जिगरबाज देवेंद्रचा ‘गुडबाय’

किशोर पेटकर
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

क्रीडांगण
 

दिव्यांग क्रीडापटूंच्या पॅरालिंपिक स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केलेला, भारताचा महान पॅराॲथलिट देवेंद्र झाझरिया याने थांबायचे ठरविले आहे. दोन पॅरालिंपिक स्पर्धेत भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकलेल्या ३७ वर्षीय देवेंद्रची कामगिरी अजोड आहे. आता खांद्याच्या दुखापतीमुळे त्याने क्रीडा मैदानास ‘गुडबाय’ करण्याचे निश्‍चित केले आहे. दुखापतीचा ताण झेलण्यास शरीर असमर्थ आहे हे कळून चुकल्यावर या जिगरबाज खेळाडूने विनाकारण कारकीर्द ताणायची नसल्याचे ठरविले. दुखापतीमुळे देवेंद्रला भाला दूरवर फेकताना त्रास होतोय. खांद्याच्या असह्य वेदानांमुळे देवेंद्रच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून आले. जाकार्ता येथे झालेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला ५९.१७ मीटर कामगिरीसह चौथा क्रमांक मिळाला. निवृत्तीची ही योग्य वेळ आहे हे देवेंद्रने जाणले. क्रीडा क्षेत्रातील ‘अर्जुन’, ‘खेलरत्न’, तसेच ‘पद्मश्री’ आदी सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या देवेंद्रची कारकीर्द विलक्षण आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावादाच्या बळावर भालाफेकीत असामान्य कामगिरी नोंदविली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने रिओ पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. दोन पॅरालिंपिक स्पर्धांत सोनेरी यश साकारणारा तो पहिला भारतीय पॅराॲथलिट ठरला. चिकाटी, जिद्द या बळावर दिव्यांग असूनही मेहनती देवेंद्रची क्रीडा मैदानावरील कारकीर्द झळाळती आणि असामान्य ठरली. त्याला सलाम करायलाच हवा.

यशाला गवसणी
भालाफेकपटू देवेंद्रने कधीच हार मानली नाही. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्याने यशाला गवसणी घातली. अथेन्स येथे २००४ मध्ये झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत त्याने एफ-४६ गटातील भालाफेकीत पहिले सुवर्णपदक जिंकले. तेव्हा दिव्यांगांसाठी देशात विशेष क्रीडा सुविधाही नव्हत्या. नंतर २००८ व २०१२ मधील पॅरालिंपिक स्पर्धेत त्याच्या गटाचा समावेश नव्हता. भालाफेकीत त्याचा सराव कायम राहिला. रिओ येथील पॅरालिंपिक स्पर्धा त्याला खुणावत होती. २०१६ मधील पॅरालिंपिक स्पर्धेत देवेंद्रच्या एफ-४६ गटाचा समावेश झाला. प्रेरित झालेल्या या प्रतिभासंपन्न भारतीय ॲथलिटने सरस कामगिरीसह आणखी एक पॅरालिंपिक सुवर्णपदक जिंकले. २००४ मध्ये त्याने ६२.१५ मीटर अंतरावर भाला फेकला होता, २०१६ मध्ये त्याने ६३.९७ मीटरचा विश्‍वविक्रम नोंदविला. निराशा झटकून कायम आशावादी राहणे हा देवेंद्रच्या यशाचा मंत्र. बालपणी अपघाताने डावा हात कोपरापासून कापावा लागला, तरीही त्याची उमेद कायम राहिली. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे अडथळ्यांना कणखरपणे सामोरा गेला. लग्नानंतर पत्नीनेही त्याचे मनोबल उंचावले. त्याची पत्नी कबड्डीपटू, तिने क्रीडापटू पतीची योग्यप्रकारे पाठराखण करताना परिपूर्ण सहचारिणीची भूमिका चोख बजावली.

आदर्शवत कारकीर्द 
देवेंद्रची ॲथलेटिक्‍समधील कामगिरी केवळ दिव्यांग क्रीडापटूंसाठीच नव्हे, सर्वसामान्य खेळाडूंसाठीही आदर्शवत आहे. साधारणतः आठ वर्षांचा असताना त्याला ‘दिव्यांग’ प्राप्त झाले. झाडावर चढलेला असताना जिवंत वीजवाहिनीस चुकून स्पर्श झाल्यामुळे त्याला हात गमवावा लागला. देवेंद्रने दैवाला दोष देत जीवन कंठण्यास नकार दिला, क्रीडा मैदानावर तो मोठ्या उत्साहाने भाग घेऊ लागला. भालाफेकीने त्याने पारंगतता मिळविली. शालेय पातळीवर तो भालाफेकीत सर्वसामान्य खेळाडूंनाही मागे टाकत असे. देवेंद्रच्या नैसर्गिक गुणवत्तेने प्रशिक्षक रिपुदामन सिंग यांना प्रभावित केले. राजस्थानमधील या परिश्रमी ॲथलिटला नवी दिशा गवसली, त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रत्यक्षातही आणली. २००२ मध्ये देवेंद्रने दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तेव्हापासून सलग सोळा वर्षे त्याने आंतरराष्ट्रीय मैदानावर भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी नोंदविली.  

देदीप्यमान देवेंद्र
  २००४ मध्ये अथेन्स, तर २०१६ मध्ये रिओ पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक
  २०१४ मध्ये सर्वोत्तम पॅरा-खेळाडूचा बहुमान
  जागतिक पॅरा स्पर्धेत २०१३ मध्ये लिऑन येथे सुवर्ण, तर २०१५ मध्ये दोहा येथे रौप्य
  २०१४ मध्ये इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

संबंधित बातम्या