जगज्जेतेपद राखले, पण... 

किशोर पेटकर
शनिवार, 8 डिसेंबर 2018

क्रीडांगण
 

नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन या ‘सुपर’ बुद्धिबळपटूने चौथ्यांदा जगज्जेतेपद पटकाविले. अमेरिकन आव्हानवीर फॅबियानो करुआना याचा त्याने लंडनमध्ये झालेल्या लढतीत पाडाव केला. मात्र त्यासाठी जलद आणि अफलातून चाली रचण्यात विख्यात असलेल्या ‘शक्तिशाली’ कार्लसनला टायब्रेकर लढतीचा आधार घ्यावा लागला, कारण १२ डावांतील लढतींत एकही डाव निकाली ठरला नाही. सलग बरोबरीमुळे बुद्धिबळप्रेमी, तसेच जाणकारही कंटाळले. महान बुद्धिबळपटू माजी जगज्जेते रशियाचे गॅरी कास्पारोव यांनी थेट कार्लसनवर टीका केली. सलग बरोबरीचे डाव पाहून कास्पारोव यांनी, कार्लसन दडपणाखाली टिकत नसल्याचे भाष्य केले. डाव बरोबरीत राहिलेले चालतील, पण हार नको याच धर्तीवर कार्लसनची व्यूहरचना होती. टायब्रेकरमध्ये आपणच बाजी मारणार याचा कार्लसनला विश्‍वास होता. दोन वर्षांपूर्वी, न्यूयॉर्क सिटी येथे झालेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत रशियाचा आव्हानवीर सर्जी कार्याकिन याच्याविरुद्धही बाराही डाव बरोबरीत राखले होते आणि टायब्रेकरमध्ये ३-१ गुणफरकाने सरस ठरत कार्लसनने तेव्हा तिसऱ्यांदा जगज्जेतेपदाचा करंडक पटकाविला होता. कार्लसन आणि करुआना यांनी जास्त धोका पत्करायचा नाही हेच धोरण अवलंबिले, त्यामुळे जगज्जेतेपदाची लढत विशेष उंची गाठू शकली नाही हे कास्पारोव यांच्या टीकेवरून स्पष्ट होते. कंटाळवाण्या डावांमुळे बुद्धिबळप्रेमींना थरार अनुभवता आला नाही. अफाट प्रज्ञेचा कार्लसन यंदा काहीसा अडखळत होता हेच खरे. 

खडतर आव्हानवीर 
कार्लसनने ३० नोव्हेंबरला अठ्ठाविसावा वाढदिवस साजरा केला. त्यापूर्वी दोन दिवसअगोदर, तिन्ही टायब्रेकर डावांत कार्लसनने करुआना याला चुका करण्यास भाग पाडले आणि टीकाकारांकडे दुर्लक्ष करत आपणच बुद्धिबळातील सध्याचा ‘सम्राट’ असल्याचे सिद्ध केले. जगज्जेतेपद गमावल्यानंतर, आपण टायब्रेकर डावांत अतिशय खराब खेळल्याची कबुली २६ वर्षीय करुआना याने दिली, मात्र कार्लसन याच्यानुसार, यंदाचा प्रतिस्पर्धी खूपच खडतर होता. चार जगज्जेतेपदाच्या लढतीतील खूपच बलाढ्य प्रतिस्पर्धी असे सांगत त्याने करुआनाच्या झुंजीचे कौतुक केले. कार्लसन आणि करुआना हे दोघेही मातब्बर बुद्धिबळपटू; नव्या तंत्रज्ञानावर भर देणारे आणि संगणकीय बुद्धिबळावर भरवसा ठेवणारे बुद्धिबळपटू आहे. त्यांच्यातील नियमित डाव किचकट झाले, त्यामुळे कोणाचे पारडे जड हे शेवटपर्यंत सांगता येत नव्हते. करुआना हा पूर्वी इटली देशाचे प्रतिनिधित्व करायचा. नंतर तो अमेरिकेत गेला. आता याच देशाच्या झेंड्याखाली खेळतो. अमेरिकेचा महान बुद्धिबळपटू बॉबी फिशरच्या खेळाशी करुआनाची तुलना होते. 

...तर शेवटची लढत! 
चौथ्यांदा बुद्धिबळातील जगज्जेतेपद पटकाविल्यानंतर, कार्लसन याने सांगितले, की करुआनाविरुद्ध पराभूत झालो असतो, तर आपण यापुढे कधीच जगज्जेतेपदाची लढत खेळलो नसतो. पहिल्या सहा डावात कार्लसनचा प्रभाव विशेष जाणवला नाही. फिडेच्या मानांकनात कार्लसन आणि करुआना यांच्यात तीन एलो गुणांचा फरक आहे. कार्लसनचे रेटिंग आहे २८३५ गुणांचे, तर करुआनाचे २८३२ गुण आहेत. १९९० नंतर प्रथमच जगातील पहिल्या दोन क्रमांकावरील प्रतिभावान बुद्धिबळपटूंत जगज्जेतेपदाची लढत झाली. २८ वर्षांपूर्वी, कास्पारोव आणि अनातोली कारपोव्ह हे रशियातील दिग्गज आमने-सामने ठाकले होते. यंदा करुआना आणि दोन वर्षांपूर्वी कार्याकिनने कार्लसनला टायब्रेकरपर्यंत ताणले, पण त्याअगोदरची दोन जगज्जेतीपदे त्याच्यासाठी सोपी ठरली होती. पाच वर्षांपूर्वी चेन्नईत भारताच्या विश्‍वनाथन आनंदकडून जगज्जेतेपद खेचून घेताना कार्लसनने बारापैकी तीन डाव जिंकले होते. दुसऱ्यांदा सोची येथे आनंद आव्हानवीर असतानाही कार्लसन दोन गुणांचा फरक ठेवून जिंकला होता. तेव्हा कार्लसनचे खूप कौतुक झाले होते, पण आता परिस्थिती नक्कीच बदलली आहे. कार्लसनपाशी दोन वर्षे जगज्जेतेपदाचा किताब राहील. २०२० मध्ये त्याला नव्या आव्हानवीरास तोंड द्यावे लागेल.

जगज्जेता मॅग्नस कार्लसन 
२०१३ : विरुद्ध विश्‍वनाथन आनंद. 
२०१४ : विरुद्ध विश्‍वनाथन आनंद. 
२०१६ : विरुद्ध सर्गेई कार्याकिन. 
२०१८ : विरुद्ध फॅबियानो करुआना.

संबंधित बातम्या