अपेक्षा उंचावलेली अंजुम 

किशोर पेटकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

क्रीडांगण
 

चंडीगडची महिला नेमबाज अंजुम मुदगिल हिच्यासाठी २०१८ हे वर्ष उल्लेखनीय ठरले. तिने अपेक्षा उंचावल्या आहेत. जाकार्ता-पालेमबंग येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत या २४ वर्षीय खेळाडूस पदक जिंकण्यात अपयश आले, परंतु राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, तसेच जागतिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून लौकिक राखला. ऑलिंपिकमध्ये समावेश असलेल्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अंजुमची पदक विजेती कामगिरी आश्‍वासक मानली जाते. दक्षिण कोरियातील चांगवॉन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात अंजुम देशातील अव्वल महिला नेमबाज आहे. १० मीटर एअर रायफलमध्येही तिने ठसा उमटविला. तिला आता सातत्य राखावे लागेल. २०२० मधील टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या अनुषंगाने अंजुमसाठी आगामी वाटचाल महत्त्वाची असेल. चांगवॉन येथील जागतिक स्पर्धेत पदक जिंकून तिने ऑलिंपिक कोटा मिळविला, त्यास न्याय देण्यासाठी अधिक जोमदार नेमबाजी करावी लागेल याची जाणीव अंजुमला असेलच. जागतिक स्पर्धेत ऑलिंपिकमध्ये समावेश असलेल्या प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली महिला आहे. तेजस्विनी सावंतने २०१० मध्ये जागतिक स्पर्धेत रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते, त्यानंतर जागतिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला हा मान अंजुमने गेल्या सप्टेंबरमध्ये मिळविला. 

अपयशावर मात 
अंजुमने २००८ मध्ये नेमबाजीच्या सरावास सुरुवात केली. त्यानंतर अनुभवागणिक ती परिपक्व होत गेली. यश साजरे करताना ती अपयशावरही मात करण्यास शिकली. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिची कामगिरी साफ घसरली. ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात तिची कामगिरी साफ अपेक्षाभंग करणारी होती. पात्रता फेरीत नववा क्रमांक मिळाल्यामुळे अंजुमला गाशा गुंडाळावा लागला. अपयशामुळे ती काहीप्रमाणात खचलीही, मात्र लगेच सावरली. निराशा मागे टाकत तिने इंडोनेशियातील पालेमबंग शहर सोडले आणि नव्या उमेदीसह चांगवॉनची वाट धरली. रौप्यपदकासह तिने नवा आत्मविश्‍वास मिळविला. आशियाई आणि जागतिक स्पर्धेपूर्वी, ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही ती पदकाची मानकरी ठरली होती. ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये ती दुसरी आली होती. त्यापूर्वी याच प्रकारात मेक्‍सिकोतील विश्‍वकरंडक स्पर्धेतही ती उपविजेती ठरली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेचा अपवाद वगळता अंजुमने निशाण्यावरील योग्य नेम साधण्यावरच भर दिला. 

प्रशिक्षकांचा प्रभाव 
एम. एस. चौहान हे अंजुमचे प्रारंभिक प्रशिक्षक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिभाशाली नेमबाज लक्ष्य भेदण्यास शिकली. राष्ट्रीय शिबिरात दीपाली देशपांडे व ओलेग मिखायलोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली अंजुमची प्रतिभा आणखीनच बहरली. २०१८ मधील तिच्या सरस कामगिरीत योग्य मार्गदर्शनाचा प्रभाव जाणवतो. प्रशिक्षकांच्या विश्‍वासामुळेच आशियाई स्पर्धेत कमजोर ठरल्यानंतर तिने जागतिक स्पर्धेत पदकावर निशाणा साधला. अंजुम ही ५० मीटर रायफल ३ पोझिशनमधील मातब्बर नेमबाज आहे. जागतिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकल्यामुळे तिचे अष्टपैलूत्व सिद्ध झाले आहे. ऑलिंपिक कोटा मिळाल्यामुळे तिच्यासाठी १० मीटर एअर रायफल स्पर्धाही मोलाची असेल. नेमबाजीव्यतिरिक्त टेनिसही खेळणारी अंजुम चांगली चित्रकारही आहे. फावल्या वेळेस चित्रे काढण्यात दंग राहणारी ही नेमबाज क्रीडा मानसशास्त्राची पदवीधारक आहे. या अभ्यासक्रमाचा तिला खेळाडू या नात्याने पुष्कळ फायदा झालेला आहे. दबाव, ताणतणाव झेलत त्यातून बाहेर येण्याची परिपक्वता तिला क्रीडा मानसशास्त्रामुळे प्राप्त झाल्याचे स्पष्टच आहे. तिची सफल कामगिरी ही बाब प्रदर्शित करते. गेली चार वर्षे तिला मिळणारे ‘गोस्पोर्टस’चे पाठबळही परिणामकारक ठरलेले आहे.

संबंधित बातम्या