‘खेलरत्न’ मीराबाई!

किशोर पेटकर
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

क्रीडांगण
 

मणिपुरी महिला वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू हिच्यासाठी २०१८ हे वर्ष सुख-दुःखाचे ठरले आहे. भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली याच्यासह ही २४ वर्षीय वेटलिफ्टर यावर्षी ‘खेलरत्न’ पुरस्काराची मानकरी ठरली. भारतीय क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च बहुमान. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘खेलरत्न’ किताबाने सन्मानित होत असताना, मीराबाईच्या मनात पाठीच्या गूढ दुखापतीच्या कटू आठवणीही दाटल्या होत्या. यावर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाईने स्पर्धा विक्रमासह ४८ किलोगटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यापूर्वी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती जगज्जेती बनली होती. मात्र पाठीच्या असह्य वेदनांमुळे मीराबाईस इंडोनेशियातील जाकार्ता-पलेमबंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता आले नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सोनेरी कामगिरीनंतर मे महिन्याच्या अखेरीस तिच्या पाठीच्या दुखण्याने डोके वर काढले. उपचारासाठी ती मुंबई-दिल्लीत गेली. तज्ज्ञांकरवी तपासणी केली, पण दुखापतीचे मूळ कारण काही सापडले नाही. दुखापतीचा ससेमिरा मागे असूनही मीराबाईने आशियाई स्पर्धेसाठी तयारी चालविली, पण अखेरीस तिला शरीराने साथ दिलीच नाही. तिला साधं वाकताही येत नव्हते. पतियाळा येथे प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मीराबाईची मूळपदावर येण्याचा संघर्ष सुरू आहे. सध्याचा काळ पुनर्वसनाचा आहे. वेटलिफ्टिंगमधील तिची कारकीर्द दुखापतीमुळे संकटात आहे, त्याचवेळी ‘खेलरत्न’ पुरस्कारामुळे नवी उमेद, चेतना जागवल्याचे तिने नुकतंच एका मुलाखतीत नमूद केले आहे.

अपयशातून भरारी
मणिपूरची राजधानी इंफाळ येथून वीस किलोमीटरवर असलेल्या नाँगपोक काकचिंग येथील मीराबाई ही धाडशी आणि जिगरबाज. अपयशातून भरारी घेत तिने यश साध्य केलेले आहे. दोन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये तिला प्रचंड मोठा मानसिक आघात सहन करावा लागला. स्पर्धेत तिला वजन उचलता आले नाही. क्‍लीन अँड जर्क प्रकारात तिला एकदाही वजनाचा भार पेलला नाही. या अपयशामुळे तिच्यावर मायदेशात प्रचंड टीका झाली, क्षमतेबाबत संशय व्यक्त झाला. मीराबाईही खचली. वेटलिफ्टिंग सोडून देण्याचा विचार करत असताना तिला प्रशिक्षकांनी सावरले. मीराबाई पुन्हा जबरदस्त इच्छाशक्तीने वजन पेलू लागली. गतवर्षी अमेरिकेत यशस्वी पुनरागमन करताना जगज्जेतेपदाचा मान मिळविला. २२ वर्षानंतर जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय महिला विजेती ठरली. कर्णम मल्लेश्‍वरी हिने १९९४ व १९९५ मध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते, त्यानंतर असा पराक्रम करणारी मीराबाई अवघी दुसरीच भारतीय महिला वेटलिफ्टर ठरली. अमेरिकेतील ॲनाहेम येथील कामगिरीपेक्षा दोन किलो जास्त वजन उचलून मीराबाई गोल्ड कोस्टला सुवर्णपदक गळ्यात मिरविले. रिओतील धक्‍क्‍यानंतर मीराबाईने मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यावर भर दिला. आव्हानाला सामोरे जाण्याचे धैर्य तिला गवसले. याकामी प्रशिक्षक विजय शर्मा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच मीराबाई ‘खेलरत्न’ पुरस्कार स्वीकारत असताना विजय यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मीराबाईच्या क्रीडा जीवनातील हा दुग्धशर्करायोग ठरला.

ऑलिंपिकचे आव्हान
मणिपूरची माजी दिग्गज महिला वेटलिफ्टर कुंजराणी देवी, तसेच मल्लेश्‍वरी यांनी मीराबाई आदर्श मानते. २००७ मध्ये, अकरा वर्षांपूर्वी मीराबाईच्या वेटलिफ्टिंगमधील कारकिर्दीस सुरवात झाली. मेहनतीकडे तिने कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यामुळेच ती थेट देशाची ‘खेलरत्न’ बनू शकली. दोन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये तिच्या परिश्रमावर पाणी फेरले, त्याची भरपाई २०२० मध्ये टोकियोत करण्याचे लक्ष्य मीराबाईसमोर आहे. त्यासाठी ऑलिंपिक पात्रतेचा अडथळा पार करण्याचे आव्हान मीराबाईसमोर आहे. ऑलिंपिकपर्यंत जाण्यासाठी पाठ पूर्णपणे सक्षम हवी. त्यादृष्टीनेच तिचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.

मीराबाईची स्पर्धागणिक प्रगती
     राष्ट्रकुल स्पर्धा ः ग्लासगो (२०१४), रौप्यपदक, १७० किलो
     जागतिक स्पर्धा ः ॲनाहेम (२०१७), सुवर्णपदक, १९४ किलो
     राष्ट्रकुल स्पर्धा ः गोल्ड कोस्ट (२०१८), सुवर्णपदक, १९६ किलो
 

संबंधित बातम्या