राष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अनास

किशोर पेटकर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

क्रीडांगण
 

महंमद अनास याहिया या धावपटूने पुन्हा एकदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत ४५.२४ सेकंद ही सुधारित वेळ नोंदविला. या कामगिरीमुळे अनासला चेक प्रजासत्ताकातील स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले, त्याचबरोबर आशियायी क्रीडा स्पर्धेत त्याच्याकडून पदकाची अपेक्षाही उंचावली आहे. या २३ वर्षीय धावपटूची वर्षभरातील कामगिरी खूपच आश्‍वासक आहे. या वर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याला चौथा क्रमांक मिळाला. १९५८ मध्ये दिग्गज मिल्खा सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत धावले होते, त्यानंतर अनासच्या रूपात प्रथमच भारतीय प्रतिनिधित्व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ४०० मीटर ट्रॅकवर दिसले. गोल्ड कोस्टला अनासने ४५.३१ सेकंद वेळ नोंदवून वर्षभरापूर्वी नोंदविलेला स्वतःचाच विक्रम मोडला. नवी दिल्लीत झालेल्या इंडियन ग्रांप्री शर्यतीत अनासने ४०० मीटर अंतर ४५.३२ सेकंद वेळेत पूर्ण केले होते. चेक प्रजासत्ताकातील कामगिरीमुळे अनास इंडोनेशियात होणाऱ्या आशियायी क्रीडा स्पर्धेत पदक जिंकू शकतो, असे ॲथलेटिक्‍समधील जाणकारांना वाटते, कारण- त्याची धाव स्पर्धेगणिक वेगवान झाल्याचे पाहायला मिळते.

होता लांबउडीपटू...
महंमद अनास हा केरळमधील निलामेल येथील. हे नगर तिरुवनंतपुरम येथून सुमारे एका तासाच्या अंतरावर आहे. त्याचे वडील याहिया हे सौदी अरेबियात दुकानदार होते. त्यांच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ आई शीना यांनीच केला. त्या शालेय पातळीवर ॲथलिट्‌स होत्या. त्यांनी अनास व धाकटा मुलगा अनीस यांना ॲथलेटिक्‍सच्या मैदानावर जाण्यापासून रोखले नाही. अनास व अनीस दोघेही लांबउडीपटू. निलामेल येथील ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक बी. अन्सार यांनी अनासची उपजत गुणवत्ता हेरली. अन्सार यांच्या अकादमीत अनास रुजू झाला, तेव्हा तो सहाव्या इयत्तेत शिकत होता. नंतर तो प्रगत प्रशिक्षणासाठी कोचीनजीकच्या कोटमंगलम येथील मार बासिल स्कूलमध्ये रुजू झाला. २०१२ मध्ये राज्य पातळीवरील शालेय स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत खेळाडू कमी पडतो म्हणून प्रशिक्षक सिबी यांनी अनासला या शर्यतीत धावण्याची विचारणा केली. लांबउडी घेण्यापूर्वी अनासची धावण्याची शैली एखाद्या तरबेज धावपटूस साजेशी होती. अनासने आव्हान स्वीकारले व तो धावला. त्यानंतर ४०० मीटरमध्ये या मेहनती आणि प्रतिभाशाली धावपटूने प्रचंड प्रगती साधली. दोन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्येही तो धावला. २०१५ मध्ये केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याच्या गुणवत्तेने सेनादलाच्या प्रशिक्षकांना प्रभावित केले. त्याच वर्षी तो सेनादलात भरती झाला. सेनादलाचे प्रशिक्षक टी. जी. अजेश यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने ४६ सेकंदांच्या आत धाव पूर्ण करण्याइतपत मजल मारली. राष्ट्रीय शिबिरात दाखल झाल्यानंतर अनास आणखीनच प्रावीण्यसंपन्न बनला. गॅलिना बुखारिना यांचे मार्गदर्शन भारतीयांसाठी परिणामकारक ठरले आहे.

राष्ट्रकुल पदक हुकले
अनासचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक अगदी थोडक्‍यात हुकले. त्याने तुफानी धाव घेत सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदविली. जमैकाच्या जॅव्हॉन फ्रान्सिस याने ४५.११ सेकंदात ब्राँझपदक जिंकले. किंचित वेगाने धावला असता, तर चौथ्या स्थानी राहिलेला अनास तिसऱ्या क्रमांकावर दिसला असता. गोल्ड कोस्टमधील कामगिरीने प्रेरित झालेला अनास चेक प्रजासत्ताकातील स्पर्धेत जबरदस्त वेगाने धावला. त्याने आपली गती वाढल्याचे सिद्ध केले. दोन वर्षांपूर्वी पोलंडमधील ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ४५.४० सेकंद वेळ नोंदवून अनासने रिओ ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविली होती. 

मिल्खा सिंग व के. एम. बिनू यांच्यानंतर ४०० मीटर शर्यतीत ऑलिंपिक पात्रता मिळविणारा तो तिसराच भारतीय ठरला होता. रिओत आणि गतवर्षी लंडन जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेतही तो धावला, त्याला मोठा पराक्रम बजावता आला नाही, मात्र अनुभवाने तो प्रगल्भ बनला.
 
प्रगतिपथावरील महंमद अनास (४०० मीटर शर्यत)
     ४५.४० सेकंद ः पोलंडमधील स्पर्धा, जुलै २०१६
     ४५.३२ सेकंद ः नवी दिल्लीतील इंडियन ग्रांप्री, मे २०१७
     ४५.३१ सेकंद ः गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा, एप्रिल २०१८
     ४५.२४ सेकंद ः चेक प्रजासत्ताकातील स्पर्धा, जुलै २०१८

संबंधित बातम्या