...अखेर सोनेरी यश! 

किशोर पेटकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

क्रीडांगण
 

ओळीने सात प्रमुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांत उपविजेतेपदावर समाधान मानल्यामुळे भारताची अव्वल ‘फुलराणी’ पी. व्ही. सिंधू हिच्या क्षमतेबाबत शंका व्यक्त होत होती. सप्टेंबर २०१७ मध्ये कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्यानंतर सिंधूच्या हातात विजेतेपदाचा करंडक नव्हता. या प्रतिभावान बॅडमिंटनपटूस त्यानंतर रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. सिंधू जोमाने खेळत होती, फक्त अंतिम लढतीचा अडथळा पार होत नव्हता. अखेरीस हैदराबादच्या या २३ वर्षीय जिद्दी बॅडमिंटनपटूने सोनेरी यशाला गवसणी घातली. चीनमधील ग्वांगझू येथे झालेल्या वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत महिलांच्या एकेरीत तिने बाजी मारताना बहारदार खेळ केला. जपानची मातब्बर खेळाडू नोझोमी ओकुहारा हिला निर्णायक क्षणी डोके वर काढण्याची संधी न देता सिंधूने २१-१९, २१-१७ अशा फरकाने अंतिम लढत जिंकली. वर्ल्ड टूर फायनल्समध्ये एकेरीत विजेतेपद मिळविणारी ती पहिलीच भारतीय ठरली. गतवर्षी डिसेंबरमध्ये तिला या स्पर्धेतील विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. जपानच्याच अकाने यामागुची हिने तिला नमविले होते. त्यापूर्वी २०११ मध्ये भारताच्या साईना नेहवालने वर्षअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सिंधूने आपण अंतिम लढतीतील ‘चोकर’ नसल्याचे सिद्ध करताना विजेतेपद पटकाविण्याची जिगर प्रदर्शित केली. 

प्रबळ इच्छाशक्ती 
सिंधूने २०१८ मध्ये पाच स्पर्धांत उपविजेतीपदे मिळविल्यानंतर वर्ल्ड टूर फायनल्सवरच जास्त लक्ष केंद्रित केले. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आगेकूच राखत, भारतात प्रथमच या स्पर्धेच्या एकेरीतील जेतेपदाचा करंडक आणला. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूची नियोजनबद्ध तयारी सुरू झाली. त्यासाठी तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय या सुपर ३०० दर्जाच्या स्पर्धेत खेळण्याचे टाळले. ‘तयारीला योग्य वेळ मिळावा हे उद्दिष्ट होते,’ अशी कबुली सिंधूने दिली होती. ग्वांगझू येथील स्पर्धेत दमछाक होऊ नये या उद्देशाने सिंधूने लखनौला खेळली नाही. हा निर्णय योग्य होता हे आता सिद्ध झाले आहे. वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सिंधूचा गट खडतर होता, पण तिची जिद्द अफलातून ठरली. पहिल्या लढतीत तिने अकाने यामागुची हिचा ५२ मिनिटांत पाडाव करून गतवर्षीच्या अपयशाचा बदला घेतला. नंतर दुसऱ्या फेरीत तिने तैवानची जागतिक अव्वल क्रमांकावरील खेळाडू तई त्झू यिंग हिला नमविले. तई त्झू हिच्याविरुद्ध अगोदरच्या सहा लढतीत हार पत्करलेल्या सिंधूचा हा पहिलाच विजय ठरला. या स्पृहणीय कामगिरीने ती अधिकच प्रेरित झाली. नंतर तिसऱ्या लढतीत तिने हाँगकाँगमध्ये जन्मलेली अमेरिकन खेळाडू बेईवेन झॅंग हिला हरविले. या खेळाडूने सिंधूला गेल्या फेब्रुवारीत इंडिया ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत हरविले होते. सिंधूचा खेळ बहरला होता. तिने उपांत्य लढतीत थायलंडची माजी जगज्जेती रत्चानोक इन्तानोन हिला नमविले. 

कामगिरीचा आलेख उंचावला 
सिंधू २०१८ मध्ये पाच आणि २०१७ च्या अखेरीस दोन स्पर्धांत उपविजेती ठरली. ग्वांगझू येथील तिचा खेळ अप्रतिम होता. वर्षाची अखेर आनंददायी करण्यास ती उत्सुक होती. सर्वोत्तम कामगिरीचेच लक्ष्य होते. योग्य मार्गदर्शन आणि कणखर आत्मविश्‍वास यामुळे सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्समध्ये कामगिरीचा आलेख उंचावला. तिचे फटकेही परिणामकारक ठरले. तिचे परतीचे ताकदवान फटके प्रतिस्पर्ध्यांना झेपले नाहीत. २०१६ मधील रिओ ऑलिंपिकमधील रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूने साऱ्या कुशंकांना तिलांजली देत दरारा राखत अपेक्षापूर्ती केली. प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकल्यामुळे, आपण अंतिम लढतीत जिंकू शकते हे मानसिक बळ सिंधूला मिळालेले आहे, ते लाखमोलाचे असेल. त्या बळावर तिची २०१९ मधील वाटचाल राहील. ‘अंतिम फेरीत जिंकू का शकत नाहीस हा प्रश्‍न आता विचारला जाणार नाही. मी सुवर्णपदक जिंकले आहे, असे मी अभिमानाने सांगू शकते,’ ही तिची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे..

संबंधित बातम्या