सूरजची देदीप्यमान ‘चाल’

किशोर पेटकर
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

क्रीडांगण
 

युवा ऑलिंपिकमध्ये भारतीय ॲथलेटिक्‍ससाठी १८ वर्षीय सूरज पंवार याची कामगिरी ऐतिहासिक आहे. या स्पर्धेत ॲथलेटिक्‍समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ॲथलिट हा मान त्याच्या नावे नोंद झाला आहे. अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे झालेल्या तिसऱ्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत उत्तराखंडच्या सूरज याने पायांत उसनवारीवरील शूज चढवून देदीप्यमान ‘चाल’ केली. पुरुषांच्या ५ हजार चालण्याच्या स्पर्धेत त्याला रौप्यपदक मिळाले. ही कामगिरी निश्‍चितच भूषणावह आहे. सूरजने झेललेल्या हालअपेष्टा, कौंटुबिक आघात यावर मलमपट्टी करणारे मौल्यवान पदक त्याने जिंकले. कोवळ्या वयात वडिलांना गमावल्यानंतर आईने उपसलेले कष्ट, दोघा मोठ्या भावांनी दिलेला आधार यामुळेचआंतरराष्ट्रीय मैदानावर देशाचा ध्वज मानाने फडकविण्याचे धैर्य सूरजला प्राप्त झाले. या परिश्रमी मुलाची कहाणी डोळ्यांत पाणी आणणारी आहे. जबरदस्त इच्छाशक्ती आणि जिद्द या बळावर त्याने युवा ऑलिंपिकमध्ये रौप्यपदकास गवसणी घातली. सुवर्णपदक विजेत्या इक्वेडोरच्या ऑस्कर पॅटिन याच्यानंतर सूरजला दुसरा क्रमांक मिळाला. हे रौप्यपदक देश आणि आपल्या कुटुंबासाठी अनमोल भेट असल्याचे सूरजने नमूद करत जीवनातील कटू स्मृतींवर फुंकर घातली. ब्युनॉस आयर्समधील स्पर्धेत ‘चालताना’ त्याने भारताचा ऑलिंपियन मनीषसिंग रावत याने दिलेले शूज वापरले. शूज आकाराने किंचित मोठे होते, सॉक्‍सची आणखी एक जोडी पायात चढवून सूरजने रौप्यपदकास गवसणी घातली. बिकट कौंटुबीक परिस्थितीमुळे सूरजला स्वतःसाठी चांगले शूज घेणे परवडत नव्हते, त्याच्या मदतीस ‘मनीषभाई’ आले.

पितृछत्राचे भाग्य नव्हते
सूरजचे वडील उदयसिंग पंवार हे उत्तराखंडमधील वनखात्यातील कंत्राटी कर्मचारी. आई पूनम शिक्षणापासून दूर. वनखात्याच्याच ‘नर्सरी’त मोलमजुरी हे त्यांचे रोजंदारीवर काम. सूरजला दोन मोठे भाऊ आहेत, शुभम आणि नीरज. सूरज सुमारे चार महिन्यांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांची डेहराडूनजवळील जंगलात ‘लाकूड माफियां’कडून हत्या झाली. पितृछत्राचे भाग्य सूरजला लाभलेच नाही. फक्त छायाचित्र पाहून त्याने वडील अनुभवले. आईने मुलांची जबाबदारी पेलली. त्यांना शिक्षणही दिले. काराबारी हे त्यांचे गाव, तेथून लगतच्या झेरवार्डी या गावात शाळा. शाळेसाठी सूरज नेहमी पायपीट करायचा. वर्गात वेळेवर पोचण्यासाठी वेगाने चालण्याची सवय त्याला लहानपणीच जडली. शालेय जीवनात तो ॲथलेटिक्‍सकडे आकर्षित झाला. शारीरिक शिक्षण शिक्षकांना सूरजच्या चालण्याच्या गुणवत्तेने प्रभावित केले आणि ट्रॅकवरील कारकिर्दीस गांभीर्याने सुरवात झाली. आईनेही मुलाच्या उपजत नैसर्गिक गुणवत्तेस प्रोत्साहन दिले. शाळेचे ‘शूज’ परवडणारे नव्हते, तरीही आई पदरमोड करून मुलास नवे शूज आणून देई. दोन वर्षांपूर्वी त्याची महाराणा प्रताप क्रीडा महाविद्यालयान निवड झाली, इतर दोन विद्यार्थ्यांसह तो भाड्याच्या खोलीत राहू लागला. वेगाने चालण्याचा सराव कायम राहिला. प्रतिभेला अखेर साह्य मिळाले. कोईंबतूर येथील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याची क्रीडा नैपुण्य कार्यक्रमाअंतर्गत निवड झाली. त्याला स्पोर्टस हॉस्टेलमध्ये राहायला मिळाले, चांगला आहार मिळू लागला. हे सुवर्णपदक त्याच्या कारकिर्दीत आश्‍वासक दिशादर्शक ठरले.

मेहनतीवर विश्‍वास
अनूप बिश्‍त हे सूरजचे प्रशिक्षक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज आला, तेव्हा तो चालण्याच्या तंत्राबाबत साफ अनभिज्ञ होता. शर्यतीत फक्त चालायचे असते एवढेच त्याला माहीत होते, तांत्रिक बारकाव्यांचे अजिबात ज्ञान नव्हते, पण जिगर व महत्त्वाकांक्षा होती, मेहनतीवर विश्‍वास होता. चांगले ‘शूज’ नसले, तरी वेगाने चालणे त्याने टाळले नाही. त्यामुळेच राष्ट्रीय मैदाने गाजवत सूरजने आंतरराष्ट्रीय मैदानावर पदकाची किमया साधली.

सूरजची पदकप्राप्ती
  कोईंबतूर येथील ३२व्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत ५,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्ण
  हैदराबाद येथील युवा राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धेत १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य
  गतवर्षी विजयवाडा येथे 
ज्युनियर राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धेत १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत ब्राँझ
  यावर्षी एप्रिलमध्ये २० वर्षांखालील ज्युनियर फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक, तर बॅंकॉक येथील आशियाई पात्रता स्पर्धेत रौप्य
     यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये ब्युनॉस आयर्स येथे युवा ऑलिंपिकमध्ये ५,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य

संबंधित बातम्या