आश्‍वासक जलतरणपटू श्रीहरी

किशोर पेटकर
गुरुवार, 31 जानेवारी 2019

क्रीडांगण
 

बंगळूरच्या श्रीहरी नटराज या १८ वर्षीय जलतरणपटूने अपेक्षा उंचावल्या आहेत. २०१८ मधील चमकदार कामगिरीनंतर त्याने २०१९ वर्षाची सुरुवातही धडाक्‍यात केली. पुण्यात झालेल्या दुसऱ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत भारताच्या या उदयोन्मुख ‘बॅकस्ट्रोक किंग’ने सात सुवर्णपदके जिंकली. २१ वर्षांखालील मुलांच्या गटातील श्रीहरीची कामगिरी आश्‍वासक आहे. गतवर्षी दिल्लीत झालेल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याने सहा सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई केली होती. येत्या मार्च महिन्यात तो बारावीची परीक्षा देणार आहे. त्यापूर्वी पुण्यातील खेलो इंडिया स्पर्धेतील मोहीम यशस्वी ठरविली. अतिशय मेहनती आणि प्रत्येक स्पर्धेगणिक स्वतःचे कच्चे दुवे हेरून त्यावर मात करणारा हा जलतरणपटू हरहुन्नरी आहे. ऑलिंपिक सहभाग हे त्याचे ध्येय आहे. गतवर्षी श्रीहरीने तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व केले. गोल्ड कोस्टमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर जाकार्तातील आशियायी क्रीडा स्पर्धेतही त्याने चुणूक दाखविली. या स्पर्धेत त्याला पदक मिळाले नाही, मात्र बॅकस्ट्रोक जलतरणात पुरुष गटात राष्ट्रीय विक्रम श्रीहरीने आपल्या नावावर केले. अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेतही त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय तरण तलावात श्रीहरीची गुणवत्ता अजून कच्ची आहे, मात्र या प्रतिभाशाली युवा जलतरणपटूचा आत्मविश्‍वास पराकोटीचा आहे. त्याचे मनोबल कणखर आहे. त्या बळावरच त्याची वाटचाल सुरू आहे. भारताचे राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक प्रदीप कुमार यांनाही त्याने प्रभावित केले आहे. दक्षिण कोरियात होणाऱ्या जागतिक जलतरण स्पर्धेच्या तयारीत झोकून घेण्याचे त्याने ठरविले आहे. त्यानंतर २०२० मधील टोकियो ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य त्याच्यासमोर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रगतिपथावर राहत त्याने २०२४ मधील ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे उद्दिष्ट्य बाळगले आहे.

राष्ट्रीय विक्रमांचा धनी
श्रीहरीने गतवर्षी जाकार्ता येथील आशियायी क्रीडा स्पर्धेत ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. त्यापैकी दोन शर्यतीत त्याने अंतिम फेरी गाठली. २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये जाकार्ता येथे त्याने दोन वेळा राष्ट्रीय विक्रमी वेळ नोंदविली. गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नोंदविलेले स्वतःचीच विक्रमी वेळ त्याने मागे सारली. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत श्रीहरी केवळ सहभागीच झाला नाही, तर १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीची अंतिम  फेरी गाठत सहावा क्रमांक मिळविला. आंतरराष्ट्रीय जलतरणात कामगिरीतील सुधारणेसाठी परदेशात, विशेषतः ऑस्ट्रेलियात प्रशिक्षण घेण्याचे त्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत चार नवे स्पर्धा विक्रम नोंदविताना त्याने आठ सुवर्णपदके  जिंकली होती. राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये श्रीहरीने आपलेच दोन विक्रम मोडले. पुण्यातील खेलो इंडिया स्पर्धेत त्याने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये आपली वैयक्तिक कामगिरी त्याने ००.०२ सेकंदाने सुधारली.

जलतरण हेच सर्वस्व
श्रीहरीसाठी जलतरण हेच सर्वस्व आहे. वडील नटराज यांनी आर्थिकदृष्ट्या त्याची कारकीर्द सांभाळली आहे. त्याचा मोठा भाऊ बालाजी याला लहानपणी श्‍वसनाचा त्रास होता, त्यामुळे डॉक्‍टरांनी त्याला जलतरणाचा सल्ला दिला. मोठ्या भावाबरोबरच आई कल्याणी यांचा हात पकडून श्रीहरी सुद्धा तरण तलावावर जात असे. या नित्यक्रमांत त्याला जलतरणाची गोडी लागली. त्यावेळी साधारणतः तो अडीच वर्षांचा होता. २००७ पासून तो बंगळूरमधील स्पर्धात्मक जलतरणात सहभागी होऊ लागला. २०१० मध्ये तो पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला. वैद्यकीय सल्ल्यामुळे २०१४च्या सुमारास पालकांनी त्याचे जलतरण थांबविण्याचे ठरविले, त्याचा प्रतिकूल परिणाम श्रीहरीच्या शैक्षणिक प्रगतीवर झाला, त्यामुळे पुन्हा त्याचे पाय तरण तलावाकडे वळले, कारण जलतरणाशिवाय तो दुसरा विचारच करू शकत नव्हता. तेव्हापासून ए. सी. जयराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीहरीची जलतरणातील कारकीर्द बहरली. जलतरणामुळे त्याच्या जीवनात पुन्हा चैतन्य फुलले.   
 

संबंधित बातम्या