बजरंगला यशाची हुलकावणी

किशोर पेटकर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

क्रीडांगण
 

हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनीया याचे सुवर्णपदक थोडक्‍यात हुकले. अंतिम लढतीत त्याला जपानचा १९ वर्षी मल्ल ताकुतो ओतोगुरो भारी ठरला. त्यामुळे बजरंगला सुशील कुमारच्या विक्रमाशी बरोबरी साधता आली नाही. सुशीलने २०१० मध्ये मॉस्कोतील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. बजरंगला यंदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले, मात्र जागतिक स्पर्धेत दोन वेळा पदके जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. बजरंगने २०१३ मध्ये बुडापेस्ट येथेच झालेल्या जागतिक स्पर्धेत ६० किलो वजन गटात ब्राँझपदकाची कमाई केली होती. यंदा तो ६५ किलो वजनगटात खेळला. या २४ वर्षीय भारतीय मल्लास जपानी मल्लाचे आव्हान पेलवले नाही. समाधान एवढेच, की बजरंगच्या पदकाचा रंग बदलून यावेळेस रुपेरी झाला. बजरंगची यावर्षीची कामगिरी कौतुकास्पद आहे. यावर्षी एप्रिलमध्ये त्याने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुवर्णपदक जिंकले होते, नंतर ऑगस्टमध्ये इंडोनेशियातील जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानी मल्लास हरवून बजरंगने आणखी एक सुवर्णपदक जिंकले होते. तीन प्रमुख स्पर्धांत दोन सुवर्ण आणि एक रौप्य ही त्याची कामगिरी स्पृहणीय आहे. २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत बजरंग पदकाचा दावेदार असेल. जागतिक स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्तीत अंतिम लढतीपर्यंत धडक मारणारा बजरंग हा चौथा भारतीय मल्ल ठरला. सुशीलचा अपवाद वगळता इतरांना रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. २०१३ मध्ये अमित दहिया, तर १९६७ मध्ये बिशंबर सिंग अंतिम लढतीत पराभूत झाला होता. पुरुषांच्या कुस्तीत उदय चंद याने १९६१ मध्ये, रमेश कुमारने २००९ मध्ये, तर नरसिंग यादवने २०१५ मध्ये ब्राँझपदकाची कमाई केली होती. बजरंगची कामगिरी आगळी ठरली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपल्या पदकाचा रंग बदलणे बजरंगला आवडते. २०१४ साली इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तो ६१ किलोगटात रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ६५ किलोगटात सुवर्णपदकास गवसणी घातली. राष्ट्रकुल स्पर्धेत २०१४ मध्ये ग्लासगो येथे रौप्यपदक पटकाविल्यानंतर यंदा ग्लासगो येथे त्याने सुवर्णपदक प्राप्त केले. 

‘खेलरत्न’साठी दुर्लक्ष
भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळण्याची बजरंगला अपेक्षा होती. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, तसेच आशियाई कुस्तीत ब्राँझपदक जिंकलेल्या बजरंगला डावलले गेले. हरियानातील झज्जर जिल्ह्यातील हा मल्ल कमालीचा नाराज झाला. न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही त्याने दिला, केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनाही भेटला. अखेरीस ‘मेंटॉर’ योगेश्‍वर दत्त याने बजरंगची समजूत काढली. क्रिकेटपटू विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, मात्र पुरस्कारासाठी आपल्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल बजरंगला वेदना झाल्या. निराशेचा परिणाम त्याने कामगिरीवर अजिबात होऊ दिला नाही. योगेश्‍वरच्या सल्ल्यानुसार बुडापेस्टला नव्या उमेदीने तो कुस्तीच्या मॅटवर उतरला. अंतिम फेरीपर्यंत मजल गाठत फॉर्म कायम असल्याचे सिद्ध केले.

योगेश्‍वर आहे आदर्श
हरियानाचा ऑलिंपिक पदक विजेता मल्ल योगेश्‍वर दत्त याला बजरंग आदर्श व प्रेरणास्रोत मानतो. योगेश्‍वरच्या तालमीत बजरंगला नवा आत्मविश्‍वास गवसला. ‘तू जिंकू शकतो, तूच सर्वोत्तम आहेत,’ असे सांगत योगेश्‍वरने बजरंगला नेहमीच प्रोत्साहित केले. योगेश्‍वरच्या सोनीपत येथील आखाड्यात बजरंगचा सराव चालतो. ऑलिंपिक पदकविजेत्याचा अनुभव बजरंगसाठी लाखमोलाचा ठरला आहे. प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य आणि दर्जेदार असला, तरी तो दबाव घेत नाही. योगेश्‍वरने लंडन ऑलिंपिकमध्ये कुस्तीतील ब्राँझपदक जिंकले, आता त्याचा शिष्यही गळ्यात ऑलिंपिक पदक मिरविण्यासाठी मेहनत घेत आहे.

बजरंगची प्रमुख पदके
  जागतिक स्पर्धा ः सुवर्ण (२०१८), रौप्य (२०१३)
  आशियाई क्रीडा स्पर्धा ः सुवर्ण (२०१८), रौप्य (२०१४)
  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ः सुवर्ण (२०१८), रौप्य (२०१४)
  आशियाई कुस्ती स्पर्धा ः सुवर्ण (२०१७), रौप्य (२०१४), ब्राँझ (२०१३, २०१८)

संबंधित बातम्या