स्पेनच्या इनिएस्टाचा ‘गुडबाय’

किशोर पेटकर
मंगळवार, 17 जुलै 2018

क्रीडांगण
 

रशियातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या स्पेनला विशेष पराक्रम बजावता आला नाही. पेनल्टी शूटआऊटवर यजमान रशियाने त्यांना परतीचा रस्ता दाखविला. स्पेनचा पराभव आणखी एका कारणास्तव स्मरणात राहील. त्यांचा अनुभवी मध्यरक्षक आंद्रेस इनिएस्टा याने या पराभवासोबतच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. स्पेनच्या चाहत्यांना त्यामुळे संघाच्या पराभवाइतक्‍याच इनिएस्टाच्या निवृत्तीमुळेही वेदना झाल्या. स्पेनच्या सफल ‘टिकी-टाका’ शैलीतील हा जाणकार खेळाडू. १३१ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर या ३४ वर्षीय मध्यरक्षकाने आंतरराष्ट्रीय मैदानावर थांबायचे ठरविले. इनिएस्टा फुटबॉलप्रेमींच्या स्मरणात दीर्घकाळ राहील. यंदा स्पेनला विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सुरवातीलाच धक्का बसला होता. प्रशिक्षक हुलेन लोपेटेगी यांनी स्पॅनिश फुटबॉल महासंघाला अंधारात ठेवून रियाल माद्रिद संघाचे प्रशिक्षक या नात्याने करार केला. शिस्तभंगाच्या कारवाईअंतर्गत लोपेटेगी यांना पदच्युत करण्यात आले. विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होण्यास दोन दिवस असताना प्रशिक्षकपदी फर्नांडो हिएरो यांची नियुक्ती झाली, पण स्पेनच्या संघाला नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सूर गवसला नाही. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यांत इनिएस्टा ‘स्टार्टिंग लिस्ट’मध्ये होता, रशियाविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व लढतीत हिएरो यांनी इनिएस्टाचा वापर बदली खेळाडू या नात्याने केला. तेव्हाच स्पष्ट झाले होते, की इनिएस्टा याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अखेर जवळ आली आहे. या अनुभवी खेळाडूनेही जास्त ताणले नाही. पेनल्टी शूटआऊटवर गोल केल्यानंतर त्याच रात्री त्याने निवृत्ती जाहीर केली. 

यशस्वी फुटबॉलपटू
फुटबॉलमधील इनिएस्टाची कामगिरी देदीप्यमान आहे. हा चपळ मध्यरक्षक स्पेनच्या ‘टिकी-टाका’ फुटबॉल शैलीत कमालीचा यशस्वी ठरला. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द बारा वर्षांची. २००६ ते २०१८. आठ वर्षांपूर्वी स्पेनने दक्षिण आफ्रिकेत विश्‍वकरंडक जिंकला. नेदरलॅंड्‌सविरुद्ध अंतिम लढतीत इनिएस्टाने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडत स्पेनला प्रथमच जगज्जेतेपद मिळवून दिले. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत ११६व्या मिनिटास इनिएस्टाने केलेला गोल मौल्यवान ठरला. स्पेनने २००८ व २०१२ मध्ये युरो करंडक पटकावला. दोन्ही वेळेस इनिएस्टाने संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. वयाच्या बाराव्या वर्षी तो बार्सिलोना क्‍लबच्या ‘कुटुंबा’त रुजू झाला. त्यानंतर या संघाचा तो अविभाज्य भाग बनला. ‘बार्सा’बरोबरच्या २२ वर्षांच्या कालखंडात त्याने ३२ करंडक जिंकले. या वर्षी बार्सिलोना क्‍लबने स्पॅनिश लीग स्पर्धा जिंकली. त्यानंतर यावर्षी मे महिन्यात इनिएस्टाने या क्‍लबला सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केले. त्याचा हा निर्णय धक्कादायकच होता, त्यानंतर स्पेनसाठीही तो विश्‍वकरंडक स्पर्धेत शेवटचे खेळेल हा कयास खरा ठरला. नव्या मोसमात इनिएस्टा जपानमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळेल. तेथील व्हिसेल कोबे संघाशी त्याने करार केला आहे, तरीही इनिएस्टाची खरी ओळख स्पेन आणि बार्सिलोनाचा ‘सुपरस्टार’ अशीच राहील.

आक्रमक मध्यरक्षक
स्पेनच्या मध्यफळीत इनिएस्टा समन्वयकाची भूमिका चोख बजावायचा. त्यामुळे संघाच्या आक्रमणाला धार चढत असे. कारकिर्दीच्या सुरवातीस तो ‘बचावात्मक मध्यरक्षक’ या नात्याने खेळत असे, मात्र ‘आक्रमक मध्यरक्षक’ या जागी त्याची कारकीर्द बहरली. स्पेनचे माजी प्रशिक्षक लुईस अरागोनीस व व्हिसेंट डेल बॉस्के यांनी इनिएस्टाच्या नैसर्गिक गुणवत्तेचा खुबीने वापर केला. त्यांच्या मते हा फुटबॉलपटू ‘परिपूर्ण’ खेळाडू होता. चेंडूवरील अफलातून नियंत्रणामुळे त्याचा खेळ प्रगतीपथावर राहिला. त्याच्या निवृत्तीनंतर फर्नांडो हिएरो म्हणाले, ‘‘आमच्या फुटबॉल इतिहासातील तो एक महान खेळाडू आहे.’’ ही प्रतिक्रिया शंभर टक्के सत्य आहे.

आंद्रेस इनिएस्टाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

  • पदार्पण ः २७ मे २००६, विरुद्ध रशिया
  • एकूण सामने ः १३१, एकूण गोल ः १३
  • पहिला गोल ः विरुद्ध इंग्लंड, ७ फेब्रुवारी २००७
  • स्पेनतर्फे जिंकलेले करंडक ः ३, युरो कप २००८ व २०१२, विश्‍वकरंडक २०१०

संबंधित बातम्या