शेतकऱ्याच्या मुलाचे ‘सुवर्ण’!

किशोर पेटकर
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

क्रीडांगण
 

सौरभ चौधरी या मुलाला नुकतीच मिसरूड फुटलेली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरानजिकच्या कलिना गावातील एका शेतकऱ्याचा हा मुलगा. इंडोनेशियातील पालेमबंग येथे त्याने कमाल केली. अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धेत या मुलाने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले, तेव्हा तो १६ वर्षे, तीन महिने व नऊ दिवसांचा होता. कोणताही दबाव न घेता, कमालीचा आत्मविश्‍वास आणि उपजत गुणवत्तेच्या बळावर अफलातून एकाग्रतेने नेम साधत तो अजिंक्‍य ठरला. 

सौरभने भारताला १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. त्याची भरारी थक्क करणारी आहे. त्याचे प्रतिस्पर्धी दुप्पट वयाचे आणि अफाट अनुभवाचे होते. जपानचा तोमोयुकी मात्सुदा हा ४२ वर्षीय नेमबाज. १० मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात त्याला ‘लीजंड’ मानले जाते. तो दोन वेळचा जगज्जेताही आहे आणि गतवर्षी जगातील सर्वोत्तम नेमबाज ठरला होता. कोरियाचा चार वेळचा ऑलिंपिक विजेता जिन जॉनगोह हा ३८ वर्षांचा नेमबाज. शिवाय चीनचे नेमबाजीतील ‘वंडर कीड’ वू जिआयू व वॅंग मेन्गयी, २०१० मधील आशियायी क्रीडा स्पर्धेतील विजेता कोरियाचा ली देम्युंग, कझाकस्तानचा व्लादिमीर इस्चेन्को हे सुद्धा शूटिंग रेंजवर होते. या साऱ्या मातब्बरांना मागे टाकत सौरभने २४०.७ गुणांचा स्पर्धा विक्रम नोंदविला आणि आपली पहिलीच सीनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धा संस्मरणीय ठरविली. प्रतिष्ठेच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला. २०१२ मध्ये लंडन येथील ऑलिंपिक स्पर्धेत विजय कुमारने रौप्यपदक जिंकले होते. अतिशय तुटपुंज्या अनुभवाच्या बळावर सौरभने सोनेरी जल्लोष केला. अठरावी आशियायी क्रीडा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ‘सौरभ चौधरी’ हे नाव नेमबाजी खेळ वगळता इतरांना फारसे माहीतही नव्हते. एका सुवर्णपदकाने सौरभ रातोरात ‘सुपरस्टार’ बनला.

नेमबाजीच्या हट्टापायी...
सौरभचे वडील जगमोहन हे शेतकरी, तर आई ब्रिजेश या गृहिणी. कलिना हे गाव मेरठच्या मुख्य शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव लहानसे, पण नागरिक सुशिक्षित. जगमोहन यांची शेती आहे, हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. सौरभही फावल्या वेळेत वडिलांना मोठ्या आनंदाने शेतीकामात मदत करतो. तीन वर्षांपूर्वी मित्रांना नेमबाजी करताना पाहून सौरभलाही या खेळाने झपाटले. मुलाने नेमबाजीवर लक्ष केंद्रित करणे वडिलांना अजिबात मंजूर नव्हते. सौरभचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल ही भीती त्यांना  सतावत होती. मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावे ही वडिलांची मनीषा. वडिलांचा प्रारंभीचा विरोध पाहून सौरभ हट्टालाच पेटला. नेमबाजीच्या परवानगीसाठी त्याने जेवण त्यागले. अखेर वडील नरमले आणि सौरभचा नियमित सराव सुरू झाला. कलिना येथून सुमारे ४० किलोमीटर दूर असलेल्या बागपतजवळील बिनौली येथील अमित शेरॉन यांच्या बाबा शाह मल अकादमीत सौरभ नियमित प्रशिक्षणार्थी बनला. दररोज सकाळी योगसाधना, नंतर न्याहारी आणि नेमबाजीचा अथक सराव हा त्याची नियमित दिनचर्या. सुरवातीला तो प्रशिक्षकांच्या ‘गन’ने सराव करायचा. मुलाचे नेमबाजीतील कौशल्य पाहून कुटुंबीयांनी  त्याला एक लाख ७५ हजार रुपयांची ‘गन’ दिली. 

लक्ष्यावर नेम
एखादी गोष्ट सांगितली किंवा शिकविली, की लगेच आत्मसात करण्यात सौरभ पटाईत आहे. त्याची ही  खासियत प्रशिक्षक पावेस स्मिरनोव यांना भावते. पिस्तुलाने त्याच्यावर मोहिनी टाकली, आता शस्त्र हाताळणीत तो पारंगत बनला आहे. त्याचा नेम भरकटत नाही, नजरेसमोर फक्त लक्ष्य असते. यावर्षी जर्मनीत झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक स्पर्धेत त्याने छाप पाडली. गतवर्षी त्याने २०१४ मधील आशियायी क्रीडा स्पर्धेत पदके जिंकलेल्या अनुभवी जितू रायला मागे टाकले होते. 

दृष्टिक्षेपात नेमबाज सौरभ चौधरी
जन्मतारीख ः ११ मे २००२
इंडोनेशियातील अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धेत 
१० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक
२०१८ मध्ये जर्मनीतील ज्युनिअर विश्‍वकरंडक नेमबाजीत सुवर्णपदक
डिसेंबर २०१७ मध्ये आशियायी युवा ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत ज्युनिअर विश्‍वविक्रम
२०१७ मध्ये ज्युनिअर विश्‍वकरंडक स्पर्धेत सांघिक ब्राँझपदक

संबंधित बातम्या