रणजी करंडक विदर्भाचाच

किशोर पेटकर
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

क्रीडांगण
 

विदर्भाने गतमोसमात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा प्रथमच जिंकली. या जिगरबाज संघाने तोच जोश कायम राखताना, यंदाही बाजी मारत भारतीय क्रिकेटमधील वैदर्भीय क्रिकेटची ताकद दाखवून दिली. विदर्भातील क्रिकेट विकासाची पाळेमुळे  खोलवर रुजलेली आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले. नागपूर येथे झालेल्या अंतिम लढतीत विदर्भाने सौराष्ट्राला ७८ धावांनी हरविले. सौराष्ट्राला तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विदर्भाने दोन वेळा अंतिम फेरीत गाठत प्रतिष्ठेच्या रणजी करंडकावर नाव कोरले. विदर्भ क्रिकेट संघटनेची दूरदृष्टी, खेळाडूंची मेहनत, सांघिक प्रयत्नास चंद्रकांत पंडित यांच्या व्यावसायिक मार्गदर्शनाची किनार यामुळेच त्यांना देशातील ‘चॅंपियन’ क्रिकेट संघ  होता आले आहे. काही वर्षांपूर्वी विदर्भाच्या क्रिकेट संघाची कोणीच मोठी दखल घेत नव्हते. ‘प्लेट’ गटात खेळत असताना गोव्यासारखा संघही त्यांना हरवत होता. आजची स्थिती खूपच वेगळी आणि आश्‍वासक आहे. केरळला उपांत्य लढतीत अवघ्या दीड दिवसांत गुंडाळल्यानंतर विदर्भाने घरच्या मैदानावर सौराष्ट्राला डोके वर काढू दिले नाही. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत कमालीचे यश मिळविलेल्या चेतेश्‍वर पुजारास रोखण्यासाठी विदर्भाने परिणामकारक व्यूहरचना रचून ती यशस्वी ठरविली. आदित्य सरवटे, अक्षय वखरे या फिरकी गोलंदाजांनी सुरेख मारा केला. हा संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नाही. कसोटी वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि माजी कसोटी फलंदाज वसीम जाफर हे आंतरराष्ट्रीय अनुभवसंपन्न खेळाडू. कर्णधार फैज फजल याचा अपवाद वगळता विदर्भाच्या खेळाडूंपाशी अनुभवही तसा कमीच, मात्र आत्मविश्‍वास पराकोटीचा राहिल्यामुळे या संघाला सलग दुसऱ्यांदा रणजी विजेतेपदाचा जल्लोष करता आला. स्पर्धेच्या इतिहासात लागोपाठ दोन मोसमात जेतेपद मिळविणारा विदर्भ हा सहावाच संघ आहे.

‘चॅंपियन’ घडविले
विदर्भ संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यामतानुसार, खेळाडू आणि संघाची मानसिकता बदलल्यामुळेच ‘चॅंपियन’ बनता आले. त्यांनी सांगितले, की ‘विदर्भाच्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता प्रचंड आहे, पण विजेता होण्यासाठी हवी असलेली भूक आणि जिद्दीचा अभाव होता. खेळाडूंना शिस्त लावून त्यांच्याकडून कसून मेहनत करवून घेतली. सोच बदलनी थी, जो बदल गयी है.’ चंदू पंडित यांच्यापाशी क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्याने फार मोठा अनुभव आहे. त्याचा वापर त्यांनी विदर्भ संघासाठी केला. या मुंबईकर ‘पंडिता’ने खेळाडू या नात्याने दोन वेळा रणजी करंडक पटकाविला आहे. ते मुंबईचे सफल कर्णधारही ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने तीन वेळा रणजी करंडक जिंकला, राजस्थानने एक वेळ, तर विदर्भाने दोन वेळा. प्रशिक्षक या नात्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंडित यांनी आगळी छाप सोडली आहे. त्यांना विदर्भ क्रिकेट संघटनेचाही मोलाचा पाठिंबा लाभला. मुंबईचे क्रिकेट ‘खडूस’ वृत्तीसाठी ओळखले जाते. ही वृत्ती आता पंडित यांनी विदर्भात आणली आहे.  त्यामुळेच विदर्भ संघात लढाऊ वृत्ती रुजली आहे. 

जाफरची दशकपूर्ती
चंदू पंडित यांच्याबरोबरच आणखी एका मुंबईकराचा विदर्भाच्या यशात मोठा वाटा आहे. वसीम जाफर हे त्याचे नाव. हा चाळिशीतील फलंदाज अजूनही नेटाने खेळतोय. मुंबईने नाकारल्यानंतर त्याने नागपूरचा रस्ता पकडला आणि आपले क्रिकेट अजूनही शाबूत असल्याचे गेले दोन मोसम सिद्ध केले. जाफरने यंदा १५ रणजी डावांत ६९.१३च्या सरासरीने हजाराहून जास्त धावा केल्या. दहाव्यांदा तो रणजी करंडक अंतिम लढत खेळला व प्रत्येक वेळी विजेता ठरला आहे. १६ फेब्रुवारीस तो ४१ वर्षांचा होईल, पण त्याची फलंदाजी पाहता वय अजिबात जाणवत नाही. जाफरची १९९६-९७ ते २०१८-१९ पर्यंतच्या रणजी विजेतेपदाची वाटचाल संस्मरणीय आहे. 

संबंधित बातम्या