सरदारची निवृत्ती!

किशोर पेटकर  
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

क्रीडांगण  

भारताला एशियाड स्पर्धेत पुरुष हॉकीत सुवर्णपदक जिंकण्यास अपयश आले. उपांत्य लढतीत मलेशियाकडून हार पत्करल्यानंतर, भारताने पाकिस्तानला हरवून ब्राँझपदक जिंकले, तेवढाच दिलासा. चार वर्षांपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतीय संघाने रिओ ऑलिंपिकसाठी थेट पात्रता मिळविली होती, यंदा तसा योग आला नाही. त्यामुळे टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला पात्रता फेरीत खेळावे लागेल. इंडोनेशियातील अपयशानंतर भारतीय हॉकी संघाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू झाली. ऑक्‍टोबरमध्ये ओमान येथे आशिया चॅंपियन्स करंडक स्पर्धा होणार आहे, तर नोव्हेंबरमध्ये विश्‍वकरंडक स्पर्धा रंगेल. या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धा नजरेसमोर ठेवून भारताने हॉकी संघात युवा रक्ताला प्राधान्य दिले आहे. हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील संभाव्य चमूत अनुभवी सरदार सिंग याला स्थान मिळाले नाही. आधुनिक हॉकीतील एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून सरदारकडे पाहिले जाते, पण तिशी उलटलेल्या या मध्यरक्षकाला भारतीय संघातून डावलले गेले. ३२ वर्षीय सरदार हा संघातील ज्येष्ठ आणि दीर्घानुभवी खेळाडू. आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघाच्या कमजोर कामगिरीस अप्रत्यक्षरीत्या सरदारला जबाबदार धरण्यात आले. 

योग्यवेळी निवृत्ती
संभाव्य खेळाडूंच्या यादीतून नाव गाळल्यानंतर सरदारने शहाणपणा दाखविला. जास्त ताणायचे नाही हे ठरवून त्याने आंतरराष्ट्रीय हॉकीला ‘गुडबाय’ करण्याचे ठरविले. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे हे तब्बल बारा वर्षे भारतीय संघातून खेळलेल्या या निष्णात खेळाडूने जाणले. योगायोग पाहा, २००४-०५च्या सुमारास ज्युनिअर हॉकी शिबिरात सरदारने प्रशिक्षक हरेंद्र यांना प्रभावित केले होते, आता तेच राष्ट्रीय संघाचे मार्गदर्शक असताना हरियानातील या शीख हॉकीपटूने आंतरराष्ट्रीय हॉकीतून संन्यास घेतला. भविष्यात सरदार क्‍लब पातळीवर हॉकी खेळेल, पण भारताच्या जर्सीत तो दिसणार नाही. यावर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी त्याची भारतीय हॉकी संघात निवड झाली नव्हती. युवा दमाच्या भारतीय संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हॉकीत ब्राँझपदकही जिंकता आले नाही. शूएर्ड मरिन यांचे प्रशिक्षकपद गेले आणि त्याजागी हरेंद्र आले. त्यांनी सरदारच्या अनुभवास महत्त्व दिले. भारताने जुलै महिन्यात झालेल्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. मात्र जाकार्ता-पलेमबंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीतील सुवर्णपदकाचे स्वप्न विरले. सरदारनेही निवृत्तीचा विचार पक्का केला. संभाव्य संघातून डावलणे हे त्यास कारण मिळाले. ‘यो-यो’ चाचणीत तो सरस होता, परंतु संघाच्या व्यूहरचनेत चपखलपणे बसत नाही हे प्रशिक्षकांच्या लक्षात आले.

अनन्यसाधारण योगदान 
सरदारचे भारतीय हॉकीतील योगदान अनन्यसाधारण आहे. २००६ ते २०१८ या कालावधीत तो राष्ट्रीय संघातून तीनशेहून जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळला. संघासाठी तो नेहमीच प्रेरक ठरला. सहा वर्षांपूर्वी अर्जुन पुरस्कार, तीन वर्षांपूर्वी पद्मश्री आणि गतवर्षी खेलरत्न पुरस्काराने तो सन्मानित झाला. पदार्पणानंतर दोन वर्षांतच तो भारतीय संघाचा कर्णधार बनला. त्यावेळी तो फक्त २२ वर्षांचा होता. २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केल्यापासून सरदारने मध्यफळीत हुकमत राखली. प्रतिस्पर्ध्यांना नेहमीच त्याची धास्ती वाटायची. सरदारच्या कारकिर्दीची सुरवात आघाडी फळीत झाली, मात्र मध्यफळीत त्याचा जम बसला. संघाच्या मध्यभागी तो अधिक परिणामकारक ठरला. सरदारपाशी उपजत नेतृत्वगुण होते. २००८ ते २०१६ अशी तब्बल आठ वर्षे त्याने भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व प्रभावीपणे सांभाळले. इन्चॉन येथे भारताने एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याच्या कारकिर्दीतील ही अत्त्युच्च कामगिरी ठरली. दोन वेळा त्याने ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले, परंतु भारतीय हॉकी संघाला पदकापर्यंत मजल मारता आली नाही. 

पदक विजेता सरदार सिंग

  •      आशियाई क्रीडा स्पर्धा ः सुवर्ण - २०१४ (इन्चॉन), ब्राँझ - २०१० (ग्वांग्झू) व २०१८ (जाकार्ता-पलेमबंग)
  •      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ः रौप्य - २०१० (दिल्ली) व २०१४ (ग्लासगो)
  •      चॅंपियन्स करंडक ः रौप्य - २०१८ (ब्रेडा)

संबंधित बातम्या