शकल्याची खंत मेस्सीच्या चेहऱ्यावर होती. दोन वर्षांपूर्वी कोपा अमेरिका स्पर्धेत विजेतेपद निसटल्यानंतर हताश मेस्सीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती स्वीकारली, नंतर  देशवासीयांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला. मेस्सीला देशासाठी पुन्हा मैदानात उतरावे लागले. या जिगरबाज आघाडीपटूने सात गोल नोंदवत दक्षिण अमेरिकेतील पात्रता फेरीतून अर्जेंटिनाला रशियात आणले, पण विश्‍वकरंडक कोसो दूर राहिला. माजी जगज्जेता माराडोनाशी होणाऱ्या तुलनेत मेस्सीच्या हाती विश्‍वकरंडक नाही. आंतरराष्ट्रीय मैदानावर त्याची प्रतिभा शापित आहे!

‘उपविजेता’ लिओनेल मेस्सी

  • विश्‍वकरंडक ः २०१४
  • कोपा अमेरिका ः २००७, २०१५, २०१६
  • विश्‍वकरंडक सहभाग ः २००६, २०१०, २०१४, २०१८

संबंधित बातम्या