क्रिकेटचा वारसा जपणारा सॅम

किशोर पेटकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

क्रीडांगण
 

भारताविरुद्धच्या बर्मिंगहॅम येथील कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला नवा ‘मॅच विनर’ गवसला. कसोटी कारकिर्दीत अवघ्या दुसऱ्या सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कार जिंकत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सॅम करन हे या नवोदित क्रिकेटपटूचे नाव. तो अवघ्या वीस वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकतीच त्याची सुरवात आहे, अष्टपैलुत्वाच्या बळावर त्याने अपेक्षा उंचावल्या आहेत. विशेष बाब म्हणजे तो ‘करन’ घराण्याचा क्रिकेटमधील वारसा जपत आहे. झिंबाब्वेचे माजी अष्टपैलू केविन करन यांचा तो मुलगा. सॅम याचे आजोबाही क्रिकेटपटू होते. केविन यांनी झिंबाब्वेचे १९८३ व १९८७ मधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. केविन प्रथम श्रेणी क्रिकेट भरपूर खेळले. इंग्लिश कौंटीत त्यांनी ग्लुस्टरशायर व नॉर्दम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. केविन यांचे तिघेही मुलगे क्रिकेटपटू. मोठा टॉम आहे २३ वर्षांचा. तो वेगवान गोलंदाज असून इंग्लंडतर्फे दोन कसोटी, आठ एकदिवसीय व सहा टी-२० सामने खेळला आहे. मधला बेन हा २२ वर्षांचा असून फिरकी गोलंदाज आहे, मात्र त्याने मोठा पल्ला गाठलेला नाही. सर्वांत लहान सॅम याने भारताविरुद्धची कसोटी गाजविली. वडील व थोरल्या बंधूपेक्षा हा वेगळा. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी टाकतो, फलंदाजीही डावखुरीच करतो. कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडून टॉम आणि सॅम एकत्रित खेळले आहेत. तीन वर्षांपूर्वी या दोघांनी मिळून नॉर्दम्प्टनशायरच्या डावातील सर्व दहाही गडी बाद करण्याचा पराक्रम बजावला होता. 

आश्‍वासक सुरवात
सॅम याने यावर्षी पाकिस्तानविरुद्ध लीड्‌स येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सामना तीन दिवसांतच संपला. इंग्लंडने डावाने विजय मिळविला ती तारीख होती ३ जून. सॅमचा विसावा वाढदिवसही इंग्लंडच्या विजयाने साजरा झाला. डावखुऱ्या सॅमने जिगरबाज  कामगिरीने क्रिकेट जाणकारांची शाबासकी मिळविली आहे. भारताविरुद्ध त्याने पहिल्या डावात चार गडी बाद केले, नंतर फलंदाजीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येत अर्धशतकी चमक दाखविली. त्याने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत केलेल्या झुंजार ६३ धावांमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात ७ बाद ८७ वरून १८० धावांची मजल मारली. भारताला १९४ धावांचे आव्हान मिळाले, पण विराट कोहलीच्या संघाने फलंदाजीत निराशा केली. इंग्लंडने सामना ३१ धावांनी जिंकला. निर्णायक अर्धशतक नोंदविलेला सॅम सामनावीर ठरला. इंग्लंडच्या संघात बेन स्टोक्‍स, ख्रिस वोक्‍स, स्टुअर्ट ब्रॉड असे वेगवान गोलंदाजी टाकणारे अष्टपैलू आहेत. त्यांच्या सोबतीला आता युवा सॅम करन आला आहे. यामुळे इंग्लंडची ताकदही वाढली आहे. सॅमच्या डावखुऱ्या शैलीमुळे इंग्लंडच्या माऱ्यात वैविध्यता आली आहे.

संकटावर मात
करन कुटुंबीय झिंबाब्वेत रमले होते. केविन निवृत्तीनंतर प्रशिक्षक बनले. त्यांचे बोट पकडून तिघेही मुलगे क्रिकेट मैदानावर आले. जीवन सुसह्य असताना संकटाचे आगमन झाले. झिंबाब्वेचा माजी राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी २००४ मध्ये जमीन सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे त्या देशातील गोऱ्या नागरिकांना त्यांच्या ताब्यातील जमिनीवर पाणी सोडावे लागले. करन कुटुंबीयांवरही ही वेळ आली. केविन यांच्या आईच्या आठवणी असलेले ‘फार्महाऊस’ सोडावे लागले. तेव्हा झिंबाब्वेचे प्रशिक्षक असलेले ऑस्ट्रेलियन जेफ मार्श यांनी हरारेतील आपल्या सदनिकेत करन कुटुंबीयांना आसरा दिला होता. सहा वर्षांपूर्वी करन भावंडांना आणखी एक जबर धक्का बसला. १० ऑक्‍टोबर २०१२ रोजी वयाच्या ५३व्या वर्षी केविन यांचे ह्रदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. तिघेही भाऊ पितृछत्राला मुकले. वडिलांचा आधार तुटल्यानंतर टॉम, बेन व सॅम यांना इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायची संधी लाभली. टॉम व सॅम सरे संघाकडून खेळू लागले. येथूनच या दोघांनी इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळविण्यापर्यंत प्रगती साधली.

क्रिकेटपटू सॅम करनविषयी
पहिला कसोटी बळी ः शादाब खान, विरुद्ध पाकिस्तान लीड्‌स येथे, १-३ जून २०१८
पहिला एकदिवसीय बळी ः ॲलेक्‍स कॅरे, विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅंचेस्टर येथे, 
२४ जून २०१८

संबंधित बातम्या