उत्साही रॉजर फेडरर

किशोर पेटकर
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

क्रीडांगण
 

महान टेनिसपटू रॉजर फेडरर म्हणजे एक अजब रसायनच आहे. वय वाढत चाललेल, पण त्याचे टेनिस ‘वयस्क’ झालेले नाही. खेळ बहारदार आणि टवटवीत आहे. वयाच्या ३७व्या वर्षीही तो मोठ्या उत्साहाने टेनिस कोर्टवर दिसत आहे. जिंकण्याची उमेद जराही कमी झालेली नाही. वय वाढलेल्या फेडररला कमी लेखणारा निर्बुद्धच ठरतो आणि ही बाब स्वित्झर्लंडच्या महान टेनिसपटू वारंवार सिद्ध केलेली आहे. २०१७ मध्ये त्याने पाचव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकली. त्यापूर्वी शेवटची ग्रॅंड स्लॅम स्पर्धा त्याने २०१२ मध्ये जिंकली होती. विंबल्डन ओपन जिंकल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर फेडररने ग्रॅंड स्लॅम करंडक उंचावला. मध्यंतरीच्या काळात त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा होती. तो कधी टेनिस कोर्टला ‘गुडबाय’ करतोय याची वाट पाहणाऱ्यांना फेडररच्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाने धक्काच दिला. २०१७ नंतर २०१८ मध्ये फेडररने पुन्हा मेलबर्नला बाजी मारली. त्याचा तो विसावा ग्रॅंड स्लॅम करंडक ठरला. आता सलग तिसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याचा फेडररचा मानस आहे. जागतिक ग्रॅंड स्लॅम टेनिसचा मोसम ऑस्ट्रेलियन ओपनने सुरू होतो. २०१९ मधील स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होईल. २००४ ते २०१८ या चौदा वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सहा वेळा जिंकणारा फेडरर नव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे. सातव्यांदा मेलबर्नला अजिंक्‍य ठरण्याचे सूतोवाच या महान टेनिसपटूने केले आहे.

मोसम असेल रोमांचक
रॉजर फेडररची टेनिसमधील महत्त्व विलक्षण आहे. त्याची तंदुरुस्ती अफलातून आहे. त्यामुळेच तो अजूनही ग्रॅंड स्लॅम करंडकाची आस बाळगू शकतो. नव्या दमाचे टेनिसपटूही फेडररच्या प्रबळ आत्मविश्‍वासासमोर फिके ठरले आहेत. फेडरर आणि स्पेनचा डावखुरा राफेल नदाल हे पुरुष टेनिसमधील आख्यायिका ठरलेले टेनिसपटू. फेडररच्या वीस ग्रॅंड स्लॅमच्या तुलनेत नदालने १७ स्पर्धा जिंकलेल्या आहेत. ३२ वर्षीय नदालही आणखी एका ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी इच्छुक आहे. त्यामुळे २०१९ मधील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररसमोर खडतर आव्हान असेल. गतमोसमात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनेही दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकून यशस्वी ‘कमबॅक’ केले होते. साहजिकच नवा टेनिस मोसम रोमांचक ठरणार आहे. २०१८ मध्ये रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सहाव्यांदा जिंकताना अंतिम लढतीत मरिन सिलिच याला हरविले होते. २०१७ मध्ये ही स्पर्धा जिंकताना त्याने नदालचा चुरशीच्या लढतीत पाडाव केला होता. २००४ मध्ये मरात साफिनचा पराभव करून सर्वप्रथम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेल्या फेडररचा खेळ मेलबर्नमधील उन्हाळ्यात खुलतो. त्यामुळेच तो आणखी एक ग्रॅंड स्लॅम जिंकण्यासाठी प्रेरित झाला आहे. स्पर्धेपूर्वीचा त्याचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. 

‘टॉप’ कामगिरी
रॉजर फेडररची गतमोसमातील कामगिरी लक्षवेधक ठरली. जून २०१८ मध्ये तो पुन्हा अव्वल क्रमांकावर आला. वर्षअखेरीस तिसरे स्थान टिकवून ठेवले. गतमोसमात ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर त्याने फ्रेंच ओपनवर मातीच्या कोर्टवर खेळणे टाळले. विंबल्डन ओपनमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. खरे म्हणजे तो उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर होता. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनविरुद्धच्या लढतीत पहिले दोन सेट जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये मॅंच पॉइंटवर असूनही एका चुकीमुळे फेडररला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकन ओपनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने त्याला चौथ्या फेरीत हरविले. मात्र ते अपयश विसरून फेडरर २०१९ मध्ये ‘टॉप’ कामगिरीसाठी प्रेरित झाला आहे. अफलातून इच्छाशक्ती असलेल्या फेडररचे फटके अजून थकलेले नाहीत. त्यामुळे २०१९ मध्ये त्याच्या ग्रॅंड स्लॅम करंडकांची संख्या वाढल्यास नवल वाटू नये.

संबंधित बातम्या