स्क्वॉशपटू सौरव घोसालची छाप 

किशोर पेटकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

क्रीडांगण
 

भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोसाल याच्यासाठी २०१८ वर्ष फलदायी ठरले. व्यावसायिक स्क्वॉशमधील सर्वोत्तम मानांकन त्याने याच वर्षी नोंदविले. वयाच्या ३२व्या वर्षी कोलकत्याच्या या मातब्बर खेळाडूने जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकापर्यंत मजल मारली. यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात त्याने हा सर्वोत्तम क्रमांक प्राप्त केला होता. २०१३ मध्ये सौरवने सर्वप्रथम जगात ‘टॉप २०’मध्ये येण्याचा पराक्रम केला होता. तेव्हा अशी किमया साधणारा तो पहिला भारतीय पुरुष स्क्वॉशपटू ठरला होता. पाच वर्षांत सौरवने खूपच प्रगती साधली. मागील दोन वर्षांत त्याचे स्थान घसरले होते, मात्र २०१८ मध्ये त्याने पुन्हा झेप घेतली. फेब्रुवारीत त्याने मुंबईत निकोलस म्यूलेर याला हरवून इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती. नोव्हेंबरमध्ये कोलकत्यात घरच्या मैदानावर त्याने आणखी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. इजिप्तच्या झाहेद सालेम याला नमवून त्याने पीएसए चॅलेंजर टूर विजेतेपदावर नाव कोरले. या दर्जाची स्पर्धा जिंकण्याची सौरवची ही दुसरी वेळ ठरली. तीन वर्षांपूर्वी, २०१५ मध्ये त्याने माजी जागतिक अव्वल खेळाडू मारवान अल शोर्बागी याला नमवून पीएसए वर्ल्ड टूर विजेतेपद मिळविले होते. भारतीय स्क्वॉशमध्ये सौरव घोसाल हे नाव ‘लिजंड’ बनले आहे. आतापर्यंत त्याने ‘पीएसए’ पातळीवर नऊ विजेतीपदे पटकाविली आहे. 

सफल कारकीर्द 
व्यावसायिक स्क्वॉशमधील सौरवची कामगिरी सफल आहे. २०१४ मध्ये इंचॉनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकून सौरवने इतिहास रचला. स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारा तो पहिला भारतीय स्क्वॉशपटू बनला. त्याच स्पर्धेत त्याने सांघिक गटात भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यावर्षी त्याने जाकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीत ब्राँझपदकाची कमाई केली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष स्क्वॉश एकेरीचे ब्राँझपदक जिंकून या खेळात पदक जिंकणारा पहिला भारतीय हा बहुमान प्राप्त केला होता. बारा वर्षांपूर्वी पीएसए टूर स्पर्धेत विजेतेपद मिळवून सौरवने व्यावसायिक कारकिर्दीतील यशस्वी अध्यायास सुरुवात केली. सौरव लहान वयातच प्रकाशझोतात आला होता. २००४ मध्ये त्याने ब्रिटिश ज्युनिअर १९ वर्षांखालील स्क्वॉश स्पर्धेत किताब जिंकला. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. २०१३ मध्ये सौरवने आंतरराष्ट्रीय वाटचालीत आणखी एक बहुमान मिळविला. जागतिक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्याने मजल मारली. या फेरीत प्रथमच भारतीय पुरुष स्क्वॉशपटू दाखल झाला होता. रॅमी ॲशौर याच्याकडून निसटती हार स्वीकारल्यामुळे जागतिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची सौरवची संधी हुकली होती. 

खेळ बहरला 
स्क्वॉशमध्ये यशस्वी ठरण्यासाठी शालेय शिक्षण संपवून सौरव चेन्नईत आला. तेथे त्याची नैसर्गिक गुणवत्ता मेजर (निवृत्त) मणियम व सायरस पोनचा यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीनच बहरली. ज्युनिअर पातळीवर त्याने जगातील क्रमांक एकचा खेळाडू बनण्यापर्यंत प्रगती साधली. नंतर माल्कम विल्सट्रॉप यांच्या मार्गदर्शनाखाली सौरवच्या गुणवत्तेस धुमारे फुटले. माल्कम हे जगातील माजी अव्वल स्क्वॉशपटू जेम्स विल्सट्रॉप याचे वडील. पश्‍चिम यॉर्कशायरमध्ये माल्कम यांच्या मार्गदर्शनाखाली सौरवने खूपच मेहनत घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम  खेळावर झाला. या भारतीय स्क्वॉशपटूचा खेळ खूपच परिणामकारक ठरला. राष्ट्रीय स्क्वॉशमध्ये ठसा उमटवत सौरवने आंतरराष्ट्रीय मैदानेही गाजविली. २०१३ मध्ये त्याने ‘टॉप १५’ खेळाडूंत स्थान मिळविले. २०१५ पर्यंत सलग तीन वर्षे त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या १५ खेळाडूंतील जागा टिकवून ठेवली. आतापर्यंत तो आंतरराष्ट्रीय पातळीवर चारशेहून जास्त सामने खेळला असून सव्वादोनशेहून जास्त लढती जिंकल्या आहेत. ही आकडेवारीच सौरवची स्क्वॉशमधील महानता सिद्ध करते. 

संबंधित बातम्या