सावरलेली बीट्रिस!

किशोर पेटकर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

क्रीडांगण
 

वर्षभरापूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिला स्टीपलचेस प्रकारात केनियाच्या महिला धावपटूची फजिती झाली. तिने पहिल्या ‘वॉटर जंप’ला चकवा देत धावण्यास सुरवात केली. लगेच तिच्या लक्षात ही चूक आली. ती माघारी आली व पुन्हा धावण्यास सुरवात केली. या गडबडीत त्या महिला धावपटूचा सुमारे आठ सेकंदाचा वेळ वाया गेला, तरीही जिद्दीने ही केनियन धावपटू अडथळ्यांवर मात करत धावली व चौथी आली. पदक हुकले. बीट्रिस चेपकोएच हे या २७ वर्षीय धावपटूचे नाव. तिच्या चुकीचा व्हीडीओ सर्वत्र ‘व्हायरल’ झाला, पण तिने जिगर गमावली नाही. यंदा मोनॅको येथील ३,००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत याच महिला धावपटूने नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. तिने आठ मिनिटे ४४.३२ सेकंदात शर्यत पूर्ण करून मोठ्या धडाक्‍यात गतवर्षीच्या चुकीची भरपाई केली. या धाडसी महिलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. विश्‍वविक्रमी कामगिरीनंतर बीट्रिसचे मायदेशात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. वेगवान कामगिरीने प्रेरित झालेल्या या मेहनती धावपटूने आता आपलाच विश्‍वविक्रम मोडण्याचे लक्ष्य बाळगले आहे. लंडनमध्ये धावताना गफलत झाली, पण ती नाउमेद झाली नाही. रिओ ऑलिंपिकनंतर जागतिक स्पर्धेतही तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

स्टीपलचेसमध्ये यश
बीट्रिस ही धावण्याच्या स्टीपलचेस प्रकारात तशी नवखीच. १५०० मीटर धावण्याची शर्यतीत ती पारंगत होती. शिवाय १० किलोमीटर रोड रेसमध्येही भाग घेत असे. २०१५ मध्ये तिने आफ्रिकन गेम्समध्ये १५०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक पटकाविले होते. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून बीट्रिस स्टीपलचेस शर्यतीत नियमित भाग घेऊ लागली. रिओ ऑलिंपिकसाठी तिने याच शर्यतीवर भर दिला. तेथे तिला पदक हुकले, मात्र वैयक्तिक कामगिरी कमालीची सुधारली. वेग वाढविण्यावर भर देत तिचा सराव कायम राहिला. त्याचे गोड फळ तिला मोनॅकोत मिळाले. यावर्षी झालेल्या जागतिक इनडोअर ॲथलेटिक्‍स स्पर्धेत बीट्रिसने १५०० मीटर शर्यतीत अनुभव आजमावला. ती विजेती ठरला. एप्रिलमध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिला १५०० मीटरमध्ये तिला रौप्यपदक मिळाले. या कामगिरीनंतर डायमंड लीग मालिकेत ती पुन्हा स्टीपलचेसकडे वळली. मोनॅकोत तिने ८ मिनिटे ४४.३२ सेकंद ही विश्‍वविक्रमी वेळ नोंदविताना ऑलिंपिक विजेत्या रूथ जेबेट हिचा विक्रम मोडीत काढला. आता बाहरीनचे नागरिकत्व स्वीकारलेली रूथ मूळची केनियन. रुथने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८ मिनिटे ५२.७८ सेकंद वेळ नोंदवत विश्‍वविक्रम केला होता. 

कामगिरीत सुधारणा
महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यत सर्वप्रथम नऊ मिनिटांच्या आत पूर्ण करण्याचा मान रशियाच्या गुल्नारा सामितोवा हिने मिळविला होता. तिने ऑगस्ट २००८ मध्ये आठ मिनिटे ५८.८१ सेकंदात शर्यत संपवून विश्‍वविक्रम नोंदविला. तिचा हा विक्रम आठ वर्षे अबाधित राहिला. ऑगस्ट २०१६ मध्ये रुथ जेबेट हिने आठ मिनिटे ५२.७८ सेकंद वेळ नोंदविल्यानंतर आता बीट्रिसने त्यावर 
कडी केली. केनियन धावपटूने कामगिरीत कमालीची सुधारणा प्रदर्शित केली आहे.
रिओ ऑलिंपिकमध्ये तिला हे अंतर पूर्ण करण्यासाठी नऊ मिनिटे १६.०५ सेकंद वेळ लागला होता. त्यानंतर गतवर्षी झुरिच येथील स्पर्धेत ती प्रथमच नऊ मिनिटांचा आत शर्यत पूर्ण करण्यास यशस्वी ठरली. यावर्षी जूनमध्ये पॅरिसमधील स्पर्धेत बीट्रिसने आठ मिनिटे ५९.३६ सेकंद ही कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ नोंदविली. प्रगतिपथावरील या महिला धावपटूने महिनाभरातच सुमारे १५ सेकंद फरकाने वेगवान कामगिरी साकारली. ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम नोंदविणारी पहिली केनियन धावपटू हा मान तिने मिळविला. 

बीट्रिसची उंचावलेली कामगिरी (३००० मीटर स्टीपलचेस)
     ५ मे २०१७, दोहा ः ९ मिनिटे ०१.५७ सेकंद
     २६ मे २०१७, युजिन ः ९ मिनिटे ००.७० सेकंद
     २४ ऑगस्ट २०१७, झुरिच ः ८ मिनिटे ५९.८४ सेकंद
     ३० जून २०१८, पॅरिस ः ८ मिनिटे ५९.३६ सेकंद
     २० जुलै २०१८, मोनॅको ः ८ मिनिटे ४४.३२ सेकंद (विश्‍वविक्रम)

संबंधित बातम्या