मोटो रायडर मार्किझचा झंझावात

किशोर पेटकर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

क्रीडांगण
 

वेगवान, थरारक आणि श्‍वास रोखून धरणाऱ्या ‘मोटो ग्रांप्री’ स्पर्धेत स्पॅनिश रायडर मार्क मार्किझ पाचव्यांदा जगज्जेता ठरला. मोसमातील तीन शर्यती बाकी असतानाच त्याने जगज्जेतेपदावर मोहोर उमटविली. जपानमधील ग्रांप्रीत त्याने पहिला क्रमांक मिळविला. २०१८ मध्ये त्याने जिंकलेली ही आठवी शर्यत ठरली. ‘होंडा’च्या या कौशल्यसंपन्न रायडरने जवळचा प्रतिस्पर्धी ‘डुकाटी’चा अँड्रिया डोव्हिझिओसो याच्यावर शंभरपेक्षा जास्त गुणांची आघाडी संपादत सलग तिसरे जगज्जेतेपद निश्‍चित केले. मोटो रायडिंगमधील  प्रिमिअर गटात पाच वेळा विश्‍वविजेतेपद पटकाविणारा तो सर्वांत युवा रायडर ठरला. एकंदरीत विचार करता, त्याचा हा सातवा जागतिक किताब ठरला. आठ वर्षांपूर्वी त्याने १२५ सीसी गटात जागतिक करंडक पटकावून जगज्जेतेपदाच्या मालिकेस सुरवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी तो ‘मोटो २’ जागतिक विजेता ठरला होता. लोकप्रिय ‘मोटो जीपी’त पदार्पण केल्यानंतर अनोखा ठसा उमटवत त्याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ‘मोटो जीपी’त पाचवे जगज्जेतेपद निश्‍चित झाले तेव्हा तो २५ वर्षे व २४६ दिवसांचा होता. त्यावेळी त्याने इटलीच्या व्हॅलेन्टिनो रोसी याला मागे टाकले. रोसीने पाचव्यांदा जगज्जेतेपद मिळविले, तेव्हा तो २६ वर्षे आणि २२१ दिवसांचा होता. सर्वप्रकारच्या मोटो प्रकारात एकत्रितपणे सात किंवा त्यापेक्षा जास्त विश्‍वविजेतीपदे मिळविणारा तो आठवा रायडर ठरला आहे. जियानकोमो आगोस्तिनी याने सर्वाधिक १५ वेळा जगज्जेतेपद मिळविले आहे. त्यानंतर अँजेल निएटो (१३), व्हॅलेन्टिनो रोसी (९), माईक हेलवूड (९), कार्लो उबियाली (९), फिल रीड (७), जॉन सर्टीस (७) यांचा क्रम लागतो. ‘मोटो जीपी’ स्पर्धेत पाच किंवा जास्त वेळ जगज्जेता ठरणारा मार्किझ हा माईक डूहॅम, रोसी व आगोस्तिनी यांच्यानंतरचा चौथा रायडर आहे. 
जबरदस्त रायडिंग
जबरदस्त रायडिंग हे मार्किझचे वैशिष्ट्य. मोटो २ मालिकेतील यशस्वी कामगिरीने २०१३च्या मोसमासाठी त्याची होंडा संघात निवड झाली. पाचही मोटो जीपी जगज्जेतीपदे त्याने याच संघाची मोटरबाईक वापरून संपादन केलेली आहेत. होंडा या जपानी मोटर उत्पादक संघाचे प्रतिनिधित्व करताना यापूर्वी माईक डूहॅम याने पाच वेळा जगज्जेतेपद मिळविले होते. मार्किझने मोटो जीपी गटातील पदार्पणात जगज्जेतेपद पटकाविले. त्यावेळी तो वीस वर्षांचा होता. सहा मोसमात त्याने मोटो जीपी शर्यतीत वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. भन्नाट वेग, थक्क करणारे नियंत्रण,  आक्रमक रायडिंग आणि धाडस यांचे सुरेख संगम साधत मार्किझ अव्वल ठरला आहे. 
जिगरबाज रायडर
मोटो २ मालिकेत सहभागी असताना त्याला अपघात झाला. डोळ्यास इजा झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. सहा वर्षांपूर्वीची ही घटना, त्यामुळे त्याच्या मोटो रायडिंग कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती होती. मात्र हा धैर्यवान युवक डगमगला नाही. दोन महिन्यांतच पुन्हा बाईकवर बसला आणि वेगाने रायडिंग करू लागला. डोळ्याची इजा आणि शस्त्रक्रियेनंतर यशस्वी पुनरागमन करत मार्किझने २०१२ साली मोटो २ प्रकारात विश्‍वविजेतेपद मिळविले. स्पेनमधील बार्सिलोना येथून सुमारे शंभर किलोमीटरवर असलेले सेर्व्हेरा हे मार्किझचे गाव. तेथेच त्याची मोटो रायडिंगची गुणवत्ता बहरली. चार वर्षांचा असताना मार्किझने पालकांकडे मोटरबाईकचा हट्ट धरला, बालहट्ट पुरविताना वडिलांनी त्याला लहान आकाराची ‘मिनी बाईक’ घेऊन दिली. तेथूनच मार्किझच्या झळाळत्या मोटो कारर्किर्दीस सुरवात झाली. एमिलिओ अल्झामोरा यांनी या मुलाची गुणवत्ता हेरली. अल्झामोरा हे १२५ सीसी बाईक रेसिंगमधील माजी विश्‍वविजेते. त्यांनी मार्किझच्या गुणवत्तेला खतपाणी घातले. योग्य मार्गदर्शन आणि पद्धतशीर नियोजन यामुळे मार्किझच्या रायडिंगने वेग घेतला.

मार्क मार्किझची जगज्जेतीपदे
     मोटो जीपी, (५) ः २०१३, २०१४, २०१६, २०१७, २०१८
     मोटो २, (१) ः २०१२
     १२५ सीसी, (१) ः २०१०

संबंधित बातम्या