अमितचा ‘नॉकआउट पंच’

किशोर पेटकर
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

क्रीडांगण
 

हरियानाच्या रोहतक जिल्ह्यातील मायना गावातील विजेंद्र पंघाल हे शेतकरी. घरची परिस्थिती बेताचीच. त्यांचे दोघेही मुलगे बॉक्‍सर, पण थोरला अजय कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बॉक्‍सिंग सोडून सेनादलात रुजू झाला, त्याचवेळी त्याने लहान भाऊ अमित याला बॉक्‍सिंगवरच लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितले व सारा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. अमित शरीराने कृश होता. शरीरयष्टी बॉक्‍सरला अजिबात साजेशी नव्हती, मात्र बॉक्‍सिंगची जिद्द होती. युवा अमितवर प्रशिक्षक अनिल धांकर यांनी मेहनत घेण्यास सुरवात केली. अमितच्या आहारात फळं आणि मांसाहाराचे प्रमाण वाढले. बॉक्‍सरला आवश्‍यक असलेले उत्तम पदलालित्य अमितपाशी उपजत होते, फक्त बाहूंत आणि ठोशांत ताकदीची आवश्‍यकता होती, जी सरावागणिक वाढत गेली. या २२ वर्षीय बॉक्‍सरने अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला बॉक्‍सिंगमधील एकमेव सुवर्णपदक जिंकून दिले. ४९ किलो वजनाच्या लाइट फ्लायवेट गटाच्या अंतिम लढतीत त्याने रिओ ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता उझबेकिस्तानचा हसनबॉय दुस्मातोव याचा पाडाव केला. या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अगोदरच्या लढतीत अमित पराभूत झाला होता. गतवर्षी हॅम्बर्ग येथील जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत तो हरला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्या पराभवाची सव्याज परतफेड झाली. अमितने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यास जेरीस आणले. परिणामकारक ठोशांच्या बळावर पदकाचा रंग सोनेरी केला. त्याचे ताकदवान ठोसे दुस्मातोवला भारी ठरले. आशियाई क्रीडा स्पर्धेत लाइट फ्लायवेट गटात सुवर्णपदक जिंकणारा अमित पंघाल हा पहिला भारतीय बॉक्‍सर ठरला. अमित हा डावखुरा बॉक्‍सर. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी त्याने प्रशिक्षकांसमवेत खास नियोजन केले. ब्रिटनमध्ये विशेष सराव केला.

पदकविजेती गुणवत्ता
बॉक्‍सिंगमधील वाटचालीत अमितला सेनादलाचे भरीव साह्य लाभले आहे. ताकद हे बॉक्‍सिंगमधील त्याचे मुख्य अस्त्र आहे. प्रारंभीच्या काळात बॉक्‍सिंगसाठी गरजेचे ग्लोव्हज्‌ विकत घेण्याची ऐपत नव्हती, त्यामुळे त्याने उघड्या हातांनी बॉक्‍सिंग केले. रिकाम्या पोटीही बॉक्‍सिंग रिंगणात लढला. मात्र डगमगला नाही. आशियाई स्पर्धेच्या अंतिम लढतीत उझबेकिस्तानच्या बॉक्‍सरचे पारडे जड होते, शिवाय त्याच्याकडे रिओ ऑलिंपिक विजेतेपदाचा आत्मविश्‍वासही होता. मात्र अमितने लढतीच्या सुरवातीपासूनच आक्रमणाने हल्लाबोल केला. दुस्मातोव याच्या अगोदरच्या लढतींचा व्हिडिओ पाहून अमितने कच्चे दुवे हेरले होते. भारताचे बॉक्‍सिंगमधील प्रमुख कामगिरी संचालक सांतियागो निएवा यांचे मार्गदर्शनही अमितसाठी बहुमूल्य ठरले. गेल्या दीड वर्षांत अमितने आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग रिंगमध्ये सातत्याने यश मिळविले आहे. यावर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. नवी दिल्लीतील स्पर्धेत, तसेच बल्गेरियातील स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकाविले. २०१७ पासून भाग घेतलेल्या नऊ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या गुणवान बॉक्‍सरने आठ पदके जिंकली आहेत.  

ऑलिंपिकचे आव्हान खडतर
अमितने आशियाई क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले असले, तरी टोकियोत २०२० साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा त्याच्यासाठी खडतर असेल. आगामी ऑलिंपिकमधील बॉक्‍सिंग रिंगणातून ४९ किलो वजन लाइट फ्लायवेट गटास वजा करण्यात आले आहे. त्यामुळे अमितला ५२ किलो वजन गटाच्या फ्लायवेट गटात भाग घ्यावा लागेल. त्यासाठी त्याला वजन वाढवावे लागेल. प्रशिक्षण, सराव, शैली, आहार या साऱ्यांत बदल करावा लागेल. प्रतिस्पर्धीही बलवान आणि अनुभवी असतील. भविष्यातील आव्हान प्रतिकूल असले, तरी अमितने टोकियो ऑलिंपिकवर लक्ष्य एकाग्र केले आहे. त्यासाठी त्याने आईला आपल्या विवाहासाठी इतक्‍यात मुलगी शोधू नको असा लाडीक दमही दिलेला आहे.

बॉक्‍सर अमित पंघालची प्रमुख पदके
     सुवर्ण ः आशियाई क्रीडा स्पर्धा, जाकार्ता-पलेमबंग २०१८
     रौप्य ः राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, गोल्ड कोस्ट २०१८
     ब्राँझ ः आशियाई बॉक्‍सिंग स्पर्धा, ताश्‍कंद २०१७
     सुवर्ण ः बॉक्‍सिंग ग्रांप्री स्पर्धा, चेक प्रजासत्ताक २०१७
     सुवर्ण ः राष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धा, २०१६

संबंधित बातम्या