अव्वल ‘स्टेनगन’!

किशोर पेटकर
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

क्रीडांगण
 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याला कौतुकाने ‘स्टेनगन’ संबोधले जाते. जबरदस्त वेग, चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याचे अफलातून कौशल्य, भेदकता या बळावर हा ३५ वर्षीय गोलंदाज नुकताच दक्षिण आफ्रिकेचा कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात स्टेनने पाकिस्तानचा फलंदाज फखर झमन याला स्लिपमध्ये डीन एल्गर याच्याकरवी झेलबाद केले. तो त्याचा ४२२ वा कसोटी बळी विक्रमी ठरला. या विकेटसह तो दक्षिण आफ्रिकेचा अव्वल गोलंदाज बनला. ८९व्या कसोटीत त्याने शॉन पोलॉकच्या १०८ कसोटीतील ४२१ बळींच्या विक्रमास मागे टाकले. स्टेन आणि पोलॉक या दक्षिण आफ्रिकेच्या दोघाच गोलंदाजांनी कसोटीत चारशेपेक्षा जास्त गडी बाद केलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील मखाया एन्टिनीने ३९० फलंदाज टिपले आहेत. डेल स्टेनची गोलंदाजी प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या उरात धडकीच भरवते. वेगाने धावत येत त्वेषाने चेंडू टाकण्याची त्याची शैली जबरदस्तच. फलंदाजांकडे रोखून पाहणाऱ्या कडवट नजरेने तो अर्धी लढाई जिंकतो. बळी मिळविल्यानंतर स्टेन खास शैलीतील ‘चेनसॉ’ जल्लोष बाद झालेल्या फलंदाजास खजीलच करतो. जणू काही आपण फलंदाजास करवतीने कापतोय हा त्याचा जल्लोषामागचा आवेश असतो. त्याची आक्रमकता आणि वेग १४ वर्षांच्या कारकिर्दीत कधीच कमजोर झाल्याचे दिसून आले नाही. दुखापतीने स्टेनला सतावले, प्रत्येक वेळी उसळी घेत त्याने कारकिर्दीला दिशा दाखविली.

प्रमुख गोलंदाज
डेल स्टेन जगातील प्रमुख वेगवान गोलंदाजांत गणला जातो. डिसेंबर २००४ मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हा तो क्रिकेटमध्ये अगदीच नवखा होता. गाठीशी फक्त सात प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव होता, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीला या गोलंदाजांत वेगळी चमक दिसली. कसोटी खेळण्याची संधी मिळाली, पण त्याची सुरुवात  निराशाजनकच ठरली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने तब्बल १९ नोबॉल्स टाकले, तसेच धावाही खूप दिल्या. परिणामी स्टेनला संघाबाहेर जावे लागले. तो प्रथम श्रेणी क्रिकेटकडे वळला. गोलंदाजीवर मेहनत घेतली. तंत्र सुधारले आणि जोमाने पुनरागमन केले. प्रभावी स्विंगच्या जोडीस परिणामकारक रिव्हर्स स्विंगही आला. २००६ पासून त्याच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटींत १६ गडी बाद करणारी ‘स्टेनगन’ बेदरकारपणे धडाडू लागली. प्रतिस्पर्धी फलंदाजांची डोकेदुखीही वाढली. दक्षिण आफ्रिकेला ‘मॅचविनर’ गोलंदाज गवसला. २००८ मध्ये स्टेनने कमाल केली. त्या वर्षी तो आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू ठरला. त्या वर्षी स्टेनच्या सफल कामगिरीमुळे ४३ वर्षांत प्रथमच दक्षिण आफ्रिकेस इंग्लंडला कसोटी मालिकेत हरवता आले. डेल स्टेनने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी भारतात नोंदविली. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला. तेव्हा स्टेनची गोलंदाजी आग ओकत होती, त्यात भारतीय फलंदाजही होरपळले. नागपूरच्या सपाट खेळपट्टीवर स्टेनने कमाल केली. भारताच्या पहिल्या डावात त्याने ५१ धावांत ७ गडी टिपले. त्याच्या रिव्हर्स स्विंगला तोंड देताना भारतीयांची तारांबळ उडाली. सचिन तेंडुलकरला त्याने बाद केलेला आऊटस्विंगर अप्रतिम होता. 

कसोटींच्या शतकाची मनीषा
डेल स्टेन हा मेहनती गोलंदाज. चेंडू टाकताना तो सारा अनुभव आणि कौशल्य पणाला लावतो. दुखापतीमुळेही त्याच्या कारकिर्दीत अडथळे आले, मात्र तो डगमगला नाही. त्याने दुखापतींना त्रिफळाचित बाद केले. वेगवान गोलंदाजास आवश्‍यक तंदुरुस्ती राखत वेळोवेळी पुनरागमन केले. दुखावलेला खांदा, टाचेच्या, तसेच मांडीच्या सांध्याच्या दुखापतीने त्याला सतावले. त्याची जिद्द कमी झाली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून १०० कसोटी सामने खेळण्याची आणि ५०० कसोटी बळी मिळविण्याची त्याची मनीषा आहे.

संबंधित बातम्या