‘पद्मश्री’ सुनील छेत्री

किशोर पेटकर
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

क्रीडांगण
 

आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभिक टप्प्यात भारताचा हुकमी फुटबॉल सुनील छेत्री चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत अबुधाबी येथे भारताने थायलंडला ४-१ फरकाने हरविले. त्यात छेत्रीने दोन गोल केले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील खात्यात ६७ गोलांची नोंद झाली. या कामगिरीने त्याने जागतिक फुटबॉलमधील ‘महान’ फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याला मागे टाकले. सक्रिय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत छेत्री आता दुसरा आहे. मेस्सीच्या ६५ गोलांना मागे टाकल्यानंतर छेत्रीच्या पुढे पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. त्याच्या नावे ८५ आंतरराष्ट्रीय गोल आहेत. भारतीय फुटबॉलचा विचार करता, छेत्रीची आंतरराष्ट्रीय मैदानावरील ही कामगिरी देदीप्यमान ठरते. भारतीय फुटबॉलमध्ये तो सर्वाधिक गोल करणारा ‘शार्पशूटर’ आहे. छेत्रीने भारतीय फुटबॉलमध्ये ‘लिजंड’ हा मान कधीच मिळविला आहे. बायचुंग भुतियानंतर त्याने भारतीय फुटबॉल स्वतःच्या खांद्यावर यशस्वीपणे पेलले, वलयांकित बनला. सध्याचे भारतीय फुटबॉल म्हटले, की सुनील छेत्री हीच ओळख आहे. या महान फुटबॉलपटूच्या शिरपेचात नुकताच आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. वयाच्या ३४व्या वर्षी हा चपळ आणि धडाकेबाज आघाडीपटू ‘पद्मश्री’ बनला आहे. स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारतीय संघाचे कर्णधारपद ‘फिरते’ ठेवले, तरीही छेत्रीच कायमचा मैदानावरील कर्णधार राहिला. त्याच्या भोवतीच भारतीय फुटबॉल केंद्रित असते.  त्याच्या पायातील जादू अवर्णनीय आहे.

सहावा ‘पद्मश्री’ फुटबॉलपटू
देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कारप्राप्त सुनील छेत्री हा भारताचा सहावा ‘पद्मश्री’ आहे. यापूर्वी गोस्थो पॉल, सैलेन मन्ना, पी. के. बॅनर्जी, चुनी गोस्वामी, बायचुंग भुतिया हे फुटबॉलपटू या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. छेत्री अजूनही फुटबॉल खेळतो. त्याचे वय वाढत आहे, पण गोल करण्याची भूक शमलेली नाही. आशिया कप स्पर्धेत भारताने थायलंडला हरविले, त्या लढतीत छेत्रीने दोन गोल केले. नंतर दोन लढतीत त्याला गोल करण्यास मोकळीक मिळाली नाही. भारतीय संघाला संयुक्त अरब अमिराती व बहारीनकडून हार पत्करावी लागली. २०११ नंतर तो दुसऱ्यांदा आशिया कप स्पर्धेत खेळला. यापुढेही खेळेल का? या प्रश्‍नाचे उत्तर केवळ छेत्रीच देऊ शकतो. तो अजूनही जोमदार खेळतोय. भुतियाच्या सावलीत छेत्रीची गुणवत्ता बहरली, पण सध्या त्याची जागा घेणारा ‘स्ट्रायकर’ भारतीय मैदानांवर दिसत नाही. अफाट प्रतिभा आणि सातत्य या बळावर छेत्री यशस्वी ठरला. क्‍लब पातळीवर तो बंगळूर एफसीचा जुलै २०१३ पासून आधारस्तंभ आहे. वयाच्या सतराव्या वर्षी कोलकात्यातील मोहन बागानकडून त्याला मासिक अंदाजे ६० हजार रुपये ‘वेतन’ मिळत असे. आज हाच खेळाडू देशातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू आहे. २०१७ मधील ‘आयएसएल’ लिलावात बंगळूर एफसीने त्याच्यासाठी दीड कोटी रूपये मोजले होते. 

दीर्घानुभवी प्रवास
सुनील छेत्रीच्या रक्तातच फुटबॉल आहे. वडील खर्ग बहादूर लष्करात असताना फुटबॉल खेळले. आई सुशीला नेपाळच्या माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू. शाळेत असताना क्रीडा शिक्षकांनी सुनीलच्या मनावर फुटबॉल खेळण्याचे महत्त्व बिंबविले. खूप मेहनत घेतल्यास यश दूर नसल्याचे सांगितले. शिक्षकांनी दिलेला मंत्र जपत तो अजूनही परिश्रम घेतोय. सुमारे दीड दशकांच्या कारकिर्दीत बंगाल (मोहन बागान, ईस्ट बंगाल), पंजाब (जेसीटी), गोवा (धेंपो, चर्चिल ब्रदर्स) असा प्रवास करत बंगळूरच्या संघात स्थिरावला आहे. मध्यंतरी त्याने परदेशातही अनुभव घेतला, पण तेथील फुटबॉलला छेत्रीची शैली मानवली नाही. अमेरिकेतील कान्सास सिटी विझार्डस्‌ने त्याला ‘एमएलएस’ स्पर्धेसाठी, तसेच पोतुगालच्या स्पोर्टिंग क्‍लबने ‘ब’ संघासाठी करारबद्ध केले, पण २०१० ते २०१३ या कालावधीत त्याला परदेशातील संघांनी ‘बेंच’वरच बसविले. त्यास कंटाळून छेत्री मायदेशात परतला, पुन्हा कधीच परदेशातील फुटबॉलच्या नादी लागला नाही, देशात खेळूनच त्याची कारकीर्द बहरली.

संबंधित बातम्या