जपानचा ‘स्वदेशी’ विजेता

किशोर पेटकर
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

क्रीडांगण    

जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा १९७७ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून गतवर्षीपर्यंत या स्पर्धेतील पुरुष एकेरीत एकही जपानी खेळाडू विजेतेपद मिळवू शकला नव्हता. यंदा ४१ वर्षांनंतर केंटो मोमोटा याने नवा अध्याय लिहिला. जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा तो पहिला ‘स्वदेशी’ पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. थायलंडच्या खोसित फेटप्रादाब याला हरून मोमोटा याने मायदेशातील यशाचा जल्लोष केला. त्याने स्पर्धेत अफलातून खेळ केला. उपांत्य लढतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन याचा पाडाव केला, त्यापूर्वी त्याने आपल्या ‘आदर्श’ खेळाडूस पराभवाचा धक्का दिला होता. चीनचा दोन वेळचा ऑलिंपिक विजेता लिन डॅन याला नमवून मोमोटाने आगेकूच राखली होती. मोमोटा हा डावखुरा खेळाडू. कल्पक फटक्‍यांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना जेरबंद करणारा खेळ हे मोमोटाचे वैशिष्ट्य. त्याच बळावर त्याने यावर्षी नान्जिंग येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत बाजी मारली होती. यजमान देशाच्या शि युकी याला हरवून मोमोटाने प्रथमच जगज्जेतेपद पटकाविले. जगज्जेता बनणारा तो जपानचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. २४ वर्षीय केंटो मोमोटा आता ऑलिंपिक विजेतेपदाचे लक्ष्य बाळगून आहे. आणखी दोन वर्षांनंतर ही स्पर्धा टोकियोतच होणार आहे. जपान ओपन जिंकल्यामुळे डावखुऱ्या मोमोटाचा उत्साह दुणावला आहे. या जपानी खेळाडूने यावर्षी यश मिळवून वाटचाल योग्य दिशेने असल्याचे सिद्ध केले आहे. दोन वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानापर्यंत प्रगती साधली होती. कारकिर्दीत त्याचे ते सर्वोत्तम मानांकन होते.

जुगार पडला महागात
बेकायदा कसिनोत जाऊन जुगार खेळणे केंटो मोमोटाला चांगलेच महागात पडलेले आहे. दोन वर्षांपूर्वीची ही घटना. मोमोटाला कसिनोत जुगार खेळण्याची चटक लागली. ही अनैतिकता त्याच्यावर चांगलीच शेकली. जुगारात त्याने भरपूर पैसे उधळले. भर पत्रकार परिषदेत त्याला गैरकृत्याची कबुली द्यावी लागली. त्यामुळे जपानमधील बॅडमिंटन संघटनेने त्याच्यावर कारवाई केली. त्याला एक वर्षाच्या बंदीस सामोरे जावे लागले. जपानमध्ये मोमोटाच्या विरोधात तीव्र सूर उमटले. बंदीच्या कालावधीत त्याने नव्याने उसळी घेण्याचा निश्‍चय केला. बंदीमुळे मोमोटा रिओ ऑलिंपिक स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याला जपानच्या राष्ट्रीय संघातील जागेवर पाणी सोडावे लागले. चुकीतून योग्य धडा घेताना ‘झिरोतून हिरो’ बनण्याचे लक्ष्य मोमोटाने बाळगले. शिक्षा भोगून त्याने गतवर्षीच्या मध्यास स्पर्धात्मक पुनरागमन केले. त्याचे मानांकन खालावले होते. फक्त जिंकण्याचे लक्ष्य बाळगून मोमोटा खेळत राहिला, त्याला  सूर गवसला.  तो ‘टॉप टेन’मध्ये आला. बंदीनंतर त्याच्यात परिपक्वता दिसली, सकारात्मक परिणाम खेळावर झाला. यावर्षी मोमोटाने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ करत महत्त्वाच्या स्पर्धा जिंकण्यात सफलता मिळविली. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतही तो विजेता ठरला. यावर्षी त्याने पाच स्पर्धांत विजेतेपदाचा करंडक उंचावला आहे.

माजी ज्युनिअर जगज्जेता
केंटो मोमोटा हा माजी ज्युनिअर जगज्जेता आहे. सहा वर्षांपूर्वी जपानमधील चिबा येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या एकेरीत अजिंक्‍यपद मिळविले होते. सीनियर गटात आल्यानंतर मोमोटाने छाप पाडण्यास सुरवात केली. यावर्षी ऑगस्टमध्ये त्याने सीनियर एकेरीतही जगज्जेतेपद पटकावून आगळा पराक्रम साधला. तीन वर्षांपूर्वी त्याने जागतिक स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली होती. जगातील मातब्बर बॅडमिंटनपटूंसमोर त्याने आव्हान उभे केले. जपान ओपन जिंकण्यापूर्वी त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेत अपयशास सामोरे जावे लागले. जाकार्तातील स्पर्धेत उपांत्य फेरीत हार पत्करावी लागल्यामुळे मोमोटाला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. ते अपयश मागे टाकत, तो टोकियोतील स्पर्धेत नव्या उमेदीने खेळला. 

केंटो मोमोटाचे २०१८ मधील यश

  •      जागतिक बॅडमिंटन स्पर्धा, नान्जिंग ः विजेता
  •      आशियाई क्रीडा स्पर्धा, जाकार्ता-पलेमबंग ः ब्राँझपदक
  •      आशियाई बॅडमिंटन अजिंक्‍यपद, वुहान ः विजेता 
  •      जपान ओपन ः विजेता
  •      इंडोनेशिया ओपन ः विजेता
  •      व्हिएतनाम इंटरनॅशनल ः विजेता

संबंधित बातम्या