नाओमीचे ग्रॅंड स्लॅम यश

किशोर पेटकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

क्रीडांगण
 

न्यूयॉर्कमधील फ्लशिंग मीडोज येथे यजमान देशाची सेरेना विल्यम्स अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीचा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली होती. गतवर्षी आई बनल्यानंतरची तिची ही पहिलीच ग्रॅंड स्लॅम ‘फायनल’ होती. ३६ वर्षीय सेरेना जिंकली असती, तर तिने मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाच्या सर्वकालीन विक्रमांशी बरोबरी साधली असती, मात्र जपानच्या नाओमी ओसाका हिने तसं होऊ दिलं नाही. नाओमी सेरेनापेक्षा वयानं जवळपास निम्म्याने. अंतिम लढतीच्या वेळेत दोघींतील वयाचा फरक १६ वर्षे २० दिवसांचा होता. नाओमी आहे वीस वर्षांची. येत्या १६ ऑक्‍टोबरला एकविसावा वाढदिवस साजरा करेल. अंतिम सामन्यात प्रमुख पंचांना भर कोर्टवर अर्वाच्य भाषेत सुनावणारी सेरेना तोल गमावून बसली. ती कमालीची भडकली होती. तिच्या बेताल वागण्यामुळे अंतिम सामना गाजला, परंतु नाओमीच्या कामगिरीचे महत्त्व काहीएक कमी झाले नाही. या प्रतिभावान नवोदित खेळाडूने झुंजार खेळ केला. सेरेनाच्या कामगिरीतील माहात्म्याचा अजिबात दबाव न घेता ती खेळली. अंतिम सामन्याच्या वेळेस झालेल्या सेरेना व मुख्य पंच कार्लोस रामोस यांच्यातील भर कोर्टवरील वादात नाओमीने एकाग्रता ढळू दिली नाही. ती शांत राहिली, दुसरीकडे सेरेना बेदरकार वागली. प्रेक्षागृहात बसलेल्या प्रशिक्षक पॅट्रिक मुराटोग्लू यांच्याशी खाणाखुणाद्वारे संवाद साधत असल्याचा ठपका ठेवून मुख्य पंच रामोस यांनी आक्षेप घेतला, सेरेनाला ताकीद दिली आणि नंतर गुणही कमी केला. या साऱ्यांत सेरेनाचा पारा चढला, तिने सहनशीलता गमावली. खिलाडूवृत्ती बाजूला सारत तिने मुख्य पंचांना सुनावले, अपशब्द वापरले, आपली माफी मागण्यास सांगितले. सारा झोत या वादाकडे गेला, मात्र जापनीज नाओमीने साधलेली कामगिरी विलक्षण ठरली. ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारी ती जपानची पहिलीच टेनिसपटू ठरली. तिच्यासाठी ‘आदर्श’ असलेल्या सेरेनावर ६-२, ६-४ असा सोपा विजय प्राप्त केला. अंतिम लढत जिंकल्यानंतर सेरेनाकडून अभिनंदन स्वीकारताना नाओमीच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंची वाट मोकळी झाली होती. 

नाओमीचा प्रभावी खेळ
अंतिम लढतीत नाओमीचा खेळ भारी ठरला. सेरेनाला टेनिस कोर्टवर रोखणे सोपे नव्हे. हा पराक्रम नाओमीने निश्‍चयी खेळाच्या बळावर केला. अंतिम लढतीत तिने सहा बिनतोड सर्व्हिस केल्या, दुसरीकडे सेरेनाने तीन वेळाच अशी किमया साधली. सेरेनाचा खेळ ढेपाळला होता, तर नाओमी त्वेषाने खेळत होती. तिच्यासाठी ही स्वप्नवत अंतिम लढत होती. तिने ‘डब्ल्यूटीए सर्किट’वरील दुसराच किताब जिंकला. यावर्षी ती इंडियन वेल्स स्पर्धेतही विजेती ठरली होती. अमेरिकन ओपनपूर्वी नाओमी महिला एकेरी मानांकनात १९व्या क्रमांकावर होती. पहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदानंतर ती ‘टॉप १०’मध्ये आली आहे. तिला सातवा क्रमांक मिळाला आहे. उजव्या हाताने खेळणारी नाओमीने टेनिस तज्ज्ञांना प्रभावित केले आहे. ती अव्वल स्थान पटकावेल का याचे भाकीत लगेच करणे धोक्‍याचे असेल, कारण नाओमीला अजून मोठी मजल मारायची आहे. अमेरिकन ओपनपूर्वी ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत फारतर चौथ्या फेरीपर्यंत नाओमी गेली होती. तिच्या व्यावसायिक टेनिसमधील यशस्वी मालिकेची नुकतीच सुरवात आहे.  

मिश्रवंशीय खेळाडू
नाओमी ओसाका ही कृष्णवर्णीय. जपानी मुलीचा हा रंग पाहून खूप जणांच्या भुवया उंचावतात. आपल्या वर्णाचा नाओमीला अभिमान आहे. तिचे वडील आफ्रिकन वंशाचे, हैतीचे. लिओनार्ड ‘सॅन’फ्रॅंकोईस जपानमधील तामाकी ओसाकाच्या प्रेमात पडले. तामाकीच्या घरच्यांचा विरोध अव्हेरून लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांना मारी व नाओमी या दोन मुली. दोघीही टेनिसपटू. यापूर्वी दुहेरीत त्या एकत्रित खेळलेल्या आहेत. मुलींना वडिलांऐवजी आईचे आडनाव दिलं गेले. नाओमीचे वास्तव्य फ्लोरिडात असते. तीन वर्षांची असताना ती पालकांसमवेत अमेरिकेत आली होती. तिच्याकडे जपान व अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे, मात्र क्रीडा मैदानावर ती आपल्या आईच्या देशाचे प्रतिनिधित्व करते.

नाओमी ओसाकाची ग्रॅंड स्लॅम कामगिरी
विजेती ः अमेरिकन ओपन २०१८
चौथी फेरी ः ऑस्ट्रेलियन ओपन २०१८
तिसरी फेरी ः फ्रेंच ओपन (२०१६, २०१८), विंबल्डन (२०१७, २०१८)
 

संबंधित बातम्या