पंकजची दुहेरी घोडदौड 

किशोर पेटकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

क्रीडांगण
 

क्‍यू  स्पोर्टस, अर्थात बिलियर्डस आणि स्नूकरमध्ये भारताच्या पंकज अडवानीला सम्राट मानले जाते. या खेळातील त्याची कामगिरी देदीप्यमान आहे. बंगळूरच्या या ३३ वर्षीय खेळाडूने नुकतेच एकविसावे जागतिक विजेतेपद संपादन केले. म्यानमारमधील यांगॉन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत पंकजने अगोदर ‘१५०-अप’ या गुण प्रकारातील बिलियर्डस विश्‍वविजेतेपद प्राप्त केले. हा किताब प्राप्त करताना त्याने म्यानमारच्याच खेळाडूला नमविले. विसाव्या जगज्जेतेपदानंतर नव्याने प्रेरित होत त्याने लाँग-अप (दीर्घकालीन) बिलियर्डस प्रकारातही बाजी मारली. दोन्ही प्रकारच्या स्पर्धेत एकाच वेळी जागतिक करंडक पटकाविण्याची पंकजची ही चौथी वेळ ठरली. चार वर्षांनंतर त्याने दुहेरी घोडदौड राखत वर्चस्व सिद्ध केले. लाँग-अप प्रकारातील अंतिम लढतीत पंकजने बंगळूरमधील सहकारी बालचंद्र भास्कर याचा प्रतिकार परतवून लावला. भास्कर हा अनुभवी खेळाडू. त्याने दोन वेळा आशियायी रौप्य, तर एक वेळ जागतिक ब्राँझपदक जिंकलेले आहे. यांगोन येथे पंकजची आगेकूच रोखणे भास्करला शक्‍य झाले नाही. पंकजने गतवर्षीच्या अपयशाची भरपाई केली. त्याला गतवेळच्या स्पर्धेत लाँग-अप प्रकारात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते, मात्र १५०-अप प्रकारात तो विश्‍वविजेता ठरला होता. यावर्षी त्याने दोन्ही प्रकारात बाजी मारून ‘बॉल’वरील जबरदस्त एकाग्रता दाखवली. सध्याच्या काळात बिलियर्डस आणि स्नूकर या दोन्ही क्‍यू स्पोर्टसमध्ये खेळणारा पंकज हा एकमात्र खेळाडू आहे. बिलियर्डस आणि स्नूकरमधील लौकिक राखताना त्याने यशस्वी कामगिरी कायम ठेवली आहे. 

‘स्पेशल’ कामगिरी 
जागतिक बिलियर्डस स्पर्धेत दुहेरी जगज्जेतेपद मिळविल्यानंतर पंकज आनंदित होणे अपेक्षितच होते. ही कामगिरी ‘स्पेशल’ असल्याचे त्याने नमूद केले. आपली जगज्जेतेपदाची भूक अजूनही कायम असून आगामी कालखंडात आणखी दर्जेदार खेळ करण्याचे त्याने आश्‍वासन दिले आहे. भारतीय क्‍यू स्पोर्टसमधील पंकजची घोडदौड अभिमानास्पद आहे. २१ वरून जागतिक विजेतेपदांची संख्या आणखी वाढविण्याची मनीषाही पंकजने व्यक्त केली आहे. १५०-अप प्रकारात पंकजने सलग तिसऱ्या वर्षी जागतिक करंडक पटकविला. यावरून त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. २०१६ मध्ये बंगळूर येथे, तर गतवर्षी दोहा येथे त्याने बाजी मारली होती. विसावे जगज्जेतेपद मिळविताना त्याने संपूर्ण मोहिमेत फक्त तीन फ्रेम्स गमावले. अंतिम लढतीत म्यानमारच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन फ्रेम्स गमावून तो विजेता ठरला. दोन्ही प्रकारात जगज्जेतेपद मिळविण्यासाठी कमालीचे सातत्य, प्रेरणा व एकाग्रता आवश्‍यक असते. पंकजने विचलित न होता सारे लक्ष जगज्जेतेपदावरच एकवटले. म्यानमारमधील स्पर्धेत त्याच्यासमोर आव्हानही खडतर होते, दबावविरहित खेळासाठी प्रसिद्ध असलेला पंकज शांतचित्ताने आव्हानाला सामोरा गेला. सफाईदार खेळाद्वारे चांगली कामगिरी नोंदविली. भास्कर, डेव्हिड कॉझियर, रसेल या अनुभवी खेळाडूंमुळे लाँग-अप प्रकारात आव्हान प्रबळ होते ही बाब पंकजनेच मान्य केली आहे. त्यामुळे जगज्जेतेपद अविश्‍वसनीय ठरल्याचे त्याचे मत आहे. 

पंधरा वर्षांची वाटचाल 
पंकजने कारकिर्दीतील पहिले जगज्जेतेपद पंधरा वर्षांपूर्वी जिंकले. २००३ मध्ये चीनमध्ये झालेल्या जागतिक स्नूकरमध्ये तो विश्‍वविजेता बनला. त्यानंतरची त्याची जागतिक क्‍यू स्पोर्टसमधील वाटचाल अलौकिक आणि असामान्य ठरलेली आहे. त्याने जागतिक क्‍यू स्पोर्टसमध्ये ‘लिजंड’चा दर्जा मिळविलेला आहे. जागतिक पातळीवर त्याचे नाव आदराने घेतले जाते. २००५-०६ मध्ये तो देशातील सर्वोच्च अशा ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित झाला, तर २००९ मध्ये त्याला ‘पद्मश्री’ मिळाली. दोन वेळा आशियायी क्रीडा स्पर्धेत (२००६ व २०१०) त्याने सुवर्णपदक जिंकलेले आहे. विल्सन जोन्स, मायकेल फरेरा, गीत सेठी आदी महान भारतीय क्‍यू स्पोर्टस खेळाडूंची सोनेरा परंपरा पंकज पुढे नेत आहे. १९९७ मध्ये पहिले राष्ट्रीय ज्युनियर बिलियर्डस विजेतेपद पटकाविल्यानंतर पंकजने घेतलेली झेप अतुलनीय आहे. 

पंकजचे बिलियर्डसमधील ‘डबल’ 
 २००५ माल्टा 
 २००८ बंगळूर 
 २०१४ लीड्‌स 
 २०१८ यांगॉन

संबंधित बातम्या