हॉकी प्रशिक्षकाची ‘संगीत खुर्ची’

किशोर पेटकर
गुरुवार, 17 जानेवारी 2019

क्रीडांगण
 

‘हॉकी इंडिया’ने नववर्षात नवी चाल खेळताना पुरुष हॉकी संघाचा प्रशिक्षक बदलण्याचे ठरविले आहे. भुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर हरेंद्र सिंग यांना निरोप देण्याचे ‘हॉकी इंडिया’ने निश्‍चित केले. हरेंद्र यांना आता पुन्हा ज्युनिअर गटात पाठविण्यात येईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने डिसेंबर २०१६ मध्ये ज्युनिअर हॉकी विश्‍वकरंडक जिंकला होता. सीनियर संघापेक्षा ज्युनिअर पातळीवर भारतीय हॉकीला हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाची जास्त गरज आहे असं ‘हॉकी इंडिया’ला वाटते. त्यांना युवा हॉकीपटूंच्या प्रतिभेस खतपाणी घालण्याचे काम मिळणार आहे. भुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताला सहावा क्रमांक मिळाला. उपांत्यपूर्व लढतीत नेदरलॅंड्‌सकडून हार पत्करावी लागली. स्पर्धेच्या कालावधीत हरेंद्र यांनी भारताच्या अपयशी कामगिरीचे खापर पंचगिरीवरही फोडले होते. पंचगिरीतील चुका भारताला महागात पडल्याचे मत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, तसेच हॉकी इंडियाही नाराज होती. या पार्श्‍वभूमीवर नऊ महिन्यांतच हरेंद्र यांची पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून गच्छंती झाली. भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपद हे ‘संगीत खुर्ची’च्या खेळाप्रमाणेच आहे. वारंवार प्रशिक्षक बदलले जातात. प्रत्येक प्रशिक्षकाची मार्गदर्शनाची शैली वेगळी, त्यामुळे प्रशिक्षक बदलल्याचा कामगिरीवरही परिणाम होत असल्याचे जाणवते. आता हरेंद्र यांना पदावरून काढल्यामुळे ‘हॉकी इंडिया’ नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करेल. नव्या प्रशिक्षकाच्या संकल्पना वेगळ्या असतील. 

आशियाई सुवर्णपदक हुकले
भारताने २०१४ मध्ये इन्चॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून २०१६च्या रिओ ऑलिंपिकसाठी थेट पात्रता मिळविली होती. २०१८ मध्ये जाकार्ता-पालेमबंग येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक राखता आले नाही, त्यामुळे २०२०च्या टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय पुरुष संघाला पात्रता फेरीत खेळावे लागेल. हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. उपांत्य फेरीत भारतीय संघाला मलेशियाने हरविले. तेव्हापासून हरेंद्र ‘हॉकी इंडिया’च्या रडारवर होते, त्यातच विश्‍वकरंडक स्पर्धेतही भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नाही. शूएर्ड मरिन यांच्या जागी हरेंद्र यांची गेल्या वर्षी मे महिन्यात नियुक्ती झाली. पुरुष संघाला उभारी देणे मरिन यांना अजिबात जमले नाही, त्यामुळे त्यांना महिला संघाच्या प्रशिक्षकपदी पाठविण्यात आले. पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्यापूर्वी हरेंद्र भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी आशिया करंडकही जिंकला होता. मरिन आणि हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाच्या अदलाबदलीत भारतीय हॉकीत बराच गोंधळ दिसून आला. खरं म्हणजे, हरेंद्र यांना पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी आणखी कालावधी आवश्‍यक होता, पण ऑलिंपिक पात्रता नजरेसमोर ठेवून ‘हॉकी इंडिया’ने बदलास प्राधान्य देण्याचे ठरविले.

बेल्जियमचा आदर्श हवा
भुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धा बेल्जियमने जिंकून इतिहास रचला. रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या या युरोपियन देशाने प्रथमच पुरुष हॉकीतील विश्‍वकरंडक पटकाविला. काही वर्षांपूर्वी हा संघ खालच्या क्रमांकावर होता. तेराव्या क्रमांकावरून विश्‍वविजेता बनण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. दशकभरातील नियोजनबद्ध जडणघडणीतून बेल्जियमचा विश्‍वविजेता संघ साकारला. या कालावधीत प्रशिक्षक शेन मॅकलॉएड यांना बेल्जियमच्या संघ बांधणीत पुरेसा अवधी मिळाला. दुसरीकडे भारताचे प्रशिक्षक बदलत गेले. ज्योस ब्रासा यांच्यापासून गेल्या दहा वर्षांत भारताने सहा परदेशी प्रशिक्षक बदलले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत रोलॅंट ऑल्टमन्स, शूएर्ड मरिन, हरेंद्र सिंग अशी तीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय  संघ खेळला. यश काही गवसले नाही. पुन्हाःपुन्हा खेळाडू बदलले गेले. नव्या दमाच्या संघात जोश आढळला नाही. भारतीय हॉकी संघ गतवैभवापासून कोसो मैल दूर आहे.

संबंधित बातम्या