वैभवशाली वाटेवरील ‘लक्ष्य’

किशोर पेटकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

क्रीडांगण

भारतीय बॅडमिंटनची परंपरा वैभवशाली आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणारा हा खेळ देशात लोकप्रियतेच्या लाटेवरही स्वार आहे. भारतीय बॅडमिंटनमधील सफल दिग्गजांच्या यादीत एक कोवळं नाव शिरकाव करत आहे. लक्ष्य सेन हा प्रतिभाशाली युवा बॅडमिंटनपटू. उत्तराखंडच्या या हरहुन्नरी खेळाडूने सतरावा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच मोठी झेप घेतली. बंगळूरस्थित प्रकाश पदुकोण यांच्या बॅडमिंटन अकादमीत खेळाचे शास्त्रोक्त धडे गिरवणाऱ्या लक्ष्यने नुकतीच आशियाई ज्युनिअर स्पर्धा जिंकली. जाकार्ता येथे झालेल्या या स्पर्धेत लक्ष्यने जबरदस्त खेळ केला. त्याने ज्युनिअर गटातील सध्याचा विश्‍वविजेता थायलंडचा कुन्लावूत वितिदसर्न याला चकित केले. लक्ष्यला सहावे मानांकन होते. संपूर्ण स्पर्धेत त्याने फक्त एक गेम गमावला, यावरून त्याच्या खेळातील सातत्य आणि धडाक्‍याची कल्पना येते. आशियाई ज्युनिअर स्पर्धेत लक्ष्य ‘जायंट किलर’ ठरला. त्याने अफलातून जिद्द प्रदर्शित केली. लक्ष्यने उपांत्य सामन्यात जागतिक ज्युनिअर क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या इख्सान लिओनार्दो रुम्बे याला, तर अगोदरच्या लढतीत चीनचा जागतिक ज्युनिअर तृतीय क्रमांकावरील ली शिफेंग याला हरविले होते. बलाढ्य खेळाडूंविरुद्ध हा नौजवान आत्मविश्‍वासाने आणि कणखरपणे खेळला. त्रास देणारा गुडघा व खांद्याकडे दुर्लक्ष करत त्याने करंडकास गवसणी घातली. दोन वर्षांपूर्वी लक्ष्यने आशियाई ज्युनिअर स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते, यंदा पदकाचा रंग सोनेरी झाला!

तिसरा भारतीय

भक्कम मनोबल लक्ष्यच्या चतुरस्त्र खेळात निर्णायक ठरते. त्याचे ताकदवान आक्रमक फटके प्रतिस्पर्ध्यास जेरीस आणतात. आशियाई ज्युनिअर एकेरी किताब जिंकणारा तो तिसराच भारतीय ठरला. तब्बल ५३ वर्षांनंतर ज्युनिअर पुरुष गटातील आशियाई विजेतेपद भारतात आले. गौतम ठक्करने १९६५ मध्ये मुलांत ज्युनिअर आशियाई किताब पटकाविला होता. त्यानंतर ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने २०१२ मध्ये ज्युनिअर मुलींत आशियाई विजेतेपद मिळविले होते. आता लक्ष्यने शिखर सर केले आहे. ज्युनिअर पातळीवर ही स्पर्धा जिंकलेल्या बॅडमिंटनपटूंनी नंतर सीनियर गटातही भरपूर नावलौकिक मिळविल्याची उदाहरणे आहेत. भारतीयांसाठी सिंधूची यशोमालिका बोलकी आहे. तौफिक हिदायत (१९९७), लीन डॅन (२०००), चेन लाँग (२००७) यांनीही आशियाई ज्युनिअर स्पर्धा जिंकलेली आहे, नंतर त्यांनी ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्याइतपत मजल मारली. लक्ष्यला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. लहान वयात ज्यांनी लक्ष्यची उपजत गुणवत्ता हेरली ते भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आशावादी आहेत.  लक्ष्यची प्रतिभा अपवादात्मक असल्याचे मत पदुकोण यांनी नोंदविले आहे. पाच वेळा जागतिक, तर दोन वेळा ऑलिंपिक विजेता ठरलेला चीनचा महान खेळाडू लीन डॅन याच्याशी लक्ष्यची यावर्षी दोन वेळा गाठ पडली. न्यूझीलंड ओपन  आणि थॉमस कप स्पर्धेत चिनी खेळाडूस विजयासाठी तीन गेम्समध्ये संघर्ष करावा लागला.

बॅडमिंटनसाठी हट्ट

लक्ष्यचे वडील डी. के. सेन हे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील बॅडमिंटन प्रशिक्षक. त्यामुळे घरात बॅडमिंटनची चर्चा नित्याचीच. मोठा भाऊ चिराग हा चांगलं बॅडमिंटन खेळायचा. त्याची प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत रुजू करण्याचे ठरले. चिरागबरोबर आलेल्या लक्ष्यनेही बंगळूरमध्ये बॅडमिंटन अकादमीत भरती होण्याचा हट्ट धरला, तेव्हा तो साधारणतः आठ वर्षांचा होता. पदुकोण यांच्या छत्राखाली लक्ष्यचे बॅडमिंटन कौशल्य बहरले. भारताचे आणखी एक महान बॅडमिंटनपटू विमल कुमार यांचेही त्याला मौलिक मार्गदर्शन मिळाले. माजी महिला बॅडमिंटनपटू सायली गोखले या पदुकोण अकादमीत प्रशिक्षक आहेत. सायली यांच्याकडे लक्ष्यच्या मार्गदर्शनाची जबाबदारी आली. पदुकोण यांच्या अकादमीत लक्ष्यच्या अंगभूत बॅडमिंटन कौशल्यास सुरेख पैलू पाडले गेले. या जिगरबाज युवा खेळाडूने मेहनतीवर भर देत फेब्रुवारी २०१७ मध्ये जागतिक ज्युनिअर क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले.

लक्ष्य सेनविषयी...

  •      जन्मतारीख ः १६ ऑगस्ट २००१
  •      जन्मस्थळ ः अल्मोरा-उत्तराखंड
  •      जिंकलेली प्रमुख ज्युनिअर बॅडमिंटन पदके ः सुवर्ण - आशियाई स्पर्धा २०१८, ब्राँझ - आशियाई स्पर्धा २०१६
  •      बीडब्ल्यूएफ आंतरराष्ट्रीय चॅलेंज/सीरिज विजेतीपदे ः ३

संबंधित बातम्या