राहीचे ‘गोल्डन कमबॅक’

किशोर पेटकर
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

क्रीडांगण
 

कोल्हापूरच्या राही सरनोबत या प्रतिभाशाली मुलीची नेमबाजीतील कारकीर्द बहरत होती, नेमकं त्याचवेळी तिला दुखापतीने दणका दिला. कोपर दुखावले. दीडेक वर्ष तिला हाती पिस्तूल घेणंही शक्‍य झाले नाही. राही हिच्यासाठी हा कालखंड क्‍लेशदायक आणि नैराश्‍याने भारलेला होता. दुखापतीच्या असह्य वेदना सोबतीला होत्याच. कारकिर्दीतील ऐन उमेदीच्या काळात तिला शूटिंग रेंजवर मिळविलेल्या पदकांकडे असाह्यपणे पाहावे लागत होते, पण धैर्यवान ‘महाराष्ट्रकन्या’ राहीने हार अजिबात मानली नाही. जबरदस्त इच्छाशक्ती आणि कणखर मनोबलाच्या जोरावर तिने शूटिंग रेंजवर यशस्वी पुनरागमन केले. चक्क सुवर्णपदकास गवसणी घातली.     

इंडोनेशियातील अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धेत २७ वर्षीय राहीने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला  वश केले. आशियायी क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात विजेती ठरलेली ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. बराच काळ ती स्पर्धात्मक नेमबाजीपासून दूर होती. गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धा गाजविलेल्या सोळा वर्षी मनू भाकर हिच्यावरच झोत होता. राहीची नजर फक्त लक्ष्यावर होती. जिगर विलक्षण होती. राहीने शेवटपर्यंत लक्ष विचलित होऊ दिले नाही. सुवर्णपदकासाठी कमालीची चढाओढ होती. राहीने अचूकतेवर भर राखला, त्यामुळे नाट्यमय टायशूटमध्ये ती थायलंडच्या माफास्वान यांगपईबून हिला हरवू शकली. शांत वृत्ती, कमालीची एकाग्रता आणि जिंकण्याचा ध्यास यामुळे राही सर्वोत्तम ठरली.

दुखापतीवर मात
राही पाच वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आली. दक्षिण कोरियातील विश्‍वकरंडक नेमबाजीत २५ मीटर पिस्तुलमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय पिस्तूल नेमबाज ठरली होती. लंडन ऑलिंपिकसाठीही तिने कमी वयात पात्रता मिळविली. चार वर्षांपूर्वी राष्ट्रकुल आणि आशियायी क्रीडा स्पर्धेतही ती पदक विजेती ठरली. राहीची वाटचाल योग्य दिशेने  होती, पण  २०१५च्या अखेरीस तिला ‘एल्बो’ने सतावण्यास सुरवात केली. वेदना खूपच वाढल्या. उपाचारामुळे कोपर साथ देऊ लागले, तरीही पुनर्वसनाही वेळ गेला. सुमारे दीड वर्ष वाया गेले. रिओ ऑलिंपिकची संधीही हुकली. अखेरीस राहीने गतवर्षी सरावास सुरवात केली. दुखापतीमुळे स्पर्धात्मक शूटिंग रेजपासून दूर असलेल्या राहिला ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम’ या सरकारी क्रीडा योजनांचाही लाभ  मिळत नव्हता. राष्ट्रकुल व आशियायी क्रीडा स्पर्धेतील यशस्वी कामगिरीमुळे तिला महाराष्ट्र सरकारची राजपत्रित नोकरी मिळाली होती. तो पगार आणि वडील जीवनराव, आई प्रभा यांचे पाठबळ, तसेच ‘ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट’चे सहकार्य या बळावर राहीने प्रशिक्षकांच्या मानधनाचा प्रश्‍न सोडवत, मोठ्या उमेदीने शूटिंग रेंज गाजविण्यासाठी सज्जता मिळविली. दुखापतीचा काळ निराशादायी होता, पण धाडसी राही डगमगली नाही. खडतर मेहनत, ध्येयप्रातीची ओढ आणि जबरदस्त आत्मविश्‍वास या जोरावर राहीने इंडोनेशियातील पालेमबंग येथे इतिहास घडविला.

परिणामकारक मार्गदर्शन
राहीने कोल्हापुरात अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्राथमिक धडे गिरविले. युक्रेनचे अनुभवी प्रशिक्षक अनातोली पोद्दूब्नी यांच्या मार्गदर्शनाखाली राहीची प्रतिभा बहरली. अनातोली तिच्यासाठी ‘आजोबा’च होते. त्यांचे निधन राहीसाठी धक्कादायक ठरले. दुखापतीनंतर पुनरागमनासाठी सज्ज होणाऱ्या राहीचा दर्जेदार मार्गदर्शकासाठी शोध सुरू झाला. ऑलिंपिकमध्ये मंगोलिया व जर्मनीचे प्रतिनिधित्व केलेल्या ४९ वर्षीय मुंखबायर दोर्जसुरेन यांनी ही उणीव भरून काढली. दोर्जसुरेन या माजी ऑलिंपिक आणि जागतिक महिला पदक विजेत्या नेमबाज आहेत. दोर्जसुरेन यांचे मानधन जास्त असले, तरी मार्गदर्शन राहीसाठी परिणामकारक ठरले. वर्षभरात त्यांनी राहिला पुन्हा यशोमार्गावर आणले.    

२५ मीटर पिस्तुलमधील पदकविजेती राही...
विश्‍वकरंडक स्पर्धा
सुवर्ण ः २०१३ दक्षिण कोरिया. ब्राँझ ः २०११ अमेरिका
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
सुवर्ण ः २०१० दिल्ली (पेअर्स प्रकारात), २०१४ ग्लासगो. ब्राँझ ः २०१० दिल्ली
आशियायी क्रीडा स्पर्धा
सुवर्ण ः २०१८ जाकार्ता-पालेमबंग

संबंधित बातम्या