अरपिंदरची पदक भरारी

किशोर पेटकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

क्रीडांगण
 

अमृतसरचा अरपिंदर सिंग हा ॲथलिट अपघातानेच तिहेरी उडीतील खेळाडू बनला. त्याचे वडील जगवीर सिंग हे सैनिक, सेनादलाच्या संघातील पट्टीचे कबड्डीपटू. अरपिंदर अभ्यासात पिछाडीवर, तर खेळात सरस. त्यामुळे तो ट्रॅक अँड फिल्डवर आला. वडिलांचे सर्वतोपरी प्रोत्साहन लाभले. १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, लांबउडी या साऱ्यांत अरपिंदरने कौशल्य आजमाविले, पण विशेष यश मिळाले नाही. वडील व प्रशिक्षकांनी त्याला धीर दिला. तिहेरी उडीवर लक्ष केंद्रित करण्याचे सुचविले. या खेळात  भाग घेण्यास सुरवातीस तो तयार नव्हता, मात्र २००७ साली राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत मिळालेल्या पदकाने अरपिंदरचा हुरूप  वाढला. त्याने तिहेरी उडीतच कारकीर्द करण्याचे निश्‍चित केला. हा निर्णय कलाटणी देणारा ठरला. अरपिंदरने इंडोनेशियातील  जाकार्ता येथे झालेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, नंतर लगेच चेक प्रजासत्ताकातील ओस्त्रावा येथे झालेल्या आंतरखंडीय करंडक स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली. ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. आंतरखंडीय स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ॲथलिट आहे. युरोप, अमेरिका, आफ्रिका व आशिया-प्रशांत विभागातील प्रत्येकी दोन सर्वोत्तम ॲथलिट्‌सचा प्रत्येक क्रीडा प्रकारात समावेश असतो. अरपिंदरने तिहेरी उडील आशिया-प्रशांत विभागाचे प्रतिनिधित्व केले. या वर्षी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याला ब्राँझपदक अगदी थोडक्‍यात हुकले होते.  

४८ वर्षांनंतर सुवर्ण
एशियाडमध्ये तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला पुरुष तिहेरी उडीत सुवर्णपदक मिळाले. मोहिंदरसिंग गिल याने १९७० मध्ये बॅंकॉक येथील स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर यंदा २५ वर्षीय अरपिंदरने सोनेरी अध्याय लिहिला. उझबेक आणि चिनी ॲथलिटला मागे टाकत अरपिंदरने १६.७७ मीटरची उडी मारली. या कामगिरीने त्याच्या गळात सुवर्णपदक आले. आंतरखंडीय स्पर्धेत त्याने  १६.५९ मीटर कामगिरीसह तिसरा स्थान मिळविले. अमेरिकेच्या ख्रिस्तियन टेलर याने १७.५९ मीटरसह पहिला क्रमांक  मिळविला. अरपिंदरनेही यापूर्वी १७ मीटर कापलेले आहे. चार वर्षांपूर्वी लखनौ येथे त्याने १७.१७ मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आवश्‍यक निकष पूर्ण करताना अरपिंदरने जून महिन्यात गुवाहाटी येथील राष्ट्रीय स्पर्धेत १७.०९ अंतर नोंदविले होते. जाकार्ता येथे अरपिंदरने प्रयत्न केले, पण तो १७ मीटरचा टप्पा गाठू शकला नाही, मात्र त्यामुळे त्याचे सुवर्णपदक निसटले नाही. अमृतसरचा असला, तरी अरपिंदर केरळमधील तिरुअनंतपुरम येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स ॲकॅडमीत सराव करतो. चार वर्षांपूर्वी त्याने ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १६.६३ मीटर कामगिरीसह ब्राँझपदक जिंकले होते, पण रिओ ऑलिंपिकपर्यंत त्याची कामगिरी खालावली. या जिगरबाज ॲथलिटने आता पुन्हा उसळी घेत आंतरराष्ट्रीय पदकांची मालिका सुरू केली आहे. अरपिंदरच्या प्रशिक्षणासाठी वडिलांना जमीन गहाण ठेवावी लागली होती. मुलाच्या पदक विजेत्या कामगिरीतून मिळालेल्या बक्षीस रकमेतून नंतर जमीन कर्जमुक्त केली.

प्रतिकूल परिणाम
अरपिंदरने लंडनमध्ये प्रगत प्रशिक्षण घेण्याचे ठरविले. मात्र हा निर्णय उलटला. लंडनमध्ये त्याने जॉन हर्बर्ट यांचे मार्गदर्शन घेतले. हर्बर्ट हे १९८६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेते. अरपिंदर याच्यासाठी नव्या प्रशिक्षकांची शैली डोईजड ठरली. त्याची कामगिरी पिछाडीवर गेली. त्यातच भाषेचा जटिल प्रश्‍न. लंडनमधील जेवण, वातावरण यांचाही अरपिंदरवर प्रतिकुल परिणाम झाला. तेथे त्याला स्वतः जेवण शिजवावे लागायचे. सायकलने सात किलोमीटर प्रवास करून प्रशिक्षण केंद्रावर जावे लागत असे. तिहेरी उडीवर लक्ष केंद्रित करणे त्याला जमेनासे झाले. त्यामुळे अरपिंदर मायदेशी परतला. एशियाड आणि आंतरखंडीय स्पर्धेतील पदकामुळे त्याचा उत्साह दुणावलेला आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता आणि रेंजित माहेश्‍वरी याचा १७.३० मीटरचा राष्ट्रीय विक्रम त्याला खुणावत आहे.

पदक विजेता अरपिंदर
सुवर्ण ः २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धा, २०१७ आशियाई इनडोअर अँड मार्शल आर्टस स्पर्धा
ब्राँझ ः २०१८ आंतरखंडीय ॲथलेटिक्‍स स्पर्धा, २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, २०१३ आशियाई ॲथटिक्‍स स्पर्धा

संबंधित बातम्या