अद्वितीय मेरी! 

किशोर पेटकर
शनिवार, 8 डिसेंबर 2018

क्रीडांगण
 

एम. सी. मेरी कोम... भारतीय क्रीडाक्षेत्रातील अद्वितीय आणि महान व्यक्तिमत्त्व. झुंजार वृत्ती, जिद्द आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर मणिपूरच्या या ३५ वर्षीय महिलेने जागतिक हौशी बॉक्‍सिंगमध्ये नवा इतिहास रचला. तिच्या अचाट कामगिरीमुळे ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे टोपणनाव पुन्हा एकदा सार्थ ठरले. तिचे कर्तृत्व खूपच मोठे, गगनभरारी घेणारे आहे. सहा सुवर्ण आणि एक रौप्य ही तिची जागतिक महिला बॉक्‍सिंगमधील दिग्गज कामगिरी. आतापर्यंत जागतिक हौशी महिला बॉक्‍सिंगमध्ये असा पराक्रम कोणीच केलेला नाही. पुरुष गटात क्‍यूबाच्या फेलिक्‍स सॅव्होन याने मेरीप्रमाणेच पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी सहा जागतिक पदके जिंकलेली आहेत. 
दिल्लीत झालेल्या जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेत मेरीने जबरदस्त ठोसे लगावत युक्रेनच्या हॅना ओखोटा हिला ५-० फरकाने, अगदी लीलया हरवले. तब्बल आठ वर्षांच्या खंडानंतर मेरीने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २०१० मध्ये पाचवे सुवर्णपदक जिंकून तिने आयर्लंडच्या कॅटी टेलर हिच्याशी बरोबरी साधली होती. तेव्हा मेरी २७ वर्षांची होती. आता ३५ वर्षांची, तीन मुलांची आई आहे; मात्र आत्मविश्‍वास खूपच प्रबळ आणि ध्येयनिष्ठ आहे. त्या बळावर मेरीने ४८ किलोगटात वर्चस्व राखले. खरे म्हणजे, क्रीडापटू वयाच्या पस्तिशीत आले, की निवृत्त होतात, पण मेरीची देदीप्यमान वाटचाल कायम आहे. कौटुंबिक जबाबदारी पेलत ही ‘खेलरत्न’ खेळाडू नव्या उत्साहात बॉक्‍सिंग रिंगमध्ये उतरते आणि जिंकतेही. तिचे अफलातून बॉक्‍सिंग थक्क करणारे आहे. न थकता, प्रत्येकवेळी नव्या उमेदीने ती रिंगमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर तुटून पडते. मणिपूरची ही कन्या भारतातील मुलींसाठी आदर्शवत आहे. महिलाही जागतिक बॉक्‍सिंगमध्ये देशाची शान उंचावू शकतात हे मेरीने सिद्ध केलेले आहे. 

संघर्षमय वाटचाल 
प्रत्येक खेळाडूच्या वाटचालीत संघर्ष असतोच. मेरीही त्याला अपवाद नाही. बॉक्‍सिंग या खेळात ताकदवान ठोशांबरोबर खेळाडूचे पदलालित्यही तेवढेच परिणामकारक ठरते. वाढत्या वयाबरोबर मेरीची गती मंदावलेली नाही. अनुभवागणिक ती अधिकच परिपक्व झालेली आहे. मेरीचे बॉक्‍सिंग चित्तथरारक आहे. २०१२ मध्ये लंडनमधील ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकून मेरीने भारतीय महिला बॉक्‍सिंगमध्ये नवा अध्याय लिहिला. मात्र दोन वर्षांपूर्वी तिला खूपच कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. जागतिक स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत तिचा धुव्वा उडाला, परिणामी रिओ ऑलिंपिकसाठीची पात्रता हुकली. पण मेरी हार मानणारी मुळीच नाही. फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेत तिने सोनेरी कामगिरी केली. जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी मेरी कोमने इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भाग घेणे टाळले. २०१४ मधील इन्चॉन आशियाई स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. कोणत्याही परिस्थितीत तिला यंदाची जागतिक स्पर्धा टाळायची नव्हती, तंदुरुस्ती राखण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेला नकार देण्याचा कठोर निर्णय तिने घेतला. 

लक्ष्य ऑलिंपिक सुवर्णाचे 
मेरीने देशाला ऑलिंपिक ब्राँझ जिंकून दिलेले आहे. तिचे लक्ष्य आता ऑलिंपिक सुवर्णपदक आहे. त्यासाठी तिला अफाट मेहनत घ्यावी लागेल. २०२० मधील टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या बॉक्‍सिंगमध्ये मेरीची हुकमत असलेला ४८ किलोगट नाही. त्यामुळे टोकियो ऑलिंपिकसाठी मेरीला ५१ किलोगटात कौशल्य आजमावे लागेल. वजनही वाढवावे लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे, तिला उंचीने जास्त असलेल्या बॉक्‍सर्सचे आव्हान पेलावे लागेल. मेरीला बदललेल्या परिस्थितीची जाण आहे. डगमगणे तिच्या स्वभावात नाही. लंडन ऑलिंपिकमध्ये मेरीने ५१ किलोगटातच ब्राँझपदक जिंकले होते याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दिल्लीतील सुवर्णपदकानंतर, आपल्या मनात फक्त टोकियो ऑलिंपिकचेच विचार घोळत असल्याचे तिने ठासून सांगितले. त्याचवेळी, ‘आभारी आहे, माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काहीही नाही. मी फक्त देशाला सुवर्णपदक देऊ शकते,’ असे मेरी भावुक होत म्हणाली. 

मेरी कोमची जागतिक पदके 
सुवर्ण : २००२, २००५, २००६, २००८, २०१०, २०१८. 
रौप्य : २००१.

संबंधित बातम्या