सर्वोत्तम फुटबॉलपटू मॉड्रिच!

किशोर पेटकर
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

क्रीडांगण
 

जागतिक फुटबॉलमध्ये दशकभर सर्वोत्तम खेळाडूच्या किताबासाठी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो व अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्यातच चुरस राहिली. या ‘परंपरे’स यंदा क्रोएशियाच्या लुका मॉड्रिच या मध्यरक्षकाने छेद केला. त्याने वर्षातील ‘फिफा’चा सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू हा मान मिळविला. पुरस्काराच्या शर्यतीत मॉड्रिच याची कामगिरी रोनाल्डोच्या तुलनेत खूपच सरस ठरली, मेस्सी जवळपासही नव्हता. मध्यफळीतील त्याच्या लाजबाव कामगिरीमुळे क्रोएशियाने प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. रशियातील स्पर्धेत फ्रान्सकडून हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, मात्र लुका मॉड्रिच याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू या नात्याने ‘गोल्डन बॉल’ मिळाला. क्‍लब पातळीवरही मॉड्रिचचा खेळ अफलातून ठरला. स्पेनमधील रियाल माद्रिदतर्फे तो खेळतो. २०१२ पासून तो या संघात आहे, गतमोसमापर्यंत या संघात ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याचा सहकारी होता. विश्‍वकरंडकात रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ विशेष प्रभाव पाडू शकला नाही, दुसरीकडे ३३ वर्षीय मॉड्रिचच्या प्रेरक दीर्घानुभवाच्या बळावर क्रोएशियाने आगेकूच राखली. यामुळे मतदानात मॉड्रिचचा वरचष्मा राहिला. त्याने सर्वाधिक २९.०५ टक्के मते मिळविली, तर रोनाल्डोला १९.०८ टक्के मतांचाच लाभ मिळाला.

यथार्थ बहुमान
क्रोएशियाचे प्रशिक्षक झ्लाट्‌को डालिच यांच्यानुसार ‘फिफा’च्या सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी मॉड्रिचला मिळालेली पसंती योग्यच आहे. ‘विश्‍वकरंडक स्पर्धेच्या कालावधीत मॉड्रिच हा आपला मैदानावरील सहाय्यक होता. तोच संघाचा कर्णधार आणि सर्वोत्तम खेळाडूही होता. आता त्याच्यावर जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूची यथार्थ मोहोर उमटली आहे,’ असे सांगत डालिच यांनी क्रोएशियाच्या यशस्वी फुटबॉलपटूची पाठ थोपटली आहे. मॉड्रिचने वर्षभरात क्‍लब व राष्ट्रीय संघाचे मिळून ५६ सामन्यांत प्रतिनिधित्व केले. रियाल माद्रिदने चॅंपियन्स लीग स्पर्धेचेही विजेतेपद मिळविले, त्यात मॉड्रिचच्या मध्यफळीतील समयसूचक खेळ परिणामकारक होता. आपला हा कारकिर्दीतील सर्वोत्तम मोसम असल्याची कबुली मॉड्रिचने दिली आहे.  विश्‍वकरंडक स्पर्धेतील लक्षवेधक कामगिरी मॉड्रिचची लोकप्रियता वाढविणारी ठरली. ‘फिफा’चा वर्षातील सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू ठरल्यानंतर, हा पुरस्कार केवळ आपल्या एकट्याचा नाही याचे भान मॉड्रिचने ठेवले. मनाचा मोठेपणा सिद्ध करताना त्याने श्रेय साऱ्यांनाच दिले. रियाल माद्रिद व क्रोएशिया संघातील सहकारी, प्रशिक्षक, कुटुंबीय यांचाही या पुरस्कारात वाटा असल्याचे त्याने प्रांजळपणे नमूद केले. मॉड्रिच हा ‘प्ले-मेकर’ फुटबॉलपटू. मैदानावरील वेगवान आणि कल्पक खेळ हे त्याचे वैशिष्ट्य. चेंडू नियंत्रणाचे आणि पासिंगमधील त्याचे कौशल्य भन्नाट आहे. त्यामुळे त्याला कौतुकाने ‘मिडफिल्ड मास्टर’ असेही संबोधले जाते. चेंडूवरील तीक्ष्ण नजरेमुळे रियाल माद्रिदच्या चाहत्यांत तो ‘एल पजारो’ (पक्षी) या टोपणनावानेही ओळखला जातो. 

विलक्षण कारकीर्द
लुका मॉड्रिच याची कारकीर्द विलक्षण थरारक आणि आव्हानात्मक आहे. युद्धग्रस्त क्रोएशियातील सामाजिक जीवनाच्या छटा त्याच्या आयुष्यात आहेत. लहानपणी आजोबांसमवेत मोठ्या हौसेने बकऱ्या चारायला नेणाऱ्या लुका याचे आयुष्यच युद्धामुळे बदलले. त्याच्या कुटुंबाला इतर नागरिकांसमवेत निर्वासिताच्या छावणीत राहावे लागले. बाहेर बाँबवर्षाव सुरू असताना छावणीचे स्वरूप प्राप्त झालेल्या हॉटेलमध्ये त्याचे बालपण गेले. तेथील वास्तव्यात मॉड्रिचच्या फुटबॉल गुणवत्तेला खतपाणी मिळाले. १९९१ मध्ये क्रोएशियाला देश या नात्याने स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्यानंतर, मॉड्रिचप्रमाणे कितीतरी गुणवान युवा फुटबॉलपटूंची गुणवत्ता बहरली. सवंगड्यांसमवेत फुटबॉल खेळणाऱ्या मॉड्रिचने अल्पावधीत फारच मोठी मजल मारली.

दृष्टिक्षेपात लुका मॉड्रिचची कारकीर्द

  • प्रमुख क्‍लब संघ ः डायनॅमो झाग्रेब (२००३ ते २००८), टॉटेनहॅम हॉट्‌सपर (२००८ ते २०१२), रियाल माद्रिद (२०१२ पासून)
  • क्रोएशियातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण ः विरुद्ध अर्जेंटिना, मार्च २००६
  • विश्‍वकरंडक स्पर्धा ः २००६, २०१४, २०१८ (उपविजेता)

संबंधित बातम्या