प्रवीणची आश्‍वासक तिहेरी उडी

किशोर पेटकर
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

क्रीडांगण
 

तमिळनाडूमधील थंजावूर जिल्ह्यातील प्रवीण चित्रवेल हा युवा ॲथलिट. घरची परिस्थिती बेताची. वडील गावातील शाळेत सुरक्षारक्षक, तर आई शेतकाम करणारी मजूर. दोघांच्या रोजंदारीवर घर चालते. तिघा भावंडात प्रवीण मधला. गरिबीतून वर आलेल्या प्रवीणने झुंजार वृत्ती प्रदर्शित करताना आंतरराष्ट्रीय मैदान गाजविले आहे. मेहनती प्रवीणची जबरदस्त तिहेरी उडी देशासाठी  पदकविजेती ठरली. या सतरा वर्षीय मुलाने यंदाच्या युवा ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकाची कमाई करत साऱ्यांचे लक्ष वेधले. अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे प्रवीणने तिहेरी उडीत तिसरा क्रमांक मिळविला. युवा ऑलिंपिकच्या इतिहासात ॲथलेटिक्‍समध्ये पदक जिंकणारा तो अवघा दुसरा भारतीय ठरला. ब्युनॉस आयर्स येथेच सूरज पनवार याने पुरुष गटातील ५००० मीटर शर्यतीत  रौप्यपदक मिळविले होते, त्यानंतर प्रवीणने अफलातून उडी साधली. नव्या नियमानुसार तिहेरी उडीत खेळाडू दोन टप्प्यात सहभागी होतो. प्रवीणने पहिल्या टप्प्यात १५.८४ मीटर, तर दुसऱ्या टप्प्यात १५.६८ मीटरवर उडी मारत एकत्रित ३१.५२ मीटरची नोंद केली. क्‍यूबाच्या अलेजांड्रो दियाझ याने सुवर्णपदक जिंकताना एकत्रित ३४.१८ मीटर, तर नायजेरियाच्या इमॅन्युअल ओरित्सेमेयिवा याने रौप्यपदक पटकाविताना एकत्रित ३१.८५ मीटर नोंदविले. प्रवीणने किंचित सरस अंतर नोंदविले असते, तर त्याला दुसरा क्रमांक निश्‍चितच मिळाला असता. युवा ऑलिंपिकमधील पदक महत्त्वाचे, रंग कोणताही असो. ब्युनॉस आयर्समधील ब्राँझपदकामुळे प्रवीणचा आत्मविश्‍वास दुणावलाय हे स्पष्टच आहे. त्याचा लाभ त्याला सीनियर पातळीवरील स्पर्धांत खेळताना होईल. 

मार्गदर्शकांनी दाखविली दिशा
प्रवीण याच्या कारकिर्दीत ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक इंदिरा सुरेश यांचा मोलाचा वाटा आहे. प्रवीण हा लहानपणापासूनच धडपड्या. शालेय पातळीवर खेळात त्याचा सहभाग असायचा. प्रवीणच्या मैदानी स्पर्धेतील कामगिरीची दखल घेत, वडिलांना शाळेने सुरक्षारक्षकाची नोकरी दिली. चेन्नईतील क्रीडा नैपुण्य केंद्रात ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक या नात्याने कार्यरत असताना इंदिरा यांना प्रवीणच्या कच्च्या, पण प्रतिभावान गुणवत्तेने प्रभावित केले. त्यांनी या मुलास आपल्या पंखाखाली घेतले. तेव्हा तो सातव्या इयत्तेत होता. ‘मेंटॉर’ या नात्याने इंदिरा यांनी प्रवीणसाठी आदर्श मार्गदर्शकाची भूमिका चोख वठविली. भारतीय क्रीडा विकास प्राधिकरणाच्या सेवेत असलेल्या इंदिरा यांनी प्रवीणला नेहमीच उत्तेजन दिले, प्रवीणने मार्गदर्शकांना निराश केले नाही. कालांतराने इंदिरा यांची चेन्नई येथून नागरकोईल येथे बदली झाली, प्रवीणनेही चेन्नई सोडले व तो प्रशिक्षकांसमवेत नव्या ठिकाणी आला. इंदिरा यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा त्याचा हट्ट कायम राहिला. कर्नाटकातील मंगळूर येथील महाविद्यालयात प्रवीणला क्रीडा कोट्यातून प्रवेश मिळाला, पण तो वर्गात नसतोच. परीक्षा देण्यापुरता तो महाविद्यालयात जातो. इंदिरा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास महाविद्यालयाने परवानगी दिलेली आहे. 

दोन वर्षांत भरारी
प्रवीणने दोन वर्षांपूर्वी तिहेरी उडीवर जास्त लक्ष केंद्रित केले. सरावात झोकून दिलेला प्रवीण क्वचितच घरी जातो. वडीलच त्याला भेटायला येतात. इंदिरा यांच्या मतानुसार, प्रवीणमध्ये अफाट गुणवत्ता आहे. त्याने आणखीन परिश्रम घेतले आणि तंत्र अधिकच प्रगत केले, तर आशियाई क्रीडा स्पर्धा, तसेच ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत तो नक्कीच मजल मारू शकतो. राष्ट्रीय पातळीवरील ज्युनिअर स्पर्धांत प्रवीणने पदके जिंकलेली आहेत. पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय शिबिरातही स्थान मिळाले. घरच्या गरिबीत प्रवीण भरडला गेला असता, तर कदाचित आंतरराष्ट्रीय पदकविजेता कदापी बनला नसला. त्याने हार मानली नाही. कणखर मनोबलाच्या बळावर तिहेरी उडीत लौकिक संपादन केला. इंदिरा सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी स्वप्ने पाहत प्रतिकूल परिस्थितीला झुकण्यास भाग पाडले. सीनिअर पातळीवर तो कितपत यशस्वी ठरेल हे काळच ठरवेल, मात्र या होतकरू मुलाने अपेक्षा उंचावल्या आहेत हे निश्‍चित. 

पदकविजेता ॲथलिट प्रवीण
     ब्राँझपदक ः युवा ऑलिंपिक - २०१८, ब्युनॉस आयर्स
     रौप्यपदक ः राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्‍स - २०१८, कोईंबतूर
     सुवर्णपदक ः खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय स्पर्धा - २०१८, नवी दिल्ली

संबंधित बातम्या