सिंधूच्या पदकाचा रुपेरी रंग

किशोर पेटकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

क्रीडांगण
 

चीनमधील नान्जिंग येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची ‘शटल क्वीन’ पी. व्ही. सिंधू जगज्जेतेपदाचा मुकुट परिधान करू शकली नाही. पुन्हा एकदा ती ‘फायनल’मध्ये हरली, सलग दुसऱ्या वर्षी तिच्या गळ्यात रुपेरी पदक दिसले. जागतिक क्रमवारीत ‘टॉप थ्री’मध्ये असलेल्या भारताच्या अव्वल महिला बॅडमिंटनपटूस हरवून स्पेनच्या करोलिना मरिन हिने तिसऱ्यांदा विश्‍वविजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला. अंतिम लढत एकतर्फी नव्हती. २३ वर्षीय सिंधूने झुंजार खेळ केला, पण काही चुका केल्यामुळे मरिनचे फावले. सिंधूला प्रथमच जागतिक किताब जिंकण्याची संधी होती. पहिल्या गेममध्ये १५-११ आघाडीनंतर हैदराबादच्या खेळाडूने प्रतिस्पर्धीस डोके वर काढण्यास वाव दिला. मरिनने सावज टिपत नंतर वरचष्मा राखला. अंतिम लढतीतील पराभवानंतर, ती ‘फायनल’मध्ये निराशा करते याबाबत टीका झाली. सिंधूने ‘फायनल’ गमावली, पण तिच्या कामगिरीचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. त्यामुळेच, ‘आपण सुवर्णपदक गमावले नाही, रौप्य कमावले,’’ असे प्रत्युत्तर सिंधूने दिले. जागतिक स्पर्धेतील सिंधूने एकंदरीत चौथे पदक मिळविले. गतवर्षीही तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, याव्यतिरिक्त सुरवातीच्या काळात तिने दोन वेळा ब्राँझपदकांची कमाई केली होती.

विजेतेपदाची हुलकावणी
सिंधूला अंतिम लढतीत मरिन हिने आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धेत हरविले. दोन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्येही सुवर्णपदकाच्या लढतीत सिंधूची स्पॅनिश खेळाडूशी गाठ पडली होती. तेव्हाही भारतीय खेळाडूस रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. नान्जिंगमधील स्पर्धेत सिंधूने अप्रतिम खेळ केला, फक्त ‘फायनल फोबिया’ तिला दूर करता आला नाही. अगोदरच्या लढतीत तिला चिवट प्रतिकार झाला, मात्र ती डगमगली नाही. उपांत्य फेरीत अकाने यामागुची, त्यापूर्वीच्या लढतीत गतविजेती नोझोमी ओकुहारा यांचा पाडाव करताना सिंधूने झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. मध्यंतरीच्या दुखापतीना ‘हरवून’ सिंधूने केलेला खेळ मात्र कौतुकास पात्र आहे. आपण स्पर्धेत चमकदार खेळ केल्यामुळे रौप्यपदकाचे महत्त्व कमी होत नसल्याचे सिंधूचे म्हणणे आहे. सिंधूने जगज्जेतेपदासाठी आटोकाट प्रयत्न केले. दोन्ही गेममध्ये तिने प्रतिहल्ला चढवत मरिनला संघर्ष करण्यास भाग पाडले. आपली शिष्या कुठे कमी पडलीय हे प्रशिक्षक गोपीचंद यांनी नक्कीच हेरलेलं असेल.  सिंधूही मानसिकदृष्ट्या आणखीन सक्षम बनेल. विजेतेपदासाठीच्या मेहनतीत वाढ होईल हे स्पष्टच आहे.  जागतिक विजेतेपद जिंकेपर्यंत कठोर परिश्रम घेण्याचा सिंधूचा संकल्प आहे. ती धाडसी आहे. तिला आव्हानावर मात करणे आवडते, त्या बळावर तिने जागतिक महिला बॅडमिंटनमध्ये लौकिक टिकवून ठेवलेला आहे.

‘अंतिम’ अडथळा
सिंधूच्या कामगिरीवर नजर टाकता, अंतिम लढतीपर्यंतचा प्रवास ती दणक्‍यात करते, मात्र निर्णायक टप्प्यावर अडखळते. यामुळे विजेतेपदाची संधी निसटते. दोन वर्षांच्या कालावधीत तिला आठ अंतिम लढती गमवाव्या लागल्या आहेत. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीत तिची लय बिघडली. गतवर्षी जागतिक स्पर्धेत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिने सिंधूचा चुरशीच्या तीन गेम्समध्ये पाडाव केला. सुपर सीरिज फायनल्समध्ये अकाने यामागुची हिने सिंधूला नमविले. यावर्षी इंडिया ओपन स्पर्धेत सिंधूला अमेरिकेच्या बेईवेन झॅंगने यशस्वी होऊ दिले नाही. एप्रिलमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत साईना नेहवालशी सिंधूची गाठ पडली. त्यावेळेसही तिच्या पदकाचा रंग रुपेरीच ठरला. गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेतही साईनाने तिला हरविले होते. यंदा थायलंड ओपनमध्ये पुन्हा एकदा तिला ओकुहारा भारी ठरली. आता जागतिक सुवर्णपदकही दूरचे ठरले. भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना सिंधू भविष्यात जगज्जेतेपद मिळवू शकेल हा विश्‍वास आहे. त्यांच्या मते, अंतिम लढतीतील दडपणास सामोरे जाण्यास सिंधू कमी पडते असे म्हणणे चुकीचे आहे. सिंधू तरुण असल्यामुळे भविष्यात ती निसटलेल्या सुवर्णपदकाची निश्‍चितच भरपाई करू शकते.

जागतिक स्पर्धेत सिंधू
रौप्यपदक ः २०१४ (ग्लासगो), २०१८ (नान्जिंग)
ब्राँझपदक ः २०१३ (ग्वांगझू), २०१४ (कोपनहेगन)

संबंधित बातम्या