जिगरबाज ‘गौती’ 

किशोर पेटकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

क्रीडांगण
 

गौतम गंभीर हा भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू. भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर दिल्लीच्या या डावखुऱ्या फलंदाजाने अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. दोन वर्षांपूर्वी तो कसोटी क्रिकेटमध्ये शेवटचा खेळला. जानेवारी २०१३ मध्ये त्याने भारताच्या एकदिवसीय संघातील स्थान गमावले होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कोलकता नाईट रायडर्स संघालाही तो नकोसा झाला व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात आला. कोलकत्याच्या संघाने त्याच्या नेतृत्वाखाली दोन वेळा आयपीएल विजेतेपद मिळविले होते. ‘आता थांबणे योग्य आहे’ असे सांगत ‘गौती’ने यावर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे ठरविले. सलामीवीराच्या भूमिकेत या ३७ वर्षीय क्रिकेटपटूने ठसा उमटविला. गंभीरची फलंदाजी विशेष आकर्षक नव्हती किंवा त्याला तंत्रशुद्ध फलंदाजही मानता येणार नाही, तरीही जिद्द, जिगर या बळावर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये त्याने स्वतःचे स्थान तयार केले. हिंमत कधी हारायची नाही हेच ध्येय नजरेसमोर ठेवून त्याने फलंदाजी केली. वाढत्या वयागणिक तंदुरुस्तीचे प्रश्‍न होतेच. त्यामुळे घरचे मैदान असलेल्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवरच आंध्रविरुद्ध शेवटचा प्रथम श्रेणी (रणजी) सामना खेळण्याचे गौतमने ठरविले. खांद्याच्या दुखापतीची तीव्रता वाढल्यामुळे क्रिकेट कारकीर्द त्याला लांबवायची नव्हती. गंभीर धाडसी फलंदाजीबरोबरच स्पष्टवक्तेपणाबद्दलही लक्षात राहिला. 

जगज्जेता क्रिकेटपटू 
भारताने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत टी-२० विश्‍वकरंडक जिंकला, नंतर २०११ मध्ये मायभूमीत एकदिवसीय सामन्याच्या स्पर्धेत जगज्जेतेपद मिळविले. दोन्ही वेळच्या विजेत्या भारतीय संघासाठी गौतम गंभीरने मोलाचे योगदान दिले. टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला पाच धावांनी हरविले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या लढतीत गंभीरने ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेला नमवून भारताने दुसऱ्यांदा विश्‍वकरंडक पटकाविला. त्या लढतीत धावांचा पाठलाग करताना गंभीरची तिसऱ्या क्रमांकावर येत केलेली ९७ धावांची खेळी निर्णायक ठरली होती. ‘नेव्हर से डाय’ हे त्याच्या फलंदाजीतील ब्रीद. विराट कोहली व महेंद्रसिंह धोनीबरोबरच्या भागीदारीने गंभीरने श्रीलंकेचे मनसुबे उधळून लावले होते. 

सर्वोत्तम फलंदाजाचा बहुमान 
मुंबईत ३ ते ५ नोव्हेंबर २००४ या कालावधीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत गंभीरने पदार्पण केले. फिरकी गोलंदाजांचे प्राबल्य असलेला हा सामना भारताने तीन दिवसांत जिंकला. त्या लढतीत गंभीरला विशेष प्रभाव पाडता आला नाही, मात्र नंतर त्याने कसोटी संघातील स्थान भक्कम केले. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या ‘स्फोटक’ वीरेंद्र सेहवागसमवेत डावखुऱ्या गंभीरची कसोटीत सलामीला जोडी जमली. २००९ मध्ये तो फलंदाजीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये  होता. त्या वर्षीचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज या पुरस्काराने त्याला ‘आयसीसी’ने गौरविले होते. २००९ मध्ये गंभीरने न्यूझीलंड दौऱ्यात ‘वेगवान’ खेळपट्ट्यांवर उत्कृष्ट खेळ केला. नेपियर कसोटीत त्याने १३७, तर वेलिंग्टन कसोटीत १६७ धावा करून वाहव्वा मिळविली. त्यानंतर २०१०-११ मोसमातही तो दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यावर त्वेषाने लढला होता. केपटाऊनच्या कसोटीत चिवट झुंज देताना त्याने ३१८ चेंडूंचा सामना करत ९३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने अर्धशतकी खेळी नोंदविली. ‘गौती’च्या झुंजार फलंदाजीमुळे भारताने तो सामना अनिर्णित राखला होता. केवळ भारतीय खेळपट्ट्यांवरच नव्हे, तर परदेशी खेळपट्ट्यांवर त्याने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात गंभीरची फलंदाजी कोमेजली. त्याने २०१६ मध्ये कसोटी संघात पुनरागमन केले, पण त्यानंतर तो फक्त दोनच कसोटी सामने खेळू शकला. 

गौतम गंभीरची कारकीर्द 
     कसोटी ः ५८ सामने, ४१५४ धावा, ४१.९५ सरासरी, ९ शतके, २२ अर्धशतके. 
     एकदिवसीय क्रिकेट ः १४७ सामने, ५२३८ धावा, ३९.६८ सरासरी, ११ शतके, ३४ अर्धशतके. 
     टी-२० क्रिकेट ः ३७ सामने, ९३२ धावा, २७.४१ सरासरी, ७ अर्धशतके.

संबंधित बातम्या