संधी हुकली, कामगिरी आश्‍वासक

किशोर पेटकर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

भारताची कामगिरी

भारताची कामगिरी

  •   विजयी विरुद्ध व्हिएतनाम १-०
  •   बरोबरी विरुद्ध इराण ०-०, इंडोनेशिया ०-०
  •   पराभूत वि. दक्षिण कोरिया ०-१

मलेशियात झालेल्या एएफसी १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत भारतीय मुलांची संधी थोडक्‍यात हुकली. उपांत्य फेरी गाठली असती, तर पुढील वर्षी होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता मिळाली असती. दक्षिण कोरिया हा आशियाई फुटबॉलमधील बलाढ्य देश. जिगरबाज भारतीय मुलांनी या कडव्या प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच झुंजविले. निसटत्या एका गोलच्या फरकाने विजय नोंदवून दक्षिण कोरिया संघ उपांत्य फेरीत दाखल झाला, तर भारतीयांनी संधी थोडक्‍यात हुकली. भारतीय संघाची कामगिरी स्पृहणीय आहे. भारतीय फुटबॉलचे भविष्य उज्ज्वल आहे हे या संघाच्या कामगिरीने सिद्ध झाले. मलेशियातील स्पर्धेत भारताने फक्त एक गोल स्वीकारला. ३३६ मिनिटांच्या खेळानंतर दक्षिण कोरियाने भारताचा बचाव भेदण्यात यश मिळविले. स्पर्धेत भारतीय मुलांनी मजबूत तटबंदी राखली, त्यामुळेच साखळी सामन्यात इराणसारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. भारताने सोळा वर्षांपूर्वी, २००२ मध्ये एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तेव्हाही दक्षिण कोरियाकडून १-३ फरकाने मात स्वीकारल्याने भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले होते. यावेळेस चित्र वेगळे दिसले. भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांना कमालीचा घाम गाळायला लावताना दिसला. भारतीय मुलांच्या कामगिरीने राष्ट्रीय संघाचे कर्णधार सुनील छेत्री याची छातीही अभिमानाने फुगली. झुंज देऊन संघ हरला. त्यात लज्जास्पद काहीच नाही. ज्या पद्धतीने खेळ केला ते अभिमानास्पद आहे, तुम्ही धैर्य आणि आशेचा किरण दाखविला आहे. आम्हालाही तुम्ही प्रेरित केले आहे. मान ताठ झाली, या शब्दांत छेत्रीने नवोदितांच्या कामगिरीचे कौतुक केले.

भारतीय प्रशिक्षक परिणामकारक
गोव्याचे बिबियान फर्नांडिस हे ४१ वर्षीय तरुण प्रशिक्षक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा फुटबॉलपटूंनी नेत्रदीपक खेळ केला. बिबियान हे माजी फुटबॉलपटू. गोव्यातील संघांकडून दीर्घकाळ खेळले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षणात कारकीर्द करण्याचे ठरविले. भारतात आज युवा फुटबॉल प्रशिक्षकांची फळी उभी आहे. ही बाब खूपच सकारात्मक आहे. भारतीय फुटबॉल अगदी जवळून अनुभवल्यामुळे त्यांना येथील परिस्थितीची चांगली जाण आहे आणि त्याचे परिणाम संघाच्या कामगिरीतून दिसून येत आहेत.  एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत, तसेच त्यापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत, पात्रता फेरीतील सामन्यांत भारतीय संघ निर्धाराने खेळला. सर्वच आघाड्यांवर सरस खेळ केला. भारतीय प्रशिक्षक येथील युवा खेळाडूंना चांगल्या तऱ्हेने समजून घेताना दिसतात. जरा मागे डोकावू, २०१६ मध्ये एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धा भारतात- गोव्यात झाली होती.  साखळी फेरीत भारताला फक्त एक गुण नोंदविता आला. त्यावेळी जर्मनीचे निकोलाय ॲडम प्रशिक्षक होते. तेव्हा भारताला तब्बल नऊ गोल स्वीकारावे लागले होते. नंतर यजमान या नात्याने भारत गतवर्षीच्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळला. या स्पर्धेपूर्वी संघातील युवा खेळाडूंनी ॲडम यांच्या गैरवर्तणुकीबद्दल बंड केले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तातडीने प्रशिक्षक बदलावा लागला, नंतर पोर्तुगालचे लुईस नॉर्टन मातोस आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय मुलांना विश्‍वकरंडकात तिन्ही सामने गमवावे लागले व फक्त एकच गोल नोंदविता आला. तुलनेत बिबियान यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय १६ वर्षांखालील संघ खूपच धैर्यवान वाटला. त्यांनी झुंजार वृत्ती प्रदर्शित केली.

सारं काही संपलं नाही...
एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत भारतीयांनी मोहीम आश्‍वासकरीत्या संपली, तरीही खेळाडूंच्या मनात संधी हुकल्याची हुरहूर कायम राहील. ही सल दूर करताना, ‘सारं काही संपलेलं नाही,’ असं सांगत बिबियान यांनी युवा फुटबॉलपटूंना धीर दिला आहे.  १६ वर्षांखालील  स्पर्धा संपलेली आहे, आता १९ वर्षांखालील स्पर्धेसाठी तयारी करा, यावेळच्या कामगिरीने अनुभवाच्या श्रीमंतीत भर पडली आहे, असा संदेश बिबियान यांनी मुलांना दिला आहे.

संबंधित बातम्या