कॉन्स्टंटाईन यांचा ‘गुडबाय’ 

किशोर पेटकर
मंगळवार, 29 जानेवारी 2019

क्रीडांगण
 

आशिया कप फुटबॉल स्पर्धेत आठ वर्षांनंतर खेळताना भारतीय संघाकडून मोठी अपेक्षा होती. पहिल्या सामन्यात अबुधाबी येथे थायलंडला सहजपणे हरवत स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सकारात्मक सुरुवातही केली, पण नंतर संयुक्त अरब अमिरातीकडून हार स्वीकारल्यानंतर पुढील फेरीसाठी भारताला अखेरच्या साखळी सामन्यात बरोबरी पुरेशी होती. शारजा येथे झालेल्या लढतीत बहारीनकडून ९०व्या मिनिटास पेनल्टी फटक्‍यावर गोल स्वीकारला. या पराभवामुळे भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यानंतर लगेच ‘वर्तुळ पूर्ण झाले’ असे सांगत ब्रिटिश नागरिक कॉन्स्टंटाईन यांनी पदाचा राजीनामा दिला. तसे पाहायला गेल्यास, कॉन्स्टंटाईन भारतीय फुटबॉलला ‘गुडबाय’ करतील हे निश्‍चित होते. ३१ जानेवारीस त्यांचा करार संपत होता, अनुभवी सुनील छेत्रीसह काही प्रमुख खेळाडू त्यांच्या शैलीवर नाराज होते. या खेळाडूंनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे कॉन्स्टंटाईन यांच्याबद्दल तक्रार व प्रशिक्षक बदलण्याची मागणीही केली होती. मात्र महासंघाने संयम राखला. आशिया कप स्पर्धा तोंडावर असताना त्यांनी घाईने निर्णय घेतला नाही. एकंदरीत वातावरण पाहून, कॉन्स्टंटाईन यांनी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर लगेच पदाचा राजीनामा सादर केला. त्यांनी भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्याचे चार वर्षांत अथक प्रयत्न केले, हे नक्की. आशिया कप स्पर्धेची पुढील फेरी गाठली असती, तर कदाचित ५६ वर्षीय कॉन्स्टंटाईन यांचा मुक्काम वाढला असता.

मानांकन सुधारले
कॉन्स्टंटाईन यापूर्वी २००२ ते २००५ या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी पुन्हा भारताच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. २०११ मध्ये भारताचा फुटबॉल संघ ब्रिटिश प्रशिक्षक बॉब हॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली आशिया कप स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर हॉटन यांची गच्छंती झाली आणि प्रशिक्षकपदासाठी प्रयोग सुरू झाले. गोव्याचे आर्मांद कुलासो व सावियो मदेरा यांची चाचपणी झाली, पण अपेक्षित निकाल मिळू शकले नाहीत. मदेरा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला २०१२ मधील एएफसी चॅलेंज कप स्पर्धेत अपयश आले, त्यामुळे २०१५च्या आशिया कप स्पर्धेची पात्रताही हुकली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ पुन्हा परदेशी प्रशिक्षकांकडे वळले. नेदरलॅंड्‌सचे विम कोव्हरमन्स यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. मात्र २०१४ अखेरपर्यंत भारताची फिफाच्या मानांकनात प्रचंड प्रमाणात घसरण झाली. कोव्हरमन्स यांची शैली भारतीय फुटबॉलला मानवली नाही. संघ १७३व्या क्रमांकापर्यंत खाली घसरला. भारत २०१४च्या एएफसी चॅलेंज कप स्पर्धेसाठीही पात्र ठरू शकला नाही. कोव्हरमन्स यांच्या हाती फुटबॉल महासंघाने परतीचे तिकीट ठेवल्यानंतर, कॉन्स्टंटाईन यांची भारतातील दुसरी ‘टर्म’ सुरू झाली. चार वर्षांपूर्वी सूत्रे स्वीकारताना कॉन्स्टंटाईन यांनी आशिया कप स्पर्धा पात्रतेचे लक्ष बाळगले होते. भारतीय संघ आशियातील या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी पात्र ठरला, त्याचवेळी त्यांचे जागतिक मानांकनही कमालीचे वधारले. कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने पहिल्या शंभर संघात स्थान मिळविले. 

पोकळी जाणवणार
कॉन्स्टंटाईन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर पोकळी निश्‍चितच जाणवणार. त्यांच्या तोडीचा प्रशिक्षक नियुक्त केला तरच भारताला ‘टॉप १००’मध्ये स्थान राखता येईल. नाही तर पुन्हा घसरण होईल. भारतीय फुटबॉल संघ सुनील छेत्रीवर कमालीचा अवलंबून आहे. आशिया कप स्पर्धेत थायलंडविरुद्धच्या विजयात छेत्रीने दोन गोल केले. त्याचे आता एकूण ६७ आंतरराष्ट्रीय गोल झाले असून सक्रिय फुटबॉलपटूंत त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी (६५ गोल) याला मागे टाकले आहे. छेत्री ३४  वर्षांचा आहे. त्याच्यावर किती अवलंबून राहायचे हा प्रश्‍न आहेच. बायचुंग भुतिया निवृत्तीच्या वाटेवर असताना भारतीय फुटबॉलमध्ये छेत्री प्रकाशमान झाला. आता छेत्रीची कारकीर्द अस्ताकडे झुकत असताना नवा सितारा अजूनही दिसत नाही.

संबंधित बातम्या