शुभांकरचे संघर्षमय यश 

किशोर पेटकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

क्रीडांगण
 

कोलकत्याच्या शुभांकर डे याला दर्जेदार बॅडमिंटन खेळायचे होते. त्याने खेळात कारकीर्द करण्याऐवजी नोकरी करावी हा पालकांचा आग्रह होता. बॅडमिंटनसाठी शुभांकरला घरून पळावे लागले. तेव्हा तो ज्युनियर खेळाडू होता. खिशात जास्त पैसेही नव्हते, पण जिद्द होती. महाराष्ट्रातील ठाणे येथील श्रीकांत वाड यांच्या बॅडमिंटन अकादमीत शुभांकर दाखल झाला. बॅडमिंटनचे दर्जेदार प्रशिक्षण घेत, खेळात व्यावसायिक कारकीर्द करणे हेच त्याचे ध्येय होते. काही वर्षे वाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर शुभांकरची पुन्हा संघर्षयात्रा सुरू झाली. देशातील प्रमुख बॅडमिंटन अकादमीत त्याला प्रवेश मिळाला नाही. पण त्यामुळे तो निराश झाला नाही, उलट प्रेरित झाला. संधी शोधू लागला. युरोपमध्ये खेळण्यास सुरुवात केली. अखेर त्याला मोठे यश मिळाले. जर्मनीतील सारब्रुकेन येथे झालेली सुपर १०० गटातील सारलॉरलक्‍स खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यामुळे हा २५ वर्षांचा मेहनती खेळाडू प्रकाशझोतात आला. अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडच्या पाचव्या मानांकित राजीव औसेफ याला नमविले. अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत शुभांकरने बलाढ्य चिनी बॅडमिंटनपटूंना नमविण्याचा पराक्रम साधला होता. माजी जागतिक आणि ऑलिंपिक विजेता लिन डॅन याला त्याने दुसऱ्या फेरीत, तर उपांत्य फेरीत रेन पेंग्बो याला नमविले. गतवर्षी त्याने पोर्तुगाल आणि आईसलॅंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तसेच राष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरीही गाठली होती, पण जर्मनीतील यश खास ठरले. बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव करत शुभांकरने करंडक जिंकला. 

डेन्मार्कमध्ये संधी 
शुभांकर हा अतिशय परिश्रम करणारा बॅडमिंटनपटू आहे. कोलकत्यात बादल भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रारंभीची गुणवत्ता बहरली. दर्जेदार प्रशिक्षणासाठी त्याला देशातील मोठ्या अकादमीत भरती व्हायचे होते, पण नकारामुळे ते शक्‍य झाले नाही. दरम्यानच्या काळात शुभांकर राष्ट्रीय पातळीवर लक्षवेधक ठरत होता, त्यामुळे नोकरीची संधीही चालून आली. नोकरीत अडकलो, तर व्यावसायिक बॅडमिंटन खुंटणार ही भीती त्याला वाटत होती. कालांतराने पालकांचा विरोध मावळला, पण सुरुवातीपासून सर्वाधिक पाठराखण मोठ्या बहिणीनेच केली. त्यामुळे शुभांकरचा बॅडमिंटन प्रवास सुसह्य झाला. जर्मनीत करंडक जिंकल्यानंतर, शुभांकरने पहिले प्रशिक्षक, तसेच बहिणीला यश अर्पण केले. देशात प्रशिक्षणाबाबत सापत्नभावाची वागणूक मिळालेल्या शुभांकरला डेन्मार्कमध्ये मोठी संधी मिळाली. तेथील ग्रेव्ह स्ट्रॅंड्‌स क्‍लबकडून खेळताना त्याला व्यापक स्पर्धात्मक व्यासपीठ लाभले. त्यामुळे त्याच्या खेळाचा दर्जाही उंचावला. युरोपात शुभांकरला एकाकी जीवनालाही सामोरे जावे लागले, पण तो डगमगला नाही. तेथे वैयक्तिक प्रशिक्षकही नव्हता, त्यामुळे आपल्या, तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यांचे व्हिडिओ चित्रण करून स्वतःच कच्चे दुवे हेरत होता. त्यातून शिकत गेला, खेळात सुधारणा घडवून आणली. 

अकादमीचे स्वप्न 
देशात मोठ्या अकादमीत प्रशिक्षण घेण्याची संधी लाभली नाही, पण शुभांकरने स्वतःची अकादमी सुरू करण्याचे ध्येय प्रत्यक्षात आणले आहे. व्यावसायिक बॅडमिंटनमधील त्याची कारकीर्द आकार घेत आहे, त्याचवेळी इतरांनाही सुविधा मिळवून देण्याचा विडा त्याने उचलला आहे. त्यासाठी इंडोनेशियातील अनुभवी प्रशिक्षक नूर मुस्ताकिम चायो यांना निमंत्रित केले. त्याचा वैयक्तिक प्रशिक्षकाचा प्रश्‍नही निकालात निघाला. ‘लक्ष्य’ या संस्थेचे त्याला पाठबळ लाभले. सुरवातीचा संघर्ष आणि अनुभवागणिक शुभांकर चांगलाच परिपक्व बनला आहे. त्याचा नातेवाईक अकादमीचे व्यवस्थापन सांभाळतो, त्यामुळे शुभांकरला स्वतःचा खेळ आणि तयारी यावर लक्ष केंद्रित करणे शक्‍य होते. नोव्हेंबर २०१८च्या जागतिक क्रमवारीत शुभांकरला ५४वा क्रमांक मिळाला, हे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. 

शुभांकरने जिंकलेल्या प्रमुख स्पर्धा 
 २०१३ ः केनिया इंटरनॅशनल 
 २०१४ ः बाहरीन इंटरनॅशनल 
 २०१७ ः आईसलॅंड इंटरनॅशनल 
 २०१७ ः पोर्तुगाल इंटरनॅशनल 
 २०१८ ः सारलॉरलक्‍स खुली बॅडमिंटन स्पर्धा (जर्मनी, सुपर १००)

फोटो फीचर

संबंधित बातम्या