जिगरबाज स्वप्ना!

किशोर पेटकर
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

क्रीडांगण
 

ट्रॅक अँड फिल्डमधील सात क्रीडा प्रकारांचा समूह म्हणजे हेप्टॅथलॉन. उंचउडी, लांबउडी, भालाफेक, गोळाफेक, तसेच १०० मीटर, २०० मीटर आणि ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारांत सहभागी होणाऱ्या ॲथलिटच्या क्षमतेचा कमालीचा कस लागतो. नुकत्याच संपलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आव्हानात्मक हेप्टॅथलॉनमध्ये भारताच्या स्वप्ना बर्मन हिने सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॅथलॉनमध्ये विजेतेपद मिळविणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. साहजिकच सारा झोत स्वप्नावर केंद्रित झाला. या बंगाली मुलीची वाटचाल जिगरबाज आहे. जन्मजात दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटं. तिच्या पायाच्या मापाचे ‘शूज’ मिळणे मुश्‍कीलच. नियमित ‘शूज’ वापरून स्वप्ना खेळू लागली, असह्य वेदना पाचवीला पुजलेल्या. विशेषतः धावण्याच्या शर्यतीत खूप त्रास व्हायचा. त्यामुळेच कमालीची सहनशीलता तिच्या अंगी बाणवली असावी. जाकार्ता येथील गेलोरा बुंग कर्णो स्टेडिअमवर हेप्टॅथलनमध्ये सहभागी असताना तिचे दात (विशेषतः दाढ) प्रचंड दुखत होते. स्पर्धेपूर्वी दोन दिवसअगोदर चॉकलेट खाल्ल्याचे निमित्त झाले. वेदनेमुळे स्वप्ना हेप्टॅथलॉनमधील आव्हान पूर्ण करू शकेल का? याबाबत शंका होती. उंची कमी असलेल्या या धैर्यवान मुलीचा आत्मविश्‍वास प्रबळ ठरला. बालपणापासून लहान आकाराच्या ‘शूज’मध्ये सहा बोटांचे दोन्ही पाय कोंबून खेळणारी स्वप्ना डगमगली नाही. दातांचा त्रास होताच, शिवाय दुखावलेली पाठही कुरकूर करत होती. या साऱ्या वेदानांकडे दुर्लक्ष करून धाडशी स्वप्ना स्पर्धेत सहभागी झाली. उजव्या गालावर वेदनाशामक पट्टी लावून जबरदस्त त्वेषाने तिने सहा क्रीडा प्रकारांतील आव्हान तडीस नेले. सर्वाधिक गुण नोंदवत ती विजेती ठरली. शेवटची आठशे मीटर शर्यत संपल्यानंतर थकलेल्या स्वप्नाने ट्रॅकवरच शरीर झोकून दिले.

गरिबीतून शोधली वाट
पश्‍चिम बंगालच्या उत्तर भागातील स्वप्ना ही धडाडीची मुलगी. येत्या २९ ऑक्‍टोबरला ती बावीस वर्षांची होईल. तिचे बालपण अतिशय कष्टमय व गरिबीत गेले. अजूनही त्यात विशेष सुधारणा झालेली नाही. जलपायगुडीजवळील घोसपारा हे तिचे गाव. वडील पंचानन बर्मन.... रिक्षा ओढून कुटुंबाचे गुजराण करीत, पण पाच वर्षांपासून ते आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. आई बासना देवी यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. भांडीधुणी आणि चहा बागेत काम करून मुलांचा सांभाळ केला. स्वप्नासह एकूण चार भावंडं. 

जलपायगुडीतील ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक सुभाष सरकार यांनी स्वप्नातील ॲथलिटची गुणवत्ता हेरली. बिकट परिस्थितीला कंटाळून निराशावादी बनलेली स्वप्ना मध्यंतरी घर सोडून गेली होती. सरकार यांच्या प्रयत्नामुळेच ती पुन्हा मैदानावर परतली होती. स्वप्नाला राग लगेच येतो, मात्र त्यावर नियंत्रण राखत प्रशिक्षकांच्या मदतीने तिने ॲथलेटिक्‍समध्ये नाव कमावण्यास सुरवात केली. सुरवातीला ती फिल्ड प्रकारात भाग घेत असे. उंचउडीत ज्युनिअर राष्ट्रीय विक्रमही तिने नोंदविला होता.  आवश्‍यक मापाचे ‘शूज’ नसल्याने ती धावण्याच्या शर्यती टाळत असे. प्रशिक्षक सरकार यांना तिच्यातील हेप्टॅथलॉन गुणवत्ता खुणावत होती. अखेरीस स्वप्ना २०१३ पासून सात क्रीडा प्रकारांत नियमितपणे भाग घेऊ लागली. 

शोधतेय हक्काचे घर...
स्वप्ना कोलकाता येथील सॉल्ट लेक क्रीडा संकुलात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रात सराव करते. कोलकाता नगरीत तिचे स्वतःचे घर नाही. ती बेघरच आहे. त्यामुळेच एशियाड सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने राज्य सरकारकडून घर बांधून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रशिक्षण केंद्रानजीक निवास असल्यास सोईस्कर ठरेल असं तिला वाटतं. गेल्या वर्षी जुलैमध्ये स्वप्नाने भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, त्यानंतर ती घरी गेली होती, ते शेवटचे होते. नंतर एशियाडच्या तयारीनिमित्त ती घरी कुटुंबीयांना भेटू शकलेली नाही. कुटुंबीयांशी बोलणं फक्त फोनवर. त्यामुळेच एशियाडमध्ये स्वप्नाची सोनेरी कामगिरी दूरचित्रवाणी संचासमोर बसून पाहताना तिच्या आईच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध मोकळा झाला होता.

सुवर्णपदक विजेती स्वप्ना बर्मन
     २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धा, जाकार्ता. एकूण ६०२६ गुण
     २०१७ आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धा, भुवनेश्‍वर. एकूण ५९२४ गुण
 

संबंधित बातम्या