युवा ‘ग्रॅंडमास्टर’ गुकेश

किशोर पेटकर
मंगळवार, 29 जानेवारी 2019

क्रीडांगण
 

ज्या  वयात मुलं मौजमजा करण्यात मग्न असतात, त्या वयात भारताच्या डी. गुकेश याने अचाट पराक्रम केला आहे. भारतीय बुद्धिबळात चेन्नईच्या या मुलाने नुकताच नवा कीर्तिमान प्रस्थापित केला. १२ वर्षे, ७ महिने आणि १७ दिवस इतके वय असताना तो देशातील सर्वांत युवा बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर बनला आहे. रशियाचा सर्जी कर्याकिन ग्रॅंडमास्टर बनला तेव्हा तो १२ वर्षे, ७ महिने वयाचा होता. गुकेशला गेल्या डिसेंबरमध्ये जागतिक विक्रम अगदी थोडक्‍यात हुकला होता. दिल्ली आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत १५ जानेवारी रोजी गुकेशने ग्रॅंडमास्टर किताबासाठी आवश्‍यक तिसरा नॉर्म मिळविला आणि २५०० एलो गुणांच्या टप्प्यासह किताबावर शिक्कामोर्तबही केले. चेन्नईचाच आर. प्रज्ञानंद गतवर्षी ग्रॅंडमास्टर बनला, तेव्हा तो १२ वर्षे, १० महिने व १३ दिवसांचा होता. आता गुकेश देशाचा सर्वांत युवा बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर ठरला आहे. ही कामगिरी अवर्णनीय आहे. २९ डिसेंबर २०१८ पर्यंत ग्रॅंडमास्टरसाठी आवश्‍यक तिसऱ्या नॉर्मची कमाई केली असती, तर प्रतिभावान गुकेशने कर्याकिनचा विक्रम मागे टाकला असता. या पराक्रमाच्या तो जवळ पोचलाही होता. स्पेनमधील बार्सिलोना येथे डिसेंबरमध्ये झालेल्या स्पर्धेत गुकेशला शेवटचा डाव जिंकणे आवश्‍यक होते, पण बरोबरीवर  समाधान मानावे लागल्यामुळे ग्रॅंडमास्टरच्या तिसऱ्या नॉर्मने त्याला अर्ध्या गुणाच्या फरकाने हुलकावणी दिली. गुकेश निराश झाला, पण जिद्द सोडली नाही. त्याने नव्याने उसळी घेतली. आणखी मेहनत घेतली. शांत चित्ताने आणि एकाग्रपणे खेळत महिनाभरातच त्याने ग्रॅंडमास्टर बनण्याची स्वप्नपूर्ती केली.

अचाट कामगिरी
ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू विष्णू प्रसन्ना हे गुकेशचे प्रशिक्षक आहेत. गेल्या दीड वर्षापासून तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. विष्णू यांनी गुकेशचा आत्मविश्‍वास वाढविला. या प्रगल्भ मुलाने अचाट प्रतिभेच्या बळावर मोठी झेप घेतली. २३२३ एलो गुणांसह त्याने गतवर्षी मार्चमध्ये इंटरनॅशनल मास्टर किताब मिळविला. आता २५१२ एलो गुणांसह ग्रॅंडमास्टर बनला. जानेवारी २०१८ ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत गुकेशने भन्नाट खेळ केला. सतत स्पर्धांत सहभागी होत वर्षभरात तो २४३ डाव खेळला. तल्लख मेंदूच्या या युवा बुद्धिबळपटूने कमालीचे सातत्य राखत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातील दोन मोठे किताबही पटकाविले. या दोन्ही किताबांसाठी १६ महिन्यांत एकूण सहा नॉर्मची प्राप्ती केली. बुद्धिबळपटूंसाठी सतत खेळत राहणे हे त्रासिकच, मात्र गुकेश अपवाद ठरला. २०१३ मध्ये गुकेशने बुद्धिबळ खेळास गांभीर्याने घेतले. ग्रॅंडमास्टर किताबापर्यंतच्या वाटचालीत गुकेशला पालकांचे भरीव प्रोत्साहन लाभले. त्याचे वडील रजनीकांत वैद्यकीय क्षेत्रातील, ‘कान-नाक-घसा’ सर्जन. आई पद्माकुमारी या मायक्रोबायलॉजिस्ट. विविध स्पर्धांसाठी गुकेशबरोबरच त्याच प्रवास करतात, कारण वडिलांना वैद्यकीय व्यवसायामुळे वेळ कमीच लाभतो. मात्र ते मुलाच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतात. 

अपेक्षा वाढल्या
अगदी लहान वयात ग्रॅंडमास्टर बनल्यामुळे गुकेशचे कौतुक होत आहे. भारतात कमी वयातील ग्रॅंडमास्टर आहेत. वर्षभरात गुकेश व प्रज्ञानंद यांच्यासह निहाल सरीनही युवा ग्रॅंडमास्टर बनला. निहालने हा किताब मिळविला, तेव्हा त्याचे वय १४ वर्षे, १ महिना, १ दिवस इतके होते. परिपूर्ण नियोजन आणि योग्य स्पर्धांची निवड याद्वारे कामगिरीचा आलेख उंचावत या युवा बुद्धिबळपटूंना ग्रॅंडमास्टर बनने शक्‍य आहे. यापुढे गुकेशकडून बुद्धिबळ खेळताना प्रत्येकवेळी मोठ्या अपेक्षा असतील. बुद्धिबळ खेळात नेहमीच जिंकता येत नाही. एखादी चूक सारे गणित बिघडवून टाकते. गुकेशची खरी कसोटी भविष्यात लागणार आहे. बुद्धिबळातील धडाका आणि झपाटा कायम राखण्यासाठी गुकेशला खूपच मेहनत घ्यावी लागेल हे स्पष्टच आहे. धोका न पत्करता समर्पक चाली रचत धोरणात्मक खेळणे हे गुकेशच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे, त्या बळावर त्याने बुद्धिबळात उत्तुंग झेप घेतली आहे.

संबंधित बातम्या